महाराष्ट्राला समाजसुधारकांची परंपरा लाभली असून समाजाच्या वैचारिक जडणघडणीत सुधारकांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. समाजसुधारणा ही विशिष्ट कालखंडात पूर्ण होणारी प्रक्रिया नाही. समाजाला सुधारणेचा विचार व योग्य दिशा देण्याबरोबरच भक्कम कृतीची साथ असावी लागते. समाजसुधारणेकरिता आवश्यक असलेली विचारक्रांती करायला प्रवृत्त झालेल्या गोपाळ गणेश आगरकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनविषयक मांडलेले विचार अतिशय मोलाचे आहेत. समाजाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मागासलेपणाचे मूळ ज्या हटवादी रोगात आहे तो रोग म्हणजे अंधश्रद्धा होय. #Gopal_Ganesh_Agarkar#Eradication of superstition
आगरकर सतर्क सुधारक होते. ‘सत्यापेक्षा दुसरा कोणताही धर्म नाही’ ही त्यांची जीवनश्रद्धा होती. पूर्वापार चालत आलेल्या जुनाट परंपरांचे अनुकरण करीत असताना सद्यपरिस्थितीत त्या योग्य आहेत की नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. केवळ धर्मकर्तव्य म्हणून त्या आहे तशा स्वीकारणे हे चुकीचे आहे, असे आगरकर यांचे ठाम मत होते. ‘सोवळ्याची मीमांसा’ या निबंधात अंधश्रद्धेबाबत आगरकरांनी मांडलेले विचार अंधश्रद्धा समर्थकांच्या अंगावर काटा आणणारे आणि समाज विकासास अनुकूल आहेत. विटाळ, सुतक यासारख्या भाकडकथा, मूर्खपणाच्या समजुती, हास्यास्पद कल्पना, विधी, उपवास, व्रतवैकल्ये, अस्पृश्यता यावर आगरकरांनी हल्ला चढवला. ‘पांचजन्याचा हंगाम’ या लेखात आगरकरांनी बीभत्स अंधश्रद्धेवर प्रश्न उपस्थित केले. समाजातील चुकीच्या समजुती, वाईट आचारविचार यावर त्यांनी सडकून टीका केली. समाज विकासात हानिकारक ठरणाऱ्या अंधश्रद्धांवर त्यांनी चिकित्सकपणे विचार करून प्रहार केला आहे. समाजातील एखादी परंपरा कालबाह्य असूनही तिचा केवळ अज्ञानामुळे धर्माशी संबंध जोडला जातो तेव्हा त्यातील निरर्थकपणा आगरकरांनी दाखवून दिला. बुद्धिवादी तत्त्वज्ञानाचा आगरकरांनी पुरस्कार केला होता, परिणामी सुधारणेच्या आड येणाऱ्या पाप-पुण्याच्या प्रगती खुंटवणाऱ्या सर्व कल्पना त्यांनी झुगारल्या. आगरकरांच्या या कार्यामुळे तत्कालीन धर्ममार्तंडांच्या स्वार्थाचा पाया ढासळण्याची शक्यता होती, त्यांच्या तथाकथित मोठेपणाला धक्का पोहोचणार होता त्यामुळे असा वर्ग आगरकरांच्या विरोधकांत सामील झाला. अज्ञेयवादाचा पुरस्कार करणाऱ्या आगरकरांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानात दैवाला अजिबात थारा नव्हता. पारलौकिक सुखाच्या मृगजळामागे धावणे हा आगरकरांच्या दृष्टीने एक प्रकारचा वेडेपणा होता. काल्पनिक गोष्टीवर आंधळी श्रद्धा ठेवून निर्माण केलेल्या रूढींपेक्षा शास्त्रीय दृष्टीने विचार करून निश्चित केलेली नीतिमूल्येच माणसाला अधिक सुखकारक ठरतील याची खात्री आगरकरांना होती. समाजातील विकृत जीवनशैलीचे मूळ शोधताना त्यांच्या लक्षात आले की खुळचट आचारविचार, अंधश्रद्धा ही तिची उगमस्थाने आहेत. हे त्यांनी ‘सुधारक’ साप्ताहिकातून विशद केले आहे. त्याबरोबरच सामान्य माणसाचे जीवन सर्वांगाने सुंदर व आनंदी व्हावे यासाठी साप्ताहिकातून लेखन केले. रूढींची शृंखला तोडल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन शक्य नाही हे सांगताना स्वैराचाराचा अवलंब करता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. समाजातील प्रचलित रूढी, परंपरचे स्वरूप काळानुसार परावर्तित झाले नाही तर त्या प्रगतीला प्रेरक न ठरता मारक ठरतात, असे त्यांचे मत होते. ऐहिक जीवनाबद्दल समाजामध्ये निराशेचा दृष्टिकोन निर्माण झाला होता. भौतिक साधनांचा आनंद घेणे, जीवन सर्वांगाने समृद्ध करणे अशा गोष्टी जणू समाजातून हद्दपार झाल्या होत्या. आत्मसंरक्षणाच्या गरजेतून समाजात चुकीच्या परंपरा निर्माण झाल्या. समाज व धर्म जणू अज्ञानावरच आधारलेला होता, परिणामी व्यक्तिविकासच खुंटला. सुधारक सत्याग्रही असतात, त्यांचे मन संवेदनशील व भावनाप्रधान असते याला आगरकर अपवाद नव्हते. आगरकर भीड न बाळगता आक्रमकपणे लिहू लागले. त्यांनी आपल्या लेखनातून विवेकशीलता, बुद्धिप्रामाण्यव वैज्ञानिकता याचे महत्त्व स्पष्ट केले. बुद्धीला पटणाऱ्याच गोष्टींचे समर्थन करावे अशी त्यांची भूमिका होती. आपल्या परंपरेचे गोडवे गाण्यापेक्षा आज आमच्यात कोणते दोष आहेत
ज्यामुळे आमची प्रगती खुंटली आहे हे समजून घेणे आगरकरांना गरजेचे वाटले. नको त्या गोष्टींवर श्रद्धा ठेवल्यामुळे त्या श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत झाले असे त्यांचे मत होते. आगरकरांना फक्त बोलके, पोकळ वृत्तीचे सुधारक नको होते तर कर्ते सुधारक हवे होते. बोलक्या सुधारकांवर त्यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.
‘न करत्याचा वार शनिवार’ या निबंधात आगरकर तथाकथित सुधारकांवर तुटून पडलेले दिसतात. स्त्रियांविषयक असलेल्या अंधश्रद्धांचा आगरकरांनी विशेष समाचार घेतला. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेमध्ये रूढी, परंपरा पुरुषांच्या हिताच्या होत्या. आगरकरांच्या मते, पुरुषांनी सर्व प्रकारच्या रुढी स्त्रियांवर जाणीवपूर्वक लादल्या आहेत. त्या खुळचट रूढींचे अंधश्रद्धेत रूपांतर
होऊन त्यांना गुलामीची, पशूची अवस्था प्राप्त झाली. बुद्धिवादाच्या आधारावर विचार करून स्त्रियांनी अंधश्रद्धेविरुद्ध बंड पुकारले पाहिजे, अशी त्यांची तळमळ होती. स्त्रियांबाबत ब्रिटिशांनी संमती वय वाढवण्याचे बिल पास केल्यानंतर व धर्ममार्तंडांनी व तत्कालीन पुढाऱ्यांनी देखील जो कांगावा केला त्याला आगरकरांनी प्रखर विरोध केला. समाजामधील सर्व थरांचा त्यांच्या सर्व प्रकारच्या अंगांचा समतेच्या तत्त्वानुसार सर्वंकष विकास होणे, असा आगरकरांच्या दृष्टीने सुधारणेचा अर्थ होता. समाजातील प्रचलित अपायकारक रूढी टाकून देऊन त्या जागी निर्दोष वाटतील असे समाजहिताचे नवे विचार आणण्याचा अधिकार सामान्य माणसालाही आहे यावर आगरकर ठाम होते. रूढी किंवा परंपरांचा विरोध केवळ जुन्या आहेत म्हणून नव्हता तर त्या व्यक्तिस्वातंत्र्यास व प्रतिष्ठेस बाधा आणणाऱ्या आहेत म्हणून होता. प्रतिगामी रुढीग्रस्त लोकांच्या दृष्टीने कोणताही सुधारक टीकेचा केंद्रबिंदू होतो. आगरकरांचा बुद्धिवाद म्हणजे आधुनिक सुखवाद नव्हता, मात्र तसा गैरसमज अनेकांनी करून घेतला. सामाजिक सुधारणेची मशाल हाती घेतलेल्या आगरकरांना लोकनिंदा, हेटाळणी, छळवादाला सामोरे जावे लागले. तो काळ पारतंत्र्याचा होता त्यामुळे परकियांविरुद्ध उभे राहणाऱ्याला समाजातून सहानुभूती मिळायची तर स्वकियांविरुद्ध लढणाऱ्यांचा हेतू विचारात घेतला जात नव्हता. वर्तमानात विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन न रुजल्याने अंधश्रद्धेचे निर्मूलन झालेले नाही. आज अंधश्रद्धा निर्मूलनाचे ध्येयवादी कार्यकर्ते विधायक काम करीत आहेत, अशा कार्यकर्त्यांना आगरकरांनी एकोणिसाव्या शतकात मांडलेले विचार प्रेरणादायी आहेत.
