अकोला : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अचूक, वेळेवर व वैज्ञानिक शेती सल्ला उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘महाविस्तार एआय’ या अत्याधुनिक मोबाइल अॅपची निर्मिती केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका मूर्तिजापूर येथे या ॲपच्या प्रचार व प्रसिद्धी मोहिमेला गती देण्यात आली आहे.

‘एका क्लिकवर शेती व्यवसायाची कुंडली’ अशी ओळख निर्माण करणारे ‘ महाविस्तार एआय’ ॲप शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी सल्लागार म्हणून कार्य करत आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनापासून ते बाजारभावांपर्यंत सर्वसमावेशक माहिती एका ठिकाणी उपलब्ध होत असल्याचा दावा केला जात आहे. ‘महाविस्तार एआय’ ॲप डाउनलोड करणे अतिशय सोपे आहे. शेतकऱ्यांनी मोबाइलमधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन ‘महाविस्तार- एआय’ असे सर्च करावे. ॲप डाउनलोड केल्यानंतर स्वतःचा फार्मर आयडी समाविष्ट केल्यास ॲपचा संपूर्ण लाभ घेता येतो. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीस अनुरूप वैयक्तिक सल्ला मिळतो.
आपल्या ‘महाविस्तार एआय’ ॲपमध्ये पीक वाढीच्या विविध टप्प्यांनुसार पीक सल्ला, अचूक हवामान अंदाज, मृद आरोग्य पत्रिका, खत मात्रा गणक, माहितीपूर्ण व्हिडिओ व शेतीशाळा, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, कीड व रोग ओळख व त्यावर उपाय सर्व पिकांचे बाजारभाव तसेच आपल्या भागातील कृषी सुविधा यांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. शेतीसाठी उपयुक्त सर्व सेवा एका अॅपमध्ये उपलब्ध होणार आहेत. तर या अॅपचा नियमित वापर केल्यास शेतकऱ्यांना अचूक निर्णय घेणे सुलभ होऊन उत्पादन खर्चात बचत व उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार असल्याचा दावाही करण्यात येत आहे. दरम्यान, या तंत्रज्ञानामध्ये जिल्ह्यातील किमान २५ टक्के शेतकऱ्यांच्या सहभागाचे कृषी विभागाला उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ९२ हजार शेतकऱ्यांनी नोंद केली असून, उद्दिष्टानुसार किमान ७५ हजार शेतकऱ्यांचा सहभाग हवा आहे.
तालुकानिहाय अॅपशी जोडलेले शेतकरी तालुकानिहाय जोडलेले शेतकरी ‘महाविस्तार एआय’ अॅपशी खालील प्रमाणे आहेत
| तालुका | शेतकरी |
| अकोला | ६९६० |
| मूर्तिजापूर | ८४७१ |
| बार्शिटाकळी | ४१८१ |
| बाळापूर | ३८५१ |
| अकोट | २३५९ |
| तेल्हारा | २५६९ |
| पातूर | २३२५ |
‘एआय’चा वापर; डिजिटल शेतीकडे वाटचाल – या उपक्रमाचे आयोजन सहायक कृषी अधिकारी, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी ‘महाविस्तार एआय’ ॲपचा जास्तीत जास्त वापर करून डिजिटल शेतीकडे वाटचाल करावी. – हरीश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला
