नवी दिल्ली – ताप किंवा दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही पॅरासिटामॉल घेत असाल तर काळजी घ्या. देशातील औषध नियामक सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने नवीनतम मासिक ड्रग अलर्ट जारी केला आहे. यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पॅरासिटामॉलसह 53 औषधे गुणवत्ता चाचणीत नापास झाली आहेत. या औषधांमध्ये जीवनसत्त्वे, साखर आणि रक्तदाबाची औषधे देखील समाविष्ट आहेत. हा अहवाल समोर आल्यानंतर आरोग्याबाबत चिंता वाढली आहे.

या औषधांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी 3 सप्लिमेंट्स, मधुमेह-विरोधी गोळ्या आणि उच्च रक्तदाबासाठी औषधे देखील समाविष्ट आहेत. या अहवालामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. सीडीएससीओने या ५३ औषधांना नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी (NSQ) अलर्ट म्हणून घोषित केले आहे. राज्य औषध अधिकाऱ्यांनी घेतलेल्या यादृच्छिक मासिक सॅम्पलिंगमधून NSQ अलर्ट तयार केले जातात. गुणवत्तेच्या चाचणीत उत्तीर्ण न झालेल्या औषधांमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी3 री गोळ्या शेलकेल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल्स, अँटीअसिड पॅन-डी, पॅरासिटामॉल टॅब्लेट IP 500 मिलीग्राम, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड (Glimepiride) यांचा समावेश आहे.
औषध नियामकाने गुणवत्तेच्या चाचणीत अपयशी ठरलेल्या औषधांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत 48 लोकप्रिय औषधांची नावे आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या यादीत 5 औषधांचा समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये गुणवत्ता चाचणीत नापास झालेल्या औषध कंपन्यांसाठी उत्तर विभागही ठेवण्यात आला आहे.