वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यांतर्गत शिरपूर जैन येथील जैन समाजबांधवांची काशी म्हणून ओळख असलेल्या जगप्रसिद्ध श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या मागील भागात असलेल्या जुन्या धर्मशाळेच्या दोन खोल्यांचे नूतनीकरणाचे काम सुरू असताना तळघरात जैन दिगंबर समुदायाच्या हजारो वर्षे जुन्या लहान-मोठ्या प्राचीन मूर्ती सापडल्या, अशी माहिती श्री १०५ सिद्धांतसागर महाराज आणि तात्याभय्या यांनी दिली.
शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरासमोरील पूजा मंडपाच्या मागे हजारो वर्षे जुनी दिगंबर जैन धर्मशाळा आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये पहिल्या दोन खोल्यांचे नूतनीकरण करून येथे कार्यालय सुरू करण्याच्या उद्देशाने या धर्मशाळेच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या दरम्यान या खोलीची स्वच्छता करताना एका ठिकाणी लाकडी आवरण आढळले. हे आवरण काढल्यानंतर तळघरात काही जैन दिगंबर मूर्ती दिसल्या.
खोलीच्या आत पाहिल्यानंतर या तळघरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्यादेखील दिसल्या. या पायऱ्यांमधून आत गेल्यावर येथे शेकडो लहान-मोठ्या दिगंबर जैन मूर्ती सापडल्या. यापैकी काही मूर्ती इसवी सन १३६५, १४६० आणि १४६१ सालातील आहेत. सापडलेल्या मूर्तीपैकी ५३ मूर्ती मोठ्या आहेत; त्यापैकी बहुतेक भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथांच्या प्रतिकृती आहेत आणि इतर मूर्ती भगवान शांतिनाथ आणि इतर तीर्थंकारांच्या आहेत.
अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या आवारात एक नवीन विशाल तळघर सापडले. हे तळघर सुमारे तीन पिढ्यांपासून पुरले गेले होते. शेकडो वर्षे प्राचीन असलेले हे तळघर उघडल्यानंतर हजारो वर्षे जुन्या ३१ आणि इतर शेकडो लहान मूर्ती सापडल्या. या मूर्त्या शेकडो वर्षांपूर्वीच्या प्राचीन दिगंबर जैन धर्माचा इतिहास स्पष्टपणे सांगतात.

१४०६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याची माहिती तात्याभय्या यांनी दिली. येथील तळघरात सापडलेल्या जैन मूर्तीमुळे भाविक दररोज मोठ्या संख्येने श्रद्धेने आणि भक्तीने दर्शनासाठी येत आहेत. शिरपूर येथे असलेले श्री अंतरिक्ष पार्श्वनाथाचे ऐतिहासिक मंदिर वाशीमपासून फक्त २० किमी अंतरावर आहे. पौराणिक आणि प्राचीन अंतरिक्ष पावली मंदिर हे भारतातील जैन समुदायाचे तीर्थक्षेत्र आहे.
