
भूक भागविण्यासाठी नागरिक लवकर तयार भेटणारे चायनीज किंवा जंक फूड खाण्याला पसंती देतात. मात्र याच पदार्थांमुळे अपेंडिक्स सारख्या आजाराचा धोका अधिक वाढत आहे.
सततची धावपळ, जेवणाच्या वेळा न पाळणे. फास्टफूडचे सेवन, रात्रीचे जागरण यामुळे अपेंडिक्सच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या १० महिन्यांपासून या आजाराच्या रुग्णांवर शस्त्रक्रियांचे प्रमाणही वाढले आहे. अलीकडे लहान मुलांपासून तर मोठी माणसेदेखील फास्ट फूड ट्रेंड स्वीकारत फास्टफूडचा आस्वाद घ्यायला लागली आहेत. याचा परिणाम थेट त्यांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. यातून त्यांना अपेंडिक्स सारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे. हा त्रास सुरू झाला की, शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरत नाही.
अलीकडे प्रत्येकाच्या हाती मोबाइल आला आहे. रात्रीच्यावेळी मोबाइल पाहत पाहत झोपण्याची वेळ ताणली जात आहे. अशा या जागरणामुळे शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळेही अपेंडिक्सचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. आजारांपासून दूर राहायचे असेल तर रात्रीची जागरणे टाळायला हवी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोणत्या वयोगटात अधिक धोका ?
लहान मुले तसेच तरुणांना अपेंडिक्सचा धोका अधिक असतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.
लक्षणे काय?
ओटीपोटात दुखणे, मळमळ, ताप आणि उलट्या ही अपेंडिक्स ची काही प्रमुख लक्षणे आहेत. याकडे दुर्लक्ष जिवावर बेतू शकते. अपेंडिक्सवर सूज येण्याची दोन कारणे आहेत. एक इन्फेक्शन आणि दुसरे अपेंडिक्समध्ये काही फसल्यानेही सूज येते. तिखट, तळलेले खाणे टाळा! सतत तळलेले आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार जडू शकतात. त्यामुळे असे पदार्थ टाळायला हवे.
अपेंडिक्सच्या आजारापासून दूर राहायचे असेल तर जेवणातील अनियमिता आणि अति जागरण नको. जंक फूड, अति मांसाहार या आजाराला कारणीभूत ठरतो. नियमित व वेळेत जेवण. शाकाहारी जेवण आणि पुरेशी झोप या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा. जेणेकरून अपेंडिक्सच्या आजारापासून दूर रहाता येईल. – डॉ. रामदास मराड, जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर