प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर राबविले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहेत.#Namo Netra Sanjeevani Health Mission

या विशेष मोहिमेतून मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मेवाटप केले जाणार असून काचबिंदूसह इतर नेत्रविकारांवरील निदान, सल्ला आणि उपचार देखील मोफत केले जाणार आहेत.
जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरे
राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये, तालुका व गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. गाव, वस्ती, तांडे, पाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ होईल. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येतील.
उपक्रमातील संस्थांचा व्यापक सहभाग
या अभियानात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण विभाग, नगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, ईएसआयसी रुग्णालये तसेच खासगी नेत्र रुग्णालये व विविध सामाजिक संस्था या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी होणार आहे.