Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख

राजे…!

On 1 year Ago
VARHADVRUTT WEB TEAM

काळ बदलला, परिस्थितीने कूस पालटली तरी शिवाजीराजे या नावाचे महात्म्य तसूभरही कमी झालेले नाही. उलटपक्षी, बदलत्या परिस्थितीमध्ये बदलत्या संदर्भानिशी ते नव्याने समोर येते आणि आजही राजे असायला हवे होते, असे जाणवते. आक्रमकांना सळो की पळो करून टाकणारे, दुष्टांचे निर्दालन करणारे, प्रजेचा सन्मान करून आश्वस्त करणारे असे नेतृत्व प्रत्येक काळासाठी मिळायला हवे. शिवाजी महाराजांनी आपल्या कारकीर्दीमध्ये या सगळ्याचे असे मापदंड देऊन ठेवले आहेत की त्याचा अनुनय करण्याचा प्रयत्न केला तरी बरीच कल्याणकारी कामे मार्गी लागतील. म्हणूनच जयंतीनिमित्ताने राजांचे स्मरण करताना आजच्या काळात त्यांच्या विचारांचे महत्त्व काय, यावर चर्चा करणे गरजेचे ठरते. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका साम्राज्याचे संस्थापक नव्हते, तर एका आदर्श नेतृत्वाचे प्रतीक होते. त्यामुळे त्यांचे विचार आणि कार्यांचे महत्त्व केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही तर आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. सध्याच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. राजांचे नेतृत्व आणि ध्येयधोरणे पाहता ते दूरदृष्टीचे आणि आदर्शवादी राजे होते. त्यांनी स्वराज्य हा संकल्प उभा केला आणि त्यासाठी अपार परिश्रम घेतले. आजच्या काळात, विशेषतः तरुणांना नेतृत्वगुण आत्मसात करण्यासाठी आणि स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी महाराजांच्या या जिद्दीचा आदर्श घेता येईल.
दुसरी बाब सामाजिक समता आणि न्यायाची आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात जातपात, धर्मभेद न मानता सर्वांना समान न्याय दिला. त्यांनी हिंदू-मुस्लिम एकतेचा आदर्श घालून दिला. आजच्या काळात जातीयतेच्या आणि धार्मिक द्वेषाच्या पृष्ठभूमीवर सामाजिक सलोख्यासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरू शकतात. महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता हा आज ऐरणीवर आलेला मुद्दा आहे. या पृष्ठभूमीवर पाहता शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यात महिलांसाठी स्वतंत्र संरक्षण यंत्रणा उभारली होती. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना त्यांनी कठोर शासन केले. ते बघता आजच्या समाजात महिलांच्या सुरक्षिततेबाबत वाढत्या समस्यांसाठी त्यांचे विचार आणि धोरणे प्रेरणादायी ठरू शकतात. आत्मनिर्भरता आणि स्वावलंबन प्रत्येक काळात महत्त्वाचे असतेच. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था आणि जलदुर्ग, गडकोट यांची मजबूत व्यवस्था निर्माण केली. आजच्या आर्थिक संकटांच्या काळात ’मेक इन इंडिया’ आणि स्वदेशी उत्पादनांना चालना देण्यासाठी त्यांचा हा आदर्श उपयुक्त ठरणारा आहे. खेरीज राजांनी शिस्त आणि युद्धनीतीचेही कालातीत धडे दिले. त्यामुळेच त्यांचा गनिमी कावा आणि गुप्तचर यंत्रणा आजच्या संरक्षण आणि धोरणात्मक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब ठरू शकते. आजच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी त्यांच्या शिस्तप्रियतेचा आदर्श प्रेरणादायी आहे. पर्यावरण आणि त्याच्या रक्षणासंबंधीचे प्रश्न भेसूर रूप घेत आहेत. त्याकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण निसर्गचक्र धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पर्यावरण संवर्धन आणि गडसंवर्धनासाठी महाराजांनी घेतलेले निर्णय अभ्यासण्याजोगे ठरतात. शिवाजी महाराजांनी गडदुर्गाच्या संवर्धनावर विशेष भर दिला. त्यांचे गडदुर्ग आपल्या ऐतिहासिक वारशाचा भाग आहेत…. तेव्हा त्यांचे संरक्षण करणे आणि पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. थोडक्यात, जयंतीनिमित्त केवळ साजरीकरणामध्ये दंग न राहता छत्रपती शिवरायांच्या विचारांनुसार आचरण ऽ करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अपेक्षित असणारा समाज आपण घडवू शकतो.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात या वीरपुरुषाच्या कथांमधून मिळालेले वीरश्रीचे बाळकडू पाझरले आहे. त्यांच्या जीवितकार्यातल्या प्रत्येक तेजोमय प्रसंगाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला कोपरा उजळला आहे. आपल्याला रणाचा परिचय नाही, पण राजांची रणनीती आयुष्यातल्या बारीकसारीक प्रसंगांमध्येही मार्गदर्शक ठरते. आता कोणी शाहिस्तेखान, अफझलखान आपल्यावर चालून येणार नाही, पण त्यांच्या कथा ऐकून मोठे झाल्यामुळे गोड बोलून पाठीत वार करू शकणाऱ्या प्रत्येक शत्रूप्रती आपण सजग राहात आहोत. शिवसाम्राज्यानंतर काही शतकांचा काळ उलटला असला, तरी आजही प्रचंड उत्साहात आणि दिमाखात शिवरायांची जयंती साजरी होणे आणि प्रत्येक पिढीने तेवढ्याच आनंदाने त्याचा भाग होण्याचा प्रयत्न करणे हाच या व्यक्तिमत्त्वाचा गौरव आहे.
राजांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रेमाबरोबरच भक्तीही आहे. ही भक्ती तो प्रतिपालक, धनी, नेता, धुरंधर असल्याबद्दल आहेच; त्याहीपेक्षा अधिक अखंड जनकल्याणाचा विचार केल्यामुळे आहे. याच जनांच्या कल्याणासाठी मिसरुडे फुटायच्या वयापासून वृद्धत्वाची साद ऐकू येण्याच्या वयापर्यंत त्यांनी अनंत संकटांचा सामना केला. आपल्या मावळ्यांना प्राणपणाने जपले. प्रजेवर पुत्रवत प्रेम केले. म्हणूनच तख्त इतिहासजमा झाले तरी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आरुढ आहेत. त्यांच्याप्रती असणारे मनामनातले प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. स्वराज्य आणि शिवराय हे अद्वैत महाराष्ट्राच्या ललाटावरील टिळ्यासम आहे. आजही कोणताही गड चढताना इथे शिवप्रभूंची पायधूळ झडली असेल, या विचाराने प्रत्येक जण भारावून जातो. रायगडावरील शिवरायांच्या प्रतिमा दृष्टीस पडताच डोळे भरून येतात, समाधीचे दर्शन घेताना प्रत्येक जण भावुक होतो. शिवरायांचा असा महिमा असल्यामुळेच महाराष्ट्राची मातीही त्यांची जयंती साजरी करते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे शिवप्रभूंच्या चरित्रातून घेण्यासारखे खूप काही आहे. किंबहुना, त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अध्यायच अभ्यासण्याजोगा आहे. मावळे आणि सह्याद्री यांची साथ असल्याशिवाय संघर्ष सफल होणार नाही, हे या द्रष्ट्याने आधीच ओळखले होते. यातूनच शिबवांना गडकोटाच्या अभ्यासाची आणि सामान्यजनांचे सुख-दुःख जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली. आदिलशाही सत्तेने आक्रमण करून शहाजीराजांची जहागिरी बेचिराख केली. आधी गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्याच्या भूमीवर राजमाता जिजाऊने १२ वर्षांच्या शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवला आणि एका सुवर्णकाळाचा आरंभ झाला. यवनांनी उद्ध्वस्त केलेल्या कसबा गणपती मंदिराचा शिवबाने जीर्णोद्धार केला. एका नव्या युगाला, आरंभाला गणेशाचे आशीर्वाद मिळाले. दुसरीकडे शिवबांनी उद्ध्वस्त जहागिरीची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली. त्यांनी देशमुख- देशपांडे या वतनदारांच्या माध्यमातून रयतेशी संपर्क साधला आणि पुनर्वसाहतीसाठी नागरिकांचे सहकार्य मागितले. पण जनता अस्मानी आणि सुलतानी संकटाने ग्रासली होती. त्यांच्याकडे घालायला कपडा, पोटाला घास, दावणीला बैल आणि राहण्यासाठी निवारा नव्हता. जमीन पडीक होती. ही विदारक अवस्था जाणल्यानंतर शिवबाने प्रत्येकाला गरज असेल तशी मदत करण्याचे जाहीर केले. अवजारे नसलेल्यांना अवजारे दिली, अन्नाचा घास नसणाऱ्यांना खंडी-दोन खंडी धान्य दिले, शेतीच्या कामासाठी बैल नसणाऱ्यांना ती मदत देऊ केली. अशा प्रकारे त्यांनी मूलभूत प्रश्नांपासून रयतेची सुटका केली. त्यांनी पडीक जमीन लागवडीखाली आणणाऱ्याला पाच वर्षे सारा माफ केला. १७ व्या शतकात अशा प्रकारे करमुक्त व्यवस्था निर्माण करून शिवबाने पडीक जमीन लागवडीखाली आणून कृषिप्रधान देश बनवण्याचा आरंभ केला. म्हणजेच त्यांच्या प्रयत्नाने एकेकाळचा सुवर्ण भारत नव्याने उदयाला येण्याची
आशा निर्माण झाली. त्यांनी आदिलशाही सत्ता, निजामशाही आणि मुघल यांची सत्ता आकारत असणारा ६० टक्के कर ३३ टक्क्यांवर आणला.
अर्थातच हा सारा सुपीक जमिनीसाठी होता. आजच्या भाषेत बोलायचे तर कराचे प्रमाण निम्म्यावर आले. या निर्णयामुळे शहाजी राजांच्या जहागिरीतला शेतकरी कामाला जुंपला गेला. शिवाजी महाराज पुणे प्रांतात येण्याआधी या जहागिरीतली केवळ ४० टक्के भूमी लागवडीखाली होती. गुणग्राहकता हा शिवाजी महाराजांचा आणखी एक खास गुण होता. जनतेतल्या प्रत्येक माणसाला ते मानसन्मान देत असत. थोडक्यात, आजच्या युगातही त्यांचा आदर्श घेतल्यास एक न्यायप्रिय, सुरक्षित आणि आत्मनिर्भर समाज घडवता येईल. त्यांच्या शिकवणींना अनुसरून कार्य केल्यास भारत अधिक सक्षम आणि सशक्त राष्ट्र म्हणून उभे राहील, यात शंका नाही.

मंजिरी ढेरे

In बातमी महाराष्ट्र विशेष लेख

Post navigation

राजा आणि राजपुत्र
दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ‘स्वागताध्यक्ष’ या नात्याने शरद पवार यांचे मनोगत…….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

खूप जास्त स्क्रीन वेळ मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, त्याचा परिणाम मुलांच्या हृदयावर आणि मनावर होतो

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

क्या है प्रधानमंत्री सूर्योदय योजना?

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

‘भारतरत्न’ मिळालेल्यांना मिळतात ‘या’ सुविधा

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 8 months Ago

आयुर्वेदिक दृष्टिकोनातून थायरॉईड समस्यांवर नैसर्गिक उपाय — शरीरातील संतुलन राखून मिळवा मुक्तता!

February 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
2425262728  
« Jan   Mar »