Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • लोकप्रिय लेख

एक पाऊल टाकू ‘मी माझा’ च्या पलीकडे……

On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

तरुणाईच्या हातात देश सुरक्षित राहायला हवा,अशी जगाची अपेक्षा असते.परंतु,देशाच्या सुरक्षिततेआधी आपली,आपल्या नोकरीची आणि परिवाराची सुरक्षितता महत्वाची मानून ‘आपण बरं आणि आपलं काम बरं’ अशा भावनेतून आपल्यापैकी अनेक जण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत पुढे सरकत राहतात.दिवस पुढे जात राहतात आणि मग एखाद्या ताज्या आदोंलनाच्या निमित्तानं आपल्याला सत्व तपासून पाहण्याची संधी मिळते.गेल्या काही वर्षांत आपल्याला अशा अनेक संधी मिळत आहेत.कधी भाषिक अस्मिता,तर कधी कडवी आक्रमक भूमिका घेणाऱ्यांच्या निमित्तानं आपण कोड्यात पडतो. खरोखरचं आपली म्हणून काही भूमिका आहे काय,तशी ती असल्यास जाहीरपणे आपण ती मांडू शकतो का,आणि तशी भूमिका मांडल्यानंतर होणारी टीका स्वीकारायची आपली तयारी आहे काय ? नोकरीत तणाव,आवराआवरीची धावपळ आणि थकून जाणारं मन आणि शरीर याला आपल्यातला प्रत्येक जण सभ्य,सुशिक्षित असतांना संघर्षापासून भूमिका घेण्यापासून दूर राहू लागलो,तर नेमकी समजोपयोगी भूमिका घेणार कोण? आवर्जून काही सांगायची तीव्र गरज असतांनाही गप्प बसून राहिल्यामुळे समाजात पसरत राहणारे चुकीचे विचार अधिक टोकदार बनले तर येणारा भविष्यकाळ आपल्याला क्षमा करेल काय,या प्रश्नांचा विचार करायला हवा.रस्त्यावर उतरून संघर्ष करता येत नसला,तरी पुढे येऊन विचार मांडणं आवश्यक आहे.मनमोकळेपणाने व्यक्त होणे गरजेचे आहे. नाहीतर आपल्या भावनांचा एकत्र उद्रेक झाला कि त्याचा काय उपयोग? तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते.त्यापेक्षा योग्य वेळी बोलता यायला हवे.आजच्या काळात नुसते शांत बसणे किंवा बघ्याची भूमिका घेणे हा गुन्हा आहे.                     

सध्या सगळीकडे ‘करोनो’ व्हायरसने थैमान घातले आहे.संपूर्ण देश लॉकडाऊन कडून आता अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकत आहे.कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत आणि आता तिसरी लाट येते कि काय? असे तर्कवितर्क सुरु आहेत. काहीजणांचे तर अजूनही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु आहे. अशावेळी काय करायचे? हा सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे.तेव्हा किती सिनेमे बघणार? किती पुस्तके वाचणार? मोबाईलवर किती गेम खेळणार? अशा सर्व गोष्टींचा कंटाळा हा कधी ना कधी येणारच. परंतु जर आपण हा वेळ आपल्या स्वतःसाठी दिला,तर किती उत्तम होईल. या धावपळीच्या जगात कुठेतरी आपल्याला ब्रेक मिळणे गरजेचे  होते. स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे होते.त्यासाठी ही वेळ योग्य आहे,असे मला वाटते. या काळात आपण आपले अनेक जवळचे अनेक मित्र,नातेवाईक गमावले आहेत. त्यामुळे जवळची व्यक्ती अश्या कुठल्या आजाराने गेल्यानंतर काय होते? हे आपण अनुभवले असेलच. या काळात मानसिक आधाराची जास्त गरज असते.

एरवी आपण आपल्याच कामात म्हणजे नोकरीत किंवा व्यवसायात व्यस्त असतो. स्वतःला द्यायला आपल्याकडे जरासुद्धा वेळ नसतो. त्यामुळे मिळालेला हा वेळ सत्कारणी लावणे गरजेचे आहे. मी जेव्हा माझ्या भूतकाळात जातो, तेव्हा माझ्या कॉलेजचे ते मोरपंखी दिवस मला आठवतात.ते दिवस खरंच खूप भारी होते. त्यावेळी मी ‘कमवा आणि शिकवा’ या योजनेत सहभाग घेतला होता.कॉलेजचे लेक्चर्स झाले कि,आम्ही सगळा ग्रुप कॉलेजमधील काम करत असू.त्याचे आम्हाला काही पैसे मिळायचे.पण त्या पैशांपेक्षा जास्त मनोभावे आनंद त्या कामातून मिळायचा.पैशातून बसच्या पासची निकड भागायची.त्यामुळे घरच्यांवरचा थोडासा भार हलका व्हायचा.त्या वयात पैशाची किंमत कळली,म्हणून आजच्या महागाईच्या जगात सर्व गोष्टींना तोंड देता येते.पण याउलट आजच्या तरुणाईबद्दल बोलायचे ठरले तर फारच चित्र-विचित्र अवस्था आहे.कॉलेज कॅम्पसमध्ये शिरलं,की मन अगदी प्रसन्न होऊन जातं.या तरुणाईत फेरफटका मारल्यानंतर,नवीन पंख घेऊन उडू पाहणारी ही पाखरं वेगवेगळ्या कल्पनेत रमतांना दिसतात.नवनवीन फॅशन करू पाहणारी ही तरुणाई कट्ट्यावर आल्यानंतर त्यांच्या विविध विषयांवरील चर्चा,प्रसंग व मतं मांडतांना पाहून बरं वाटतं.प्रत्येक जण आपल्या देहबोलीतून जो स्मार्टनेस दाखवीत असतो,तो वाखाणण्याजोगा असतो.परंतु,याच वातावरणात व्यसनाधीन,निराशमय पिढीचं चित्रही मला दिसतं,तेव्हा मन चिंताग्रस्त होतं आणि नकळत वाईट वाटतं.अशी दोन्ही टोके दिसल्याने मन भावविभोर होते.

तरुणाई म्हटलं,की सळसळता उत्साह,कट्ट्यावरच्या गप्पा,मित्रांबरोबर एन्जॉय केलेला प्रत्येक क्षण,हेच आठवतं.पण बदलत्या परिस्थितीनुसार भान येतंच असं नाही.मी नेमका कोण आणि बदलत्या परिस्थितीत माझं खरं स्थान काय आहे, हा प्रश्न आपल्यापैकी किती तरुणांना पडतो? शिक्षण,उच्च शिक्षण,रोजगार,लग्न आणि सेटल होणं या मार्गानं सुरु असलेला आपला सरधोपट प्रवास उमेदीची १५ वर्षं तरी खातो. इतकी वर्ष घालवल्यांनंतर आणि ‘दोनाचे चार’ झाल्यानंतर संसाराची काळजी घेण्याची जबाबदारी पडते. चाळीशीपर्यंतचा माणूस तरुण मानला जात असला तरी तरुणाईत अपेक्षित असलेला जोश,संस्कारांचं उपयोजन आणि समाजभिमुखता खरोखरच कितपत जपता येते,असा प्रश्न आजघडीला पडतो आहे.आक्रमक,अतिरेकी विचारांचं तांडव बाहेर सुरु असतांना आत्मपरीक्षण करतांना असा प्रश्न हटकून पडतो. आपली भविष्यातील ओळख काय असावी याचे असे सुस्पष्ट चित्र घटनात्मक स्वरूपात आपल्या भावी पिढ्यांपुढे ठेवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये आपला देश आहे, हे आपले भाग्य आहे. ते चित्र प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणे, त्या ध्येयपूर्तीसाठी समाजाला दिशा देणे, समाजाची जडण-घडण करणे, त्या चित्रातील तत्त्वांच्या विरोधी तत्त्वांशी अहिंसक संघर्ष करणे आणि ते चित्र प्रत्यक्षात आणल्यानंतर ते प्राणपणाने अबाधित राखणे, संवर्धित करणे हे आपल्या भावी नेतृत्वाचे इतिहासदत्त कर्तव्य आहे आणि तेच त्याच्यापुढील आव्हानही आहे. आपल्या देशाचा विकास म्हणजे वरील घटनात्मक स्वप्नाची परिपूर्ती. या स्वप्नपूर्तीला खीळ घालणाऱ्या अनेक समस्या आहेत. त्यात – पराकोटीची विषमता, गरिबी, कुपोषण, उपासमार, बेकारी, व्यसनाधीनता, सार्वजनिक सुविधा व विकासातील असमतोल, आर्थिक मंदीचे सावट, भ्रष्टाचार, अस्वच्छता, प्रदूषण, रोगराई, अज्ञान, निरक्षरता, निकृष्ट दर्जाचे शिक्षण-आरोग्यव्यवस्था-जीवनमान, पराधीनता, अवैज्ञानिकता, दैववाद, सामाजिक अन्याय, शोषण, लिंगभेद, जातीयवाद, धर्मांधता, हिंसाचार, अत्याचार, झुंडशाही, शत्रुभाव, असहिष्णुता, अल्पसंख्याकांमधील असुरक्षितता, लोकशाही संस्थांचा ऱ्हास, सामाजिक अशांतता, दहशतवाद, सांप्रदायिकता, सांस्कृतिक मागासलेपण, बेशिस्त, सुजाण नागरिकत्वाचा अभाव, नैसर्गिक संसाधनांची उधळपट्टी, पर्यावरणीय अरिष्ट अशा अनेक जटील समस्या आपल्या देशात दीर्घ काळ टिकून राहिल्या आहेत. या समस्या पारंपरिक उपायांनी सुटण्यासारख्या असत्या तर अद्याप शिल्लक राहिल्याच नसत्या.

गेल्या दहा हजार वर्षांत मानवी समाज शेतीप्रधान, उद्योगप्रधान आणि माहितीप्रधान अवस्थांमधून संक्रमित होत-होत आता ज्ञानप्रधान व बुद्धिमत्ताप्रधान अवस्थेत प्रवेश करत आहे. पूर्वीच्या तीनही अवस्थांपेक्षा ही अवस्था मुळातच खूप वेगळी आहे. पूर्वीच्या अवस्थांमध्ये मानवी समाज ज्ञान वापरत नव्हता असे नाही, पण त्याच्या जीवनात ज्ञानाला मध्यवर्ती स्थान नव्हते. निसर्गसंपत्ती, खनिजे, कच्चा माल, ऊर्जा, जमीन, प्राण्यांचे व माणसांचे शारीरिक श्रम, आर्थिक भांडवल, माहिती आणि तिच्यावर वेगाने व स्वस्तात संगणकीय प्रक्रिया करण्याची क्षमता इत्यादींना मध्यवर्ती स्थान होते. एकविसाव्या शतकापासून मात्र नव्या कर्मशील ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होताना आपण बघतो आहोत. या शतकात निसर्गसंपत्ती, खनिजे, कच्चा माल, ऊर्जा, जमीन, शारीरिक श्रम करणारी मोठी प्रशिक्षित लोकसंख्या, आर्थिक भांडवल इत्यादी घटक पुरेसे नसूनही केवळ ज्ञानाच्या, बौद्धिक संपदेच्या बळावर काही समाज, काही देश, काही उद्योग विलक्षण विकास करताना दिसू लागले आहेत. हे पूर्वी कधीही झाले नव्हते. कर्मशील ज्ञान आणि संपत्ती हे शब्द या शतकात समानार्थी होत आहेत.

गेल्या दोन शतकांत श्रीमंत देश अधिकाधिक श्रीमंत होत गेले, ते त्यांनी केलेल्या नव्या कर्मशील ज्ञानाच्या प्रचंड निर्मितीमुळे. केवळ विज्ञान-तंत्रज्ञानच नव्हे, तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या ज्ञानशाखांमध्ये अत्याधुनिक ज्ञानाच्या निर्मितीचा त्यांनी ध्यास घेतला. हे नवे ज्ञान समाजातल्या भेदाभेदांना पार करत सर्व स्तरांपर्यंत सतत वेगाने वितरित करण्याचा महाप्रयास त्यांनी केला. हे नवे ज्ञान जुन्या उपयुक्त ज्ञानाशी जोडत, जुन्या-नव्याचे एकात्मिक व्यवस्थापन त्यांनी केले. सर्वसामान्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देत, या नव्या ज्ञानाचा आर्थिक व सामाजिक विकासासाठी सतत परिणामकारकपणे वापर केला. नव्या ज्ञानाची इंटरनेटद्वारे जोडलेल्या लोकसमूहांच्या सहभागातून सहनिर्मिती, वितरण, व्यवस्थापन व सर्वसमावेशक विकासासाठी उपयोजन अशा विशिष्ट विकासनीतीतून वर उल्लेखिलेल्या चतु:सूत्रीने आकार घेतला. आता या ज्ञानाधिष्ठित प्रक्रियेला विकासाच्या क्षेत्रात मध्यवर्ती स्वरूप प्राप्त झाले आहे आणि ज्ञानप्रधान सभ्यता किंवा ज्ञानाधिष्ठित समाज आकाराला येत आहेत.  स्मार्ट फोनची जी किंमत आपण मोजतो ती त्याच्यातील जड पदार्थांच्या वजनासाठी नसून त्यामागील निसर्गविज्ञान, मनोविज्ञान, समाजविज्ञान, तंत्रज्ञान आणि कलात्मक आविष्कार यांच्या बौद्धिक संपदेसाठी (म्हणजेच मुख्यत्वे नवकल्पनांच्या आणि ज्ञानाच्या आशयासाठी) आहे. जशी कच्च्या मालाची आणि ऊर्जेची जागा ज्ञान घेत आहे, तशीच शारीरिक श्रमाची जागाही बौद्धिक श्रम घेत आहेत. आर्थिक भांडवलाची जागा कर्मशील स्वरूपातील ज्ञान-भांडवल घेत आहे आणि भौतिक किंवा आर्थिक मालमत्तेपेक्षा बौद्धिक संपदेला महत्त्व प्राप्त होत आहे. कंपन्यांचे बाजारमूल्य निश्चित करताना आता त्यांच्याकडील जमीनजुमला, प्लांट व मशिनरी किंवा आर्थिक मालमत्तेपेक्षा त्यांच्याकडील तज्ज्ञ मनुष्यबळ व त्यांची पेटंट्स आणि कॉपीराईट्स इ.च्या स्वरूपातील नोंदणीकृत बौद्धिक संपदा व त्यांचे बौद्धिक स्वामित्व हक्कच प्रामुख्याने विचारात घेतले जात आहेत.

ज्ञानाचा चहूबाजूंनी आणि सेकंदा सेकंदाला विस्फोट होत आहे. ज्ञानयुगाचे ते एक व्यवच्छेदक लक्षण आहे. अभिजनांची मक्तेदारी संपवत समाजाच्या अनेक स्तरांतील लोक आता ज्ञानाची निर्मिती करत आहेत. एकविसावे शतक सुरू होताना जन्मलेले विकिपेडिया आणि तत्सम मुक्त ज्ञानस्रोत हे सर्वसामान्य लोकांच्या ज्ञानक्षेत्रातील असामान्य अशा सामूहिक कृतीचे पहिलेवहिले नमुने आहेत. इंटरनेटमुळे भौगोलिक बंधने दूर सारून माहितीची सर्वदूर उपलब्धता आणि ज्ञानाची सहनिर्मिती विलक्षण वेगाने वाढत आहे. मानवी समाज जणू काही एका चिरायू अशा वैश्विक मेंदूची निर्मिती करत आहे आणि समाजातला प्रत्येक जण त्या मेंदूचा बव्हंशी मुक्त वापर करणार आहे. या पार्श्वभूमीवर, आता आपल्या देशाला गरज आहे – कोट्यवधी गरीब जनतेच्या जीवनातील वर उल्लेखलेल्या जटिल समस्या सोडवू शकणाऱ्या सर्जनशील, नवोन्मेषी ज्ञानकर्मींची. आणि अशा असंख्य संवेदनशील व लोकाभिमुख ज्ञानकर्मींची चळवळ कशी निर्माण करायची व कार्यरत ठेवायची, हे भावी काळातील युवा नेतृत्वासमोरील प्रमुख आव्हान असणार आहे. अक्राळविक्राळ स्वरूप धारण करणाऱ्या वरील समस्यांची अशी अपारंपरिक सोडवणूक न केल्यास प्रगत देशांचा व बहुराष्ट्रीय कंपन्यांचा नवा ज्ञानाधिष्ठित साम्राज्यवाद आपले शोषण करेल आणि मग आपल्या स्वातंत्र्याला ग्रहण लागेल. अशा साम्राज्यवादाला पूरक अशी भ्रष्ट व संधिसाधू (सत्ताधारी वर्ग, नफेखोर कॉर्पोरेट्स, विकाऊ मीडिया) यांची युती राज्यघटनेत अभिप्रेत असलेला आदर्श समाज प्रत्यक्षात आणू देणार नाही. असंघटित सामान्य जनतेच्या मागासलेपणाचा गैरफायदा उठवून अशा शक्तींनी केलेल्या आपल्या शोषणाचा इतिहास फार जुना नाही. आजही त्यांच्याकडून ते मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आपल्या देशातील ८० कोटी लोकांच्या भीषण दारिद्र्याचे ते मुख्य कारण आहे. दारिद्र्यमुक्त, विषमतामुक्त,  सर्जनशील, नवोन्मेषी, स्वतंत्र वृत्तीच्या, आधुनिक नैतिक/जीवन-मूल्ये जपणाऱ्या, पर्यावरणसंवर्धक आणि लोकशाही समाजाच्या निर्मितीची जबाबदारी नवे ज्ञानाधिष्ठित समाजविकासकेन्द्री नेतृत्वच पेलू शकेल. आपल्या देशाचे ‘भारत’ हे नाव या अर्थाने सार्थ करून दाखवणे, हे भावी युवा नेतृत्वासमोरील एक मोठे आव्हान आहे.

समान विचारांचे काही मित्र उभे करणं आणि पुढल्या पिढीला या प्रागतिक आणि संस्कारी  विचारांचं बाळकडू देणं गरजेचं आहे.वाद कुठल्याही गोष्टींनी उभा राहिला,तरी आपलं सत्व न गमावता,समाजाभिमुख विचार मांडत आत्मपरीक्षण करता यायला हवं. रोजच्या दगदगीतून वेळ काढत ‘मी माझा’ च्या पलीकडे जाऊन इतरांसाठी,समाजासाठी काहीतरी करायला हवं.एक सुरुवात कुणीतरी करायला हवी,तरच कदाचित त्यातून उद्याची रम्य पहाट उगवेल.सध्या जी आपल्यावर परिस्थिती ओढवली आहे,त्याचा नेमकेपणाने अभ्यास करून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.त्याबरोबर इतरांचा विचार करणेही तितकेच गरजेचे आहे.सध्या हे संकट किंवा ही लढाई कुण्या एकट्याची नसून आपल्या सर्वांची आहे.ही लढाई आपल्याला मैदानावर न लढता घरात बसून जिंकायची आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोनामय परिस्थितीमध्ये,आतातरी आपण आपले आत्मचिंतन करायला हवे आणि एक पाऊल ‘मी माझा’ च्या पलीकडे टाकायला हवे.

आशिष निनगुरकर, ९०२२८७९९०४

[लेखक चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत]

In बातमी लोकप्रिय लेख

Post navigation

तुमचे फुप्फुस निरोगी आहे का ?
डिजिटल मार्केटिंगमधल्या संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

एकाच दिवशी भक्तांना घेता येणार पाच देवींचे दर्शन; भाविकांना मिळणार सुविधा अकोला एसटी आगाराचे नियोजन

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा!

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

CRYOGENIC TECHNOLOGY (क्रायोजेनिक तकनीक) : भारत के गर्व और स्वाभिमान की कहानी

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 8 months Ago

Operation Sindoor | ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरचे कुटूंब मृत्युमुखी पडल्याची जैश कमांडरची कबुली; पहा व्हिडीओ

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
    Oct »