#CM_Devendra_Fadnavis | राज्यातील भोंग्यांमुळे परिसरातील लोकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत उपस्थित केला. ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता . राज्यात कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल.
जर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कारवाई करण्यात येईल. नियमांची अंमलबजावणी होतेय की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकावर निश्चित केली जाईल. जर पोलीस निरीक्षकाने याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे भोंगे आहेत त्याची परवानगी घेतली पाहिजे, हे भोंगे रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद असले पाहिजेत. तर सकाळी ६ ते रात्री १० या काळात सकाळी ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा असावी, त्यापेक्षा जास्त नको असे काही निर्देश कोर्टाने दिले आहेत.
“तसेच यापुढे कुणालाही सरसकट भोंग्याची परवानगी देण्यात येणार नाही. जी परवानगी मिळेल ती निश्चित कालावधीसाठीच देण्यात येईल. या कालावधीनंतर पुन्हा भोंगा लावायचा असेल तर त्याची परवानगी पोलिसांकडून घेतली पाहिजे. ज्याठिकाणी ५५ डेसिबल, ४५ डेसिबल आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन होईल तिथे पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही. जे काही भोंगे असतील त्यांची जप्ती केली जाईल. याबाबत पालन होतंय की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. CM Devendra Fadnavis |
दरम्यान, प्रत्येक पोलीस निरीक्षकाने त्यांच्या विभागातील प्रार्थना स्थळात जाऊन भोंग्याची परवानगी घेतलीय की नाही हे तपासलं पाहिजे. आपण सगळ्यांना मीटर दिलं आहे, त्यात आवाजाचं डेसिबल मोजता येते. ही मशीन प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे. प्रार्थना स्थळावरील डेसिबल मोजून जर आवाज जास्त असेल तर पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाला कळवणे, त्यांच्यामार्फत कारवाई करणे आणि दुसरं जे उल्लंघन करतील त्यांना पुन्हा परवानगी न देणे अशी कारवाई केली जाईल. याबाबत सगळी कारवाई केंद्रानं ठरवल्यानुसार MPCB ला करायची आहे, असे फडणवीसांनी सांगितले आहे.
…. तर पीआयवर कारवाई होणार
जर हे नियम बदलले तर अधिक प्रभावीपणे यावर कारवाई करता येईल. यावर केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल. आम्ही जे बदल यात सूचवत आहोत ते केंद्राने करून द्यावेत. जेणेकरून त्या बदल्यांच्या अनुरूप भोंग्याबाबत अत्यंत कडक कारवाई करता येईल. या संदर्भात पालन केलं पाहिजे ही जबाबदारी पीआयची असेल, कारवाई केली नाही तर पीआयवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
देवयानी फरांदे काय म्हणाल्या?
राज्यात प्रार्थनास्थळांवर असणाऱ्या भोंग्याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी मांडली. अजान म्हणणं हा धार्मिक भावना आहे परंतु भोंगा कुठल्याही धार्मिक भावनेशी संबंधित नाही. यामुळे ध्वनी प्रदूषण होते. मशिदीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना भोंग्यातून होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाचा त्रास होतो. १७ एप्रिल २०२२ रोजी नाशिक शहरात तत्कालीन पोलीस आयुक्त यांनी सरकारला पत्र पाठवले होते. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने तेव्हा काही कारवाई केली नाही. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने बेकायदेशीर भोंग्यावर कारवाई केली होती. हायकोर्टाने यावर मार्गदर्शक सूचना दिली आहे त्यापलीकडे जाऊन हे विधिमंडळ कायदा करून भोंगे बंद करणार का? असा प्रश्न आमदार फरांदे यांनी विचारला.
