अकोला (वऱ्हाडवृत्त) : वंजारी समाज सेवा समितीच्या वतीने संत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पिंजर येथील माजी पोस्टमास्टर व गुरुदेव सेवा मंडळ, बार्शीटाकळीचे मार्गदर्शक, ज्येष्ठ साहित्यिक श्री. तुळशीराम बोबडे यांचा त्यांच्या उल्लेखनीय साहित्यिक योगदानाबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम १८ जानेवारी रोजी शहरातील जानोरकर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमानिमित्त शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंगल कार्यालयात कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कीर्तनानंतर गुणवान विद्यार्थी तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. याच प्रसंगी साहित्य, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील भरीव कार्यासाठी तुळशीराम बोबडे यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वाशिमचे उपजिल्हाधिकारी श्री. विश्वनाथरावजी घुगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. गजाननराव दराडे, सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) सौ. साधनाताई कराड, आरोग्य उपसंचालक सौ. तुषार वारे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच वंजारी समाज सेवा समितीचे विशाल घुगे, अभिजित बांगर, सुधाकर घुगे, नंदकिशोर काठोळे, जितेंद्र काठोळे, राजेश जायभाये, अमोल बोबडे, राजू वाटमारे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.
श्री. तुळशीराम बोबडे हे मूळचे बार्शीटाकळी तालुक्यातील असून सध्या कौलखेड, अकोला येथे वास्तव्यास आहेत. ते कवी, लेखक, समीक्षक, अनुवादक आणि प्रवचनकार म्हणून परिचित आहेत. त्यांनी ६२ वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन (पातूर), तिसरे जिल्हा साहित्य संमेलन (अकोला), अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलन (वर्धा), अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन (बार्शीटाकळी) यांसह अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे.
‘संजीवनी’ काव्यसंग्रह, ‘प्रेरणा’ व्यक्तीचरित्र, ‘संत बाबुमहाराज’ लघुग्रंथ, ‘सुभेदार तानाजी मालसुरे’ (हिंदी अनुवाद) आणि ‘सत्संग’ लेखसंग्रह अशी त्यांची साहित्यनिर्मिती प्रकाशित आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
