» पिकविण्यासाठी दुकानदारांचा जीवघेणा फंडा
आजच्या प्रगत व विज्ञान युगात सर्वांचा कल पैसे कमावण्याकडे लागला असून, आता पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी लोक खाण्याच्या वस्तूमध्येही भेसळ करायला लागले आहेत. आंबा व केळीप्रमाणे पपई पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर सर्रास होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आहारात कुठली फळे घ्यावीत, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.
एखाद्या रुग्णाचा डेंग्यूमुळे किंवा इतर आजाराने शरिरातील पांढऱ्या पेशी कमी होत असतील तर ते वाढविण्यासाठी डॉक्टर व आहारतज्ज्ञ रुग्णांना पपई व इतर फळे खाण्याचा सल्ला देतात. पपईमध्ये पेटेन ( पेपासीन) नावाचे एंजाइम असल्यामुळे ते पचनक्रियेसाठी चांगले असते. यातून जीवनसत्त्व व मिनरल्स मिळतात. परंतु मानवी जीवनाला पोषक असलेल्या पपईवर कॅल्शियम कार्बाईडचा घातक मारा केल्या जात असून आरोग्यास पौष्टिक असलेली पपई जीवघेणी ठरत आहे. ग्रामीण भागात पपईचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी पपईच्या बागा असतात. त्या ठिकाणी झाडाला पपई पिकण्यास विलंब लागत असल्यामुळे ती तोडून त्याला रात्रभर कॅल्शियम कार्बाईड या घातक व विषारी पदार्थाची उष्णता दिली जाते. दुसऱ्या दिवशी हिरवी असलेली पपई पिवळी धम्म दिसू लागते. काही व्यापारी कच्ची पपई विकत घेऊन झटपट पैसे कमावण्याच्या नादात कार्बाईडचा वापर करून नागरिकांच्य आरोग्याशी खेळ करत आहेत.
कर्करोगाची भीती
कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेली फळे नेहमी आहारात सेवन होत असतील तर त्यामुळे आपण मृत्यूला आमंत्रण देत असल्याचे डॉक्टर सांगतात. कारण कॅल्शियम कार्बाईडमुळे पिकवलेली फळे खाल्ल्याने आतड्याचा कर्करोग तसेच घशाचा व अन्न नलिकेपासून तर माकड हाडापर्यंत कुठल्याही भागाचा कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे डॉक्टर व आहार तज्ज्ञ सांगतात.
कॅल्शियम कार्बाईडचा वापर
ग्रामीण भागात बऱ्याच नागरिकांना याबाबत माहीत नसल्याने बाजारात पिवळी धम्म व आकर्षक दिसणारी पपई मोठ्या आवडीने व उत्साहाने घेतात. मात्र, आकर्षक व पौष्टिक समजल्या जाणाऱ्या पपईमध्ये आपला मृत्यू दडलेला आहे. हे त्यांना माहीत नसते. कारण व्यापारी फळे लवकर पिकावी यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करतात.