Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख

कवितेतील स्त्री…

On 1 year Ago
VARHADVRUTT WEB TEAM

मराठी कवितेच्या इतिहासाकडे पाहिले तर सामाजिक, प्रेम, निसर्ग, स्त्री जाणिवा अशा विविध प्रकारच्या कवितांनी रसिकांना मनमुराद आनंद दिलेला आहे. विविध अंगांनी बहरलेली ही कविता एकूणच मराठी साहित्याला खूप उंचीवर घेऊन गेलेली दिसते. काव्यातील भावसौंदर्य, आशयसौंदर्य, त्यातील लय, प्रांजळपणा यामुळे कविता अधिकाधिक संपन्न झालेली प्रत्ययास येते. स्त्रीवर होत असलेला अन्याय, तिला मिळत असलेले दुय्यम स्थान, तिचा भावनिक कोंडमारा, तिचा एकूण जीवनपटच अत्यंत भावपूर्णतेने कवयित्रींनी व्यक्त केलेला दिसतो.

कवयित्रींनी अन्यायाबद्दल चीड व्यक्त करून बंडखोरीची वृत्ती दाखवली आहे. काव्याचा हा प्रवास फार मोठ्या परिवर्तनाची ओळख करून देतो. इतकेच नाही तर स्त्री म्हणून स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा विचार करताना तिला काही हक्क आहेत. विशेष म्हणजे मनही आहे आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही आहे. स्त्री जाणिवेच्या या काव्यांचा विचार करताना काव्यातील वेगवेगळे बदल, प्रवृत्ती व परखडपणे मांडलेले विचार या सर्वांचे स्वरूप लक्षात येते.

महानुभाव पंथातील मराठीतल्या आद्य कवयित्री आणि चक्रधर स्वामींच्या शिष्या महदंबा उर्फ महादाईसा, उमाईसा, बाईसा, नागासा तसेच समर्थ रामदास स्वामींनी स्त्री- पुरुष भेद न मानता स्त्रियांनाही शिष्य म्हणून उपदेश दिला होता. वेणाबाई, बयाबाई, अक्काबाई अशा किमान ५० स्त्री कवयित्री समर्थ प्रतापमध्ये आढळतात. त्यानंतर मराठी स्त्री काव्याची गंगोत्री संत जनाबाई, मुक्ताबाई, वेणाबाई, बहिणाबाई, प्रेमाबाई, कान्होपात्रा, मीराबाई, सोयराबाई आदी संत कवयित्रींच्या शब्दांनी खळखळून निघाली. बदलत्या काळासोबत प्रचलित काव्य परंपरेला वैचारिक दृष्टीने नवे वळण, नवी दिशा मिळत गेली.

‘काळाच्या दाढेतून’ हे आत्मपर दीर्घकाव्य लिहिणाऱ्या मनोरमाबाई रानडे, आधुनिक आद्य कवयित्रीचा मान मिळवलेल्या लक्ष्मीबाई टिळक, निसर्गकन्या सरस्वतीची लेक बहिणाबाई चौधरी या नावाचा उल्लेख करताच ‘अरे संसार संसार’, ‘मन वढाय वढाय’, ‘माझी माय सरोसती’ ही गाणी सहज ओठांवर येतात. मातीच्या सहवासात राहिलेल्या बहिणाबाईंच्या स्वभावात सहाजिकच काळ्या आईची सहनशक्ती, कणखरपणा, मृदुता हे गुण उतरलेले दिसतात. अनेक प्रकारच्या कष्टकरी स्त्रिया, मोलमजुरी करणाऱ्या स्त्रिया, संसाराचा गाडा ओढणाऱ्या स्त्रिया, शेतावर कष्ट उपसणाऱ्या स्त्रिया, सासूरवाशीण, माहेरवाशीण आदी सर्व स्तरातील स्त्रियांच्या सुख-दुःखाची नोंद बहिणाबाई अगदी सजगपणे घेतात. अशाच एका कष्ट उपसणाऱ्या सासूरवाशीण स्त्रीचे दुःख व्यक्त करताना बहिणाबाई म्हणतात…

उठ सासूरवाशीण बाई,

उठ जानं शेती कामाचा किती घोर,

तू गोठ्यामधलं ढोर….

उठ सासुरवाशीण बाई

सुरू झाली वटवट कातवली वो सासू,

पुस डोयांतले आसू.

इंदिरा संत यांच्या कवितेतील भाषा व अभिव्यक्ती सूक्ष्म निरीक्षणातून व्यक्त झालेली दिसते. त्यांच्या कविता वैयक्तिक अनुभवांचा आरसा आहेत. स्त्रीच्या दैनंदिन जीवनाची कैफियत मांडताना त्या म्हणतात…..

आधुनिक स्वतंत्र स्त्री, स्त्रीचा विकास,

स्त्रीची प्रगतिपथावरील वाटचाल इत्यादी इत्यादी

आकडेवारीची प्रगती तर सूर्यापर्यंत पोचणारी

आधुनिक मराठी कवितेमध्ये स्त्रीवादी भूमिका अधिक ठळकपणे मांडणाऱ्या कवयित्रींपैकी अरुणा ढेरे यांचे नाव महत्त्वाचे आहे. स्त्रीजीवनातील सुखदुःखांचा आलेखच ढेरे यांची कविता साकारताना दिसते. स्त्रीजीवनाच्या दुःखाचा पटच त्यांनी ‘बायका’ कवितेतून मांडला आहे.

भर माध्यान्ही नदीवर

खळबळून जातात

चुबकून निघतात धुण्यागत बायका

सुस्कारा टाकून पदराने चेहरा पुसून घेतात

आल्या दुःखाचे पिळे होऊन घराकडे परतून येतात

चुलीच्या जाळाबरोबर

मग धगधगून उठतात बायका, तांबड्याबुंद होत जातात.

आईची अनेक रूपे मराठी कवितेने अनुभवली आहेत. स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या अनं यातनांमध्येही आईपणाचे एक अपरंपार सुख आहे. अगदी हळूवार भूमिका म्हणजे आईची.

‘इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात

जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून’

हिरा बनसोडे यांनी स्त्रियांच्या मूकभावना अशा व्यक्त केल्या आहेत. स्त्रीचे हे संवेदन अनुभवाशी सहजपणे एकात्म झालेले दिसते. स्त्रीत्वाच्या बंधनामुळे स्वतःचे व्यक्तित्व दडपले जात असल्याची जाणीव आणि अश्विनी धोंगडे यांनी तिच्या सुखदुःखांचा घेतलेला शोध पुढील ओळीतून दिसतो, ‘तडजोड म्हणजे तडकणं पुरुषाचं आणि सांधेजोड बाईची आयुष्याचे वस्त्र फाडफाडून संसाराला ठिगळ लावण्याची…’ डॉ. सुवर्णा सोनारे-चरपे यांच्या

‘आई संयमाच्या धाग्याने बाबांचा खिसा

बारीक शिवायची…

तेव्हा बाबांच्या खिश्यात उमेदीची नाणी खणखण वाजायची…

या कवितेतील धीरोदात्त स्त्री पुरुषाच्या अंत:करणातील संयमाच्या ज्योतीला तिच्या सामंजस्येच्या ओंजळीने कसोशीने जपते, सांभाळते तेव्हा तो पुरुष पुरुषार्थ सिद्ध करू शकतो. स्त्रीमधील नेतृत्व गुण, निर्णय क्षमता, परिस्थितीला तोंड देण्याची चिवट वृत्ती, तिच्यातील खंबीर आत्मविश्वास या तिच्या बळकट बाजू समजून घेऊन तिच्यावर विश्वास ठेवणारे कमीच. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे प्रत्येकाने समजून घ्यावेत, असे प्रीतम ओगले यांना वाटते. त्या म्हणतात….. ‘स्वाभिमानी ती प्रखर, झुंजार ती काळवेळी भिरभिरते नजर शोधे, विश्वास आभाळी तिच्या मनाच्या तळाशी, कोणी पोचतच नाही बाई माणसाची नाडी, कुणा कळतच नाही’ जगदंबा आणि सावित्रीचा वारसा मोठ्या अभिमानाने आम्ही मिरवतो. पण आजचे अत्याचारी साम्राज्य उलथवून टाकण्याची ताकद आमच्यात असतानाही आम्ही अन्याय- अत्याचार मूकपणे सहन का करतो? मुळात हा अन्याय-अत्याचार होऊ नये यासाठी आपण काय करतो? असे प्रश्न रसिका तेंडोलकर आपल्या कवितेतून पोटतिडकीने मांडताना दिसतात,

‘जगदंबा सावित्रीच्या

लेकी आम्ही शक्तिशाली अत्याचारी

साम्राज्यात

आजसुद्धा मूकबळी’

असं म्हणत सक्षमतेने उभं राहण्याची ताकद देताना दिसतात,

‘आज लढा स्वतःशीच

मरगळ झाडायची

सक्षमता स्वतंत्रता आमरण जपायची’

अनेक इच्छा-आकांक्षांना मूठमाती देऊन ती विवाहानंतरच्या जीवनात प्रवेश करीत असताना केवळ माहेरच्या नात्यांचा निरोप

घेते. तिला मनातील विचार पुसून टाकावे लागतात, मग तिच्या जीवनाची सुरू होते एक अनोखी संघर्षमय वाटचाल, ‘तिनं पटपट गुपचूप करून टाकलं तिच्या न

कुणाच्याही नकळत आणि मग एक कोरी जागा,

श्वास घेत चालू लागली, पावला मागनं

पाऊल’

मल्लिका अमर शेख यांचा हा भावनोद्गार जीवनातील वास्तवाकडे अंगुलिनिर्देश करणारा आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषाने स्त्रीला काही अधिकार, व्यक्तिमत्त्व दिलं नसलं तरी अनुराधा पाटील यांना मात्र ‘माझं आयुष्य तुझंच आहे’ अशी सजग जाण,

‘जागोजाग तडे गेलेल्या जमिनीसारखं हे आयुष्य

अखेर तुझं आहे

जरी त्याच्या इच्छेशिवाय हलणार नसेल झाडाचंही पान’

या कवितेतून दिसते.

मनीषा पिंपळखरे यांना मनातील दुःखही देवपूजेतील सुवासिक गंधाप्रमाणे भासते. एकूणच आधुनिक कवितेच्या संदर्भाचा विचार करीत असता बहिणाबाई चौधरी ते

कल्पना दुधाळ, मधल्या टप्प्यावर अनुराधा पाटील या कवयित्रींनी बदलती कृषिप्रधान व्यवस्था यावर कवितेतून भाष्य केले, तर प्रभा

गणोरकर, प्रज्ञा दया पवार, मल्लिका अमर शेख यांनी महिलांचे होत चाललेले वस्तुरूप शब्दबद्ध केले. त्याचबरोबर हिरा बनसोडे,

उषा अंभोरे, उषा खंदारे, छाया कोरेगावकर, आशालता कांबळे, कमल गरूड आदी

अनेकांच्या कवितेतून समग्र व्यवस्थेचा वेध घेतल्याचे प्रत्ययास येते. पुरुषप्रधान समाज रचनेमध्ये स्त्रिया आज

स्वत:चे स्वतंत्र जग निर्माण करीत आहेत. आपल्या जीवनातील दुःखं दूर करायची असतील तर पुरुषांवर अवलंबून न राहता स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा विचार करीत आहेत. त्यांना ठाऊक आहे की संस्कृतीचे, बंधनाचे काटे बोचणार आहेत. याबाबत कवयित्री नीलम माणगावे यांच्या ‘पैजण’ कवितेतील स्त्रियांच्या चार पिढ्या आणि त्यांचे संघर्ष नि त्यातून मिळवलेले स्वातंत्र्य याचा विचार मांडला आहे, तो अधिक सक्षम करणारा वाटतो,

‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे

पायच होऊ दे आता घट्ट, मजबूत, पोलादी पुढल्या का होईना शतकाआधी!

नारायण गिरप

 लेखक ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक

In बातमी महाराष्ट्र विशेष लेख

Post navigation

शीना बोरा हत्याकांड
रंगांचा उत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 6 months Ago

राम मंदिर ध्वजावरील तीन पवित्र चिन्हांचे धार्मिक महत्त्व

  • आरोग्य
  • बातमी
  • राजकीय
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

ओव्याच्या पानात असतात अनेक औषधी गुणधर्म

  • काव्याधारा
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

पुस्तक परिचय…. चूल

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

महादेव बेटिंग ॲपचा मालक सौरभ चंद्राकरला दुबईत अटक, लवकरच भारतात आणले जाईल

March 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Feb   Apr »