महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर पांना सरळ मार्गाने जोडण्याचा एक प्रयत्न २० वर्षांपूर्वी झालेला होता. नागपूर- बुटीबोरी- वर्धा-पुलगाव कारंजा (लाड)- मालेगाव (जहांगीर)- मेहकर- सुलतानपूर- न्हावा- जालना- छ. संभाजीनगर- वेरूळ- कोपरगाव- सिन्नर-घोटी असा सरळ रेषेतला एक राज्य महामार्ग बांधला गेला होता. घोटीनंतर मात्र इगतपुरी-कसारा- शहापूर- पडघा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ ( तत्कालीन आद्या मुंबई महामार्ग) मार्गे हा राज्यमार्ग मुंबई- ठाण्यात पोहोचत होता. समृद्धी महामार्ग येणार आणि तो सुद्धा या जुन्या महामार्गाला जवळपास समांतर असेल असे वाचण्यात आल्यानंतर मनात काही शंका येऊन गेल्या. पण समृद्धी महामार्गावरून प्रवास केल्यावर शंकांचे निरसन झाले. #Samruddhi_Mahamarg
काही ठळक वैशिष्ट्ये
अ) समृद्धी महामार्ग हा नियंत्रित प्रवेश असलेला महामार्ग आहे. या महामार्गावर हळू चालणारी वाहने म्हणजे बैलगाडया ट्रॅक्टर्स, सायकली, दुचाकी वाहने यांना प्रवेश नाही. महामार्गावर बाजूने कुंपण घातलेले आहे.
आ) या महामार्गावर मध्ये-मध्ये कुठेही टोल नाके नाहीत. जो काही टोल घ्यायचा, तो हा महामार्ग सोडल्यानंतर त्या त्या गावांमध्ये प्रवेश करताना असलेल्या टोल नाक्यांवर घेतला जातो. टोल नाक्यावरची संपूर्ण वाहतूक प्रत्येक गावागावात शिरताना विभाजित होत जाते. सर्वांचा वेळ वाचतो.
इ) या महामार्गाचा बेस उंचावलेला आहे. त्यासाठी जवळपास ३ ते ५ मीटर्सचा भराव सर्वत्र आहे. महामार्ग कुठल्याही गावातून किंवा त्यांच्या बाह्य वळण मार्गांवरून जात नाही. प्रत्येक गावातून शेजारून जाताना स्वतंत्र आणि उंचावलेले अस्तित्व आहे. त्यामुळे विशिष्ट वेगाने प्रवास होऊ शकतो. समृद्धीवर प्रवास करताना आपल्या गाडीचा वेग ताशी ८० किलोमीटर्स ठेवला तरी ४-५ तासांच्या सलग प्रवासानंतर आपला सरासरी वेग ताशी ७७ ते ७८ किलोमीटर्स इतका येऊ शकतो. इतर कुठल्याही रस्त्यावर ताशी ८० किलोमीटर्स वेग ठेवला तर इतर अनेक अडथळ्यांमुळे आपला सरासरी वेग ताशी ५० किलोमीटर्स इतकाच येतो.
ट्रक्सची सोय
या महामार्गावर ट्रक्स देखील ताशी ८० किलोमीटर्स या वेगाने चालवले तर ८०० किलोमीटर्सचे अंतर साधारण १२ तासांत कापले जाऊ शकते. इतर कुठल्याही महामार्गाने हेच अंतर कापायला ट्रक्सना २० ते २४ तास लागतील. कारण प्रत्येक गावात शिरताना, बाहेर पडताना अनंत अडथळ्यांमुळे ट्रक्सचा वेग जो कमी होतो, तो पुन्हा गाठायला त्यांना वेळ लागतो आणि प्रवासाचा वेळ वाढला की विश्रांतीचा, भोजनाचा वेळ वाढतो. अनेकदा या महामार्गावर स्पीड ब्रेकर लावण्याची चर्चा होते. त्यात मला तरी ते तर्कशुद्ध वाटत नाही. तसे झाले तर या महामार्गाचा हेतूच पराभूत होईल. या महामार्गावर प्रवास करताना माझ्या लक्षात आले की, नगर, नाशिक जिल्ह्यातला कांदा आणि तत्सम शेतमाल नागपूर आणि पुढे छत्तीसगडला मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. पण त्या प्रमाणात नागपूर, वर्धा, अमरावती इथला कापूस, संत्री इत्यादी शेतमाल नाशिक, पुणे, मुंबई इथे पाठविण्यात येत नाही. याकडे लक्ष दिले तर समृद्धीचा फायदा आपल्याही भागाला होईल.
अपघातांची कारणे
या महामार्गावरील अपघातांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की,
९० टक्के अपघात केवळ खालील तीनच कारणांमुळे झालेले आहेत.
१. अतिशय वेगात गाडी (विशेषतः कार्स) चालविल्यामुळे वेग अनियंत्रित होऊन.
२. रात्रीच्या वेळेत पुरेशी विश्रांती न घेता गाडी चालविल्याने चालकाला झोप लागल्यामुळे.
३. हा मार्ग काही काही ठिकाणी वन्यप्राण्यांच्या अधिवासातून जात असल्याने अचानक वन्यप्राणी वाहनासमोर आल्याने व त्या गडबडीत वाहन अनियंत्रित झाल्यामुळे यातल्या पहिल्या कारणासाठी आजकाल उपाययोजना सुरू झाल्याचे कळते आहे. बाकी समस्यांवरही उपाय केले पाहिजेत. दुसऱ्या कारणासाठी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो. महामार्गावर प्रत्येकी १००-१५० मीटर्सवर असे कृत्रिम बुद्धिमतेने युक्त कॅमेरे लावून वाहनाच्या चालकाचे विश्लेषण होऊ शकते आणि झोपाळू अवस्थेतला चालक चालवीत असलेले त्या त्या कॅमेऱ्यासमोरून जात असताना प्रत्येक १००-१५० मीटर्सवर अलार्म, हूटर वाजेल अशी व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे तो चालक गाडीतले इतर सहप्रवासी, आसपास धावणारी वाहने आणि महामार्ग पोलिसही सतर्क होतील आणि अशा वाहनाला थांबवून दुसरा चालक किंवा असलेल्या चालकाची विश्रांती पूर्ण होईपर्यंत हे वाहन महामार्गावर धावणार नाही, याची व्यवस्था करता येईल. तिसरी समस्या हाताळण्यासाठी या रस्त्यावर जागोजागी वन्यप्राण्यासांठी पूल बांधलेले आहेत. तरीही वन्यप्राण्यांच्या अधिवास क्षेत्रातून वाहन चालवताना चालकांनी वाहनांचे वेग नियंत्रित केलेलेच बरे..
समृद्धी महामार्ग हा विदर्भ, मराठवाडा आणि छत्तीसगडमधल्या मागास भागासाठी खरोखर समृद्धीचा मार्ग बनू शकेल. या महामार्गाद्वारे शेतमाल, खनिजांची वाहतूक विकसित पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतल्या कारखान्यांपर्यंत जलद होऊ शकेल. त्यासाठी महामार्गावरील सगळ्या प्रवेश आणि निर्गमन द्वारांजवळ कच्च्या मालाची कोठारे (गोडाऊन्स) तसेच त्यावर प्रक्रिया करणारे छोटे-छोटे कारखाने उभे राहिले आणि तिथल्या स्थानिक कुशल, अकुशल आणि अर्धकुशल मनुष्यबळाचा वापर झाला तर समृद्धीची ही गंगा खरोखर खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचेल. एसटीनेही या मार्गाचा वापर करण्याचा विचार केला पाहिजे. त्याचा सर्वांना लाभ होईल
सध्या या महामार्गावर पुरेशा ठिकाणी अल्पोपाहार, भोजन, विश्रांती यासाठी व्यवस्था नाहीत. त्याची लवकरच काहीतरी सोय होईल असा विश्वास व्यक्त करता येण्याजोगी स्थिती आहे. भविष्यात हा महामार्ग खऱ्या अर्थानि समृद्धी आणू शकतो, हाही विश्वास येथे व्यक्त करावासा वाटतो.
प्रा. राम प्रकाश किन्हीकर, (लेखक स्थापत्य अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत)
