मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास बातमी लेखनाची गुणवत्ता आणि वेग दोन्ही वाढू शकतात, असे मत एआय तज्ज्ञ किशोर जस्नानी यांनी व्यक्त केले. एआय टूल्स हे पत्रकारांच्या कामाला सहाय्यक ठरतात आणि त्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी स्पष्ट, अचूक सूचना देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.# AI Tools for News Writing
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील पत्रकार कक्षात आयोजित प्रशिक्षण वर्गाच्या तिसऱ्या दिवशी जस्नानी यांनी एआयचा वापर, प्रॉम्प्ट लेखन आणि विविध एआय साधनांची उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले.

इंग्रजीचे मराठी भाषांतर करताना जेमिनी हे टूल सर्वाधिक अचूक आणि सहज परिणाम देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच बातमी लेखनासाठी ५ डब्ल्यू आणि १ एच (व्हू, व्हॉट, व्हेन, व्हेअर, व्हाय, हाऊ) या मूलतत्त्वांचा विचार करून प्रॉम्प्ट तयार करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शीर्षक लेखनाबाबत त्यांनी सांगितले की, एकाच बातमीसाठी छापील आवृत्ती, डिजिटल प्लॅटफॉर्म, सर्च इंजिन आणि लक्षवेधी अशा विविध प्रकारची शीर्षके तयार करता येतात. डीपसीक हे टूल शीर्षक निर्मितीसाठी उपयुक्त ठरते, असेही त्यांनी जोडले.
आयडिओग्राम, लिओनार्ड, जेमिनी या साधनांद्वारे दर्जेदार चित्रनिर्मिती करता येते, तर रेकॉर्ड केलेल्या संभाषणातून मुद्देसूद मजकूर तयार करण्यासाठी ऑटर एआय हे साधन प्रभावी असल्याचे त्यांनी प्रात्यक्षिकांसह दाखवून दिले. संभाषणात व्यत्यय आढळल्यास ते दुरुस्त करून योग्य ट्रान्सक्रिप्शन करण्याच्या पद्धतीबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
