काही मुलांना दूरचे पाहणे किंवा लांबचे पाहण्यात अडथळा, मोतिबिंदूसह डोकेदुखी अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन पालक नेत्र रुग्णालयांत उपचारासाठी येत आहेत. १० पैकी ३ मुलांना चष्मा लावल्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती आहे. मोबाईल, संगणकासह मधुमेह आणि जुने आजार यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. लहान मुलांमधील चष्म्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता पालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. (#The result of excessive use of mobile phones and computers; Three out of ten people need glasses!)
दिवसेंदिवस मोबाईल, टीव्ही, संगणकाचा अतिवापर वाढत आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या विकारांत वाढ झाली आहे. अनेक पालक स्वतःची कामे उरकण्यासाठी लहान मुलांना तासन्तास मोबाईल, टीव्ही आणि संगणकासमोर गेम लावून मुभा देतात. स्क्रीनचा प्रकाश डोळ्यांसाठी घातक असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावर उपाय म्हणजे पालकांनीच मुलांना मोबाईल, संगणक, टीव्हीपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.
सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. मोबाईलमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. मात्र, त्याचा मोबाईलवर तासन्तास गेम खेळणे, इतर गोष्टी पाहण्याचा अतिरेकी वापर चक्क डोळ्यांवर परिणाम करू लागला आहे. लहान मुलांचा चटपटीत खाण्याकडे कल आहे.
मोबाईल, संगणक, टीव्हीप्रमाणे प्रोटिनयुक्त आहाराचा अभावही कारणीभूत आहे. मुलांना कडधान्ये पालेभाज्यांचा समावेश असलेला जीवनसत्त्वयुक्त आहार देणे तिकेच महत्त्वाचे असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे. रात्री मोबाईलचा उजेड थेट डोळ्यांवर पडतो. आणि डोळ्यांवर ताण वाढतो. वारंवार मोबाईलचा अतिवापर केल्याने उणे क्रमांकाचा चष्मा वापरावा लागतो.
■ दिवसभरात केवळ एक तास टीव्ही पाहणे.
■ टीव्ही दहा ते पंधरा फुटांवरून पाहावा.
■ मुलांना संगणक, मोबाईलपासून दूर ठेवा.
■ आहारात सकस पदार्थांचा समावेश असावा.
■ डोळ्यांच्या तक्रारी जाणवल्यास नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
