Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • विशेष लेख

पाकिस्तान का बुडतोय?’

On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

वऱ्हाडवृत्त डिजिटल

पाकिस्तान सध्या अस्मानी संकटामुळे पार पिचून गेला आहे. या पावसाळ्यात तेथेपावसाने थैमान मांडले असून सगळीकडे पूर आला आहे. हा पूर इतका भयंकर आहे की, यात हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत तर दहा लाख घरे नष्ट किंवा नुकसानग्रस्त झाली आहेत. तीस लाख लोक बेघर झाले आहेत. संपूर्ण जगातून मदतीसाठी पाकिस्तान याचना करत आहे. संयुक्तराष्ट्रांनीही मदतीचे आवाहन केले आहे. पाकिस्तानला मदत देण्याबाबत भारतही त्या देशाच्या संपर्कात आहे. भारतातही अनेक ठिकाणीपुराचे थैमान सुरू आहे. या पुरामागे नेमकी कोणती कारणे आहेत आणि या निमित्ताने भारत-पाक संबंधांत काही फरक पडणार आहे का, याचा ऊहापोह करणारा लेख.

रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमधून दिसून येणारी पाकिस्तानातील पुराची दृष्ये थरकाप उडवणारी आहेत. पाकिस्तानात मान्सूनमुळे सर्वसाधारणपणे पूर येतो;पण यावर्षीचा पूर म्हणजे महाप्रलय म्हणावा इतका भयंकर आहे. या पुरात म ठमोठ्या इमारती वाहून गेल्या आहेत, शहरे बुडाली आहेत आणि लाखो लोक बेघर झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी या पुराचे वर्णन पाऊस ‘स्टेरॉईड्स’वर असल्यासारखे वाटते आहे, असे केले आहे. हवामान बदल हे या पूराचे मुख्य कारण सांगितले जात आहे. देशाच्या उत्तरेकडील हिमनद्या वितळत असल्यामुळे पुराने अक्राळविक्राळ रूप धारण केलेल्याचे सांगण्यात येत आहे.

या पुरात आतापर्यंत एक हजारो लोक मरण पावले आहेत. तर पाकिस्तानचा एक तृतीयांश भूभाग पाण्याखाली गेला आहे. दहा लाख घरे नष्ट झाली आहेत किंवा त्यांची पडझड झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी सोळा कोटी डॉलरची तातडीची मदत पाकिस्तानला पाठवली आहे पण पुरामुळे उद्ध्वस्त झालेली गावे, शहरे पुन्हा उभी करण्यासाठी १० अब्ज डॉलरपेक्षाही अधिक खर्च येईल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनीच व्यक्त केला आहे. पाकिस्तान हवालदिल झाला आहे. या पुरात संकटनिवारणाचे आणि मदतीचे कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्तेही या पुराची भीषणता पाहून हबकले आहेत. हा त्या देशाच्या इतिहासातील सर्वात भयंकर पूर असल्याचे मत हवामानतज्ज्ञही व्यक्त करत आहेत. पाकिस्तानात गेले आठ आठवडे सतत पाऊस पडत आहे आणि त्याचाच परिणाम या पुरात झाला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात तर ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून नेहमीपेक्षा नऊ पटीने जास्त पाऊस पडत आहेत. तर संपूर्ण पाकिस्तान हे प्रमाण पाचपटीने जास्त आहे. केवळ पाकिस्तानातच नाही तर संपूर्ण जगातच पावसाने थैमान घातले आहे. जगात अगदी अमेरिकेपासून अनेक देशात प्रचंड पूर आले आहेत. तर चीनसारखे देश दुष्काळाचा सामना करत आहेत.

हवामान बदलाचा परिणाम

शास्त्रज्ञ जागतिक तापमान वाढण्याचा कितपत परिणाम पाऊस पडण्यावर होतो हे निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी पाकिस्तानात २०१० मध्ये मोठा पूर आला होता. यावेळी त्याहीपेक्षा परिस्थिती गंभीर आहे. २०१० मध्ये आलेल्या पुरामागे जागतिक तापमान वाढ हे प्रमुख कारण होते. त्यावेळी ‘आर्टेिक्ट’ म्हणजे उत्तरध्रुवावर तापमान वाढले होते आणि जगातील समद्रांमध्ये बाष्पीभवन जास्त प्रमाणात झाले होते, असे एका संशोधनात स्पष्ट झाले होते. त्यावेळी ‘जेट स्ट्रीम’ म्हणजे पृथ्वीभोवती फिरणारे उच्च स्तरीय वारे, यावर वाढत्या तापमानाचा परिणाम झाला आहे आणि हे वारे जास्त प्रमाणात वाहत राहिल्याने २०१० मध्ये पाकिस्तानात अधिक प्रमाणात पाऊस झाला तर रशियात त्या वर्षी उष्णतेची तीव्र लाट आहे. २०२१ मध्ये झालेल्या संशोधनानुसार जागतिक तापमान वाढीमुळे भारतीय उपखंडातील मान्सून अधिक तीव्र आणि लहरी झाला आहे. जागतिक तापमानात १ सेल्सियसने वाढ झाली तर पाऊस ५ टक्के अधिक पडतो. २०१० नंतर पाकिस्तानात नियमितपणे पूर येत आहे. आत्ता आलेला हा पूरही त्या नियमिततेचाच एक भाग आहे. दरवर्षी पावसाचा अतिरेक पाकिस्तानच्या पाचवीलाच पूजला आहे. या वर्षीचा पूर २०१० पेक्षाही भयंकर आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे उंचावरून उताराकडे खूप वेगाने पाणी येते आणि त्या पाण्यात अनेक गावेच्या गावेही वाहून जातात. अशा वेळी आधी सावधगिरीचा इशारा देऊनही काही उपयोग नसतो. पुरामुळे होणारे सर्वाधिक नुकसान या अशा उंचावरून उताराकडे वेगाने वाहत येणाऱ्या पाण्यामुळे होते.

पावसाचे पाणी न थांबण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे जंगलतोड. प्रचंड वृक्षतोडीमुळे पाणी जमिनीत मुरत नाही, असे पर्यावरण तज्ज्ञ म्हणतात. तर पाकिस्तानी पर्यावरण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार काबूल नदीवरील धरणे नष्ट

करण्यात आली, हेही या पुराचे एक कारण आहे. खरे पाहता पाकिस्तानला कायमच हवामानाच्या लहरीपणाचा फटका बसत आला आहे. हवामानज्ज्ञ स्कॉट डंकन यांच्या मते पॅसिफीक महासागरातील वाऱ्यामधील चढउताराचा परिणाम पाकिस्तानात पूरसमस्या निर्माण होण्यात झाली आहे. जागतिक हवामान धोका जास्त प्रमाणात असलेल्या देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक आठवा लागतो. या वर्षी मार्च ते मे या कालावधीत पाकिस्तानात उष्णतेची लाट आली होती आणि त्या पाठोपाठ पावसाचा हा धुमाकूळ, याचा या देशातील लोकांवर आणि आर्थिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे.

अर्थात पाकिस्तानात आलेला पूर आणि भारतातही विविध ठिकाणी आलेले पूर यात बरेच साधर्म्य आहेत. जागतिक तापमान वाढीचे परिणाम भारतापलिकडेही आता दिसू लागले आहेत. प्रत्येक हंगाम आता तीव्र होऊ लागला आहे. उन्हाळ्यात उष्णतेची लाट, पावसाळ्यात पर आणि हिवाळ्यात थंडीची लाट हे आता अंगवळणी पडू लागले आहे. यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होत आहे. हवाम नबदलाच्या समस्येकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

भारत–पाकिस्तान संबंध

या नैसर्गिक आपत्तीने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भिंत पडायला सुरूवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानातील पुराबद्दल आणि पूरग्रस्त लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे ट्रीट केले, त्यावर पाकिस्तानातून सकारात्मक प्रतिसाद आला. यापूर्वी आलेल्या पुरावेळी भारताने देऊ केलेली मदत पाकिस्तानने नाकारली होती. यावेळी काश्मीरसंबंधी ३७० कलम रद्द केल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानने भारतातून होणाऱ्या आयातीवर बंदी घातली होती. आता ती बंदी उठवण्याचा विचार पाकिस्तान सरकार करत आहे. भारतातून भाजीपाला आणि अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तू पाकिस्तानात जलद गतीने पोचतील याची जाणीव त्या देशाला झाली आहे. आत्ता तरी पाकिस्तानला या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे. भारताने मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत द्यायची तयारीही दर्शवली आहे. यातून पुढेही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुरळीत होतील अशी अपेक्षा करणे धाडसाचे ठरेल. आजपर्यंत पाकिस्तानबरोबरचे संबंध ही भारताची गरज असल्याचे भासवले जात होते. म्हणूनच त्या देशाकडून अनेक कुरापती झाल्या तरी भारताकडून चर्चेचे गु-हाळसुरूच ठेवले जात होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ही परिस्थिती बदलली. पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरचा संवाद पूर्णपणे बंद करून टाकला आहे. याला आता सहा वर्षे झाली आहेत. पठाणकोट नंतर कलम ३७० आणि बालाकोट ‘सर्जिकल स्टाईक’ यामुळे तर पाकिस्तान पुरता कोंडीत सापडला आहे. कलम ३७० रद्द झाले तेव्हा इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यांनी भारताबरोबरच्या सर्व प्रकाराच्या व्यापारावर बंदी आणली. आता कलम ३७० पुन्हा लागू होणे शक्य नाही. मग मतदान प्रक्रियेत काही बदल करता येतील, असा अंदाज आहे; पण जोपर्यंत जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत या आघाडीवर काही होणार नाही. मुळात पाकिस्तानच्या मर्जीने भारत त्याचे काश्मीर धोरण चालवेल का, आणि का चालवेल हे प्रश्न आहेत. २०१४ च्या पूर्वी काश्मीरमध्ये पाकिस्तानचा असलेला प्रभाव पूर्णपणे नष्ट करण्याचा चंग भारत सरकारने बांधलेला असताना आता काश्मीर मुद्यावरून आपण पाकिस्तानबरोबर कोणतीही तडजोड करण्याची सुतराम शक्यता नाही. सध्या अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला मानवतेच्या दृष्टीकोनातून गरज असेल तर भारत मदत करायला तयार असू शकतो; पण ती मदत नाकारण्याचा उद्दामपणा पाकिस्तानने केला तर भारताबरोबर संबंध सुरळीत होण्याचे स्वप्नही त्या देशाला पाहता येणार नाही.

In बातमी विशेष लेख

Post navigation

“सत्कार प्रतिभेचा सन्मान कवीचा ” या सत्कार समारंभाचे आयोजन
स्लिप डिस्क : आजारापासून सहज कसे मुक्त होऊ शकतो!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

उष्णताही साठवणे शक्य; आयआयटीचे संशोधन

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

सिंदखेडराजा येथे उत्खननात आढळली विष्णूची दुर्मिळ मूर्ती

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 11 months Ago

Shri Sant Vasudev Maharaj  | पंढरीचे महावारकरीः सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
    Oct »