अकोला, दि. ९ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीच्या व-हाडी आणि इतर सर्व बोलींच्या संशोधनाला चालना मिळेल. व-हाडी बोलीच्या संशोधनासाठी अकोला हे महत्वपूर्ण केंद्र असल्याचे प्रतिपादन भाषाशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक डॉ. रावसाहेब काळे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी अभिजात भाषा सप्ताहानिमित्त लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अधिक्षक श्याम धनमने, तहसीलदार विश्वजित खंडारे,सहाय्यक अधीक्षक हर्षदा काकड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, भाषाप्रेमी नागरिक उपस्थित होते.
डॉ. काळे म्हणाले की, मराठी भाषेत, तिच्या परंपरा आणि साहित्यात वैश्विक मूल्यांचा समावेश असल्याने ती अभिजात भाषा म्हणून गौरवली गेली आहे. मराठीची प्रमुख बोली असलेली व-हाडी भाषा, तिची विविध रूपे यवतमाळपासून बुलडाण्यापर्यंतच्या व-हाड प्रदेशात पाहायला मिळतात. व-हाडी बोलीचे शब्दकोश, वऱ्हाडी म्हणी, वऱ्हाडी बोलीचा भाषाशास्त्रीय अभ्यास अकोल्यात झाला असून, हे शहर वऱ्हाडी बोलीभाषा संशोधनाचे प्रमुख केंद्र झाले आहे. मायमराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने व-हाडी, अहिराणी, कोकणी, मालवणी, नागपुरी, झाडी, मराठवाडी अशा विविध बोलींच्या संशोधनाला चालना मिळणार आहे.

केवळ भारतीयच नव्हे, तर जगातील भाषांमध्ये मराठीचे अनन्यसाधारण स्थान आहे. संस्कृती भाषेत वसत असते. मराठी भाषा महाराष्ट्रीय संस्कृतीचा आरसा आहे. त्यामुळे आपली मराठी भाषा, साहित्य,कला आणि इतिहास यांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अधिक्षक श्याम धनमने यांनी प्रास्ताविक केले.