आपण नेहमी ऐकतो की जास्त साखर खाल्ल्याने दात खराब होतात. पण केवळ साखरच नव्हे तर काही इतर पदार्थदेखील दातांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात.

ब्रेड आणि स्टार्चयुक्त पदार्थ ब्रेड किंवा रिफाइंड स्टार्चयुक्त पदार्थ खाताना ते तोंडात पेस्टसारखे होतात आणि दातांच्या कोपऱ्यात अडकतात. लाळेमुळे त्यांचं रूपांतर साखरेत होतं आणि त्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होते.

कार्बोनेटेड पेये शीतपेये किंवा सोडा यासारखी कार्बोनेटेड पेये दातांच्या इनॅमलला झीजवतात. या पेयांमुळे तोंड कोरडे पडते, लाळेचं प्रमाण कमी होतं आणि दातांवर प्लाक तयार होतो

लिंबूवर्गीय फळांचे रस संत्रे, लिंबू, द्राक्षे ही फळं आरोग्यासाठी चांगली असली तरी त्यामध्ये सायट्रिक अॅसिड जास्त असतं. हे अॅसिड दातांच्या इनॅमलला झीजवतं आणि दात किडण्याची शक्यता वाढवते.

जास्त कडक किंवा चिकट अन्न कँडी किंवा कॅरॅमलसारखे पदार्थ दातांना चिकटतात आणि जास्त काळ तोंडात राहतात. यामुळे आम्लनिर्मिती वाढते आणि दातांच्या पृष्ठभागाला नुकसान होतं. तसेच, खूप कडक गोष्टी चावल्यास दात चिरडू शकतात किंवा भरलेली फिलिंग बाहेर पडू शकते.

लोणचे लोणच्यामध्ये वापरलेलं व्हिनेगर दातांच्या इनॅमलसाठी हानिकारक असतं. शिवाय काही लोणच्यांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे पोकळी होऊ शकते

सुकामेवा मनुका, खजूर, जर्दाळू किंवा इतर सुकामेवा गोडसर आणि चिकट असल्यामुळे दातांमध्ये अडकतो. त्यामधील नैसर्गिक साखर दातांवर थर बनवते आणि दात किडण्याचा धोका वाढतो.

मद्यपान अल्कोहोलिक पेयांमुळे तोंड कोरडे पडतं आणि लाळ कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे तोंडातील आम्लता वाढते. दीर्घकाळ जास्त प्रमाणात मद्यपान केल्यास दातांवर डाग पडतात आणि तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

योग्य प्रमाणात खाणं, त्यानंतर तोंड धुणं आणि दातांची स्वच्छता राखणं हेच दात मजबूत ठेवण्याचं खरं गमक आहे.