Tulsi: तुळशीचा नियमित वापर केल्याने तणाव कमी होतो आणि शरिरीक आरोग्य सुधारते. तुळशीतील ऍडॅप्टोजेन नावाचे घटक मानसिक तणावापासून लढण्यास मदत करते.

तुळस एक औषधी वनस्पती आहे जी आरोग्यासाठी खुपच फायदेशीर मानली जाते. तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंम्फेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. म्हणूनच केवळ धार्मिक कारणामुळे नाही, तर घरातील प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभण्यासाठी घराबाहेर एकतरी तुळशीचे रोपटे असावे अशी परंपरा मानली जाते.
पण तुम्हाला माहीत आहे का? तुळस आरोग्यासाठी जितकी फायदेशीर आहे तितकीच ती मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात ऑफिसचे काम, अपूर्ण झोप, चुकीचे राहणीमान, अवेळी खाणे या सगळ्याचा परिणाम फक्त आपल्या शारिरीक आरोग्यावरच नाही, तर मानसिक आरोग्यावरही होतो. डोक्याला सतत ताण जाणवतो ज्यामुळे आपण नैराश्याच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वाढते.
महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या मूड स्विंग्समुळे अधिक मानसिक समस्या जाणवतात. शिवाय थायरॉईड आणि हृदयासंबंधित समस्या असल्यासही मानसिक तणाव जाणवतो.
तुळशीमध्ये अनेक असे गुणधर्म असतात जे तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. तुळशीतील ऍडॅप्टोजेन नावाचे घटक मानसिक तणावापासून लढण्यास मदत करते. तुळशीचे नियमित सेवन केल्याने मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता वाढते. यामुळे कामामध्ये किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. तुळस कोर्टिसोलची पातळी कमी करते ज्यामुळे मज्जासंस्था शांत राहते व ताण कमी होतो. चांगली झोप लागण्यास मदत होते.
मानसिक तणाव दूर करण्यासाठी अशाप्रकारे तुम्ही तुळशीचा वापर करू शकता :
१. रोज सकाळी ५-६ तुळशीची पाने चघळून खा.
२. चहामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करा.
३. तुळशीचे तेल अंगाला चोळा किंवा सुगंध घ्या.
४. तुळशीचा अर्क कोमट पाण्यात मिसळून प्या.