अकोला पोलिसांतर्फे सीसीटीव्ही, त्रिनेत्र व रक्षा प्रकल्पाचा शुभारंभ
अकोला, दि. १७ : अकोला जिल्हा पोलीस दलाचे कमांड अँड कंट्रोल कक्ष, त्रिनेत्र प्रकल्प व रक्षा प्रकल्प हे उपक्रम महाराष्ट्राला पथदर्शी ठरतील, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.

पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील कमांड कंट्रोल कक्षाचा, तसेच प्रोजेक्ट रक्षा व त्रिनेत्र प्रकल्पाचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक सी. के. रेड्डी, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ किशन पनपलिया, मनीष करंदीकर, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शंकर शेळके व अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, सीसीटीव्हीची यंत्रणा अद्ययावत असल्यामुळे प्रत्येक स्थळाची सुस्पष्ट प्रतिमा मिळून कक्षातून शहरातील सार्वजनिक ठिकाणांचे संनियंत्रण शक्य होणार आहे. रक्षा प्रकल्पामुळे पोलीस ठाण्याचा परफॉर्मन्स वाढेल. त्रिनेत्र प्रकल्पामुळे सवयीच्या गुन्हेगारांचा डेटा तयार होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीचा बीमोड करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे, गुन्हेगारी सोडून चांगल्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या गुन्हेगारांचे पुनर्वसन करणे यामुळे शक्य होईल.
हा प्रकल्प पथदर्शी आहे. तो संपूर्ण राज्यात राबविण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पोलीस अधीक्षक श्री. चांडक यांनी प्रकल्पांची माहिती दिली.
जिल्हा पोलिसांतर्फे शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, अधीक्षक कार्यालयातील
कमांड कंट्रोल कक्षातून आवश्यक संनियंत्रण करण्यात येणार आहे.
रक्षा प्रकल्प
प्रत्येक पोलिस ठाण्यात येथील कर्मचाऱ्यांचे काम नागरिककेंद्री पद्धतीने चालावे, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला क्यू आर कोड देण्यात आला आहे. त्याआधारे ठाण्यात येणारे अर्जदार नागरिक यांना कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीबाबत तक्रार असेल किंवा अडचणीचे निराकरण झाले नसेल तर त्यांना नोंद करता येणार आहे. तसा फॉर्म याप्रणाली द्वारे भरता येईल. अर्जदाराच्या नावाची गोपनीयता ही राखली जाणार आहे.
त्रिनेत्र प्रकल्प
त्रिनेत्र प्रकल्पात वारंवार गुन्हे करणारे किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे नोंद असलेल्या सवयीच्या गुन्हेगारांची एफआयआर, बाँड आदी माहिती एकत्र करून अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे त्यावर प्रकिया केली जाईल. त्यामुळे सवयींचा गुन्हेगारांचा मागोवा ठेवता येणे शक्य होणार आहे व भविष्यात घडणारे गुन्हेही रोखता येतील.
विविध गुन्ह्यांत यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.