वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
दर्यापूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण ही काळाची महत्त्वाची गरज असल्याने मानवाचे या कार्यात योगदान असणाच्या दृष्टीकोनातून दर्यापूर तालुक्यातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण स्थळावर प्रदूषणमुक्त धूर देणाऱ्या गोवरीची निर्मिती चार वर्षांपासून केली जात आहे. गोरक्षणचे संचालक प्रा. गजानन भारसाकळे यांनी हे मानव जीवन उपयुक्त संशोधन साधले असून ते अत्यंत यशस्वी ठरले आहे.
गाईचे गोमूत्र मिश्रीत शेण व कडूनिंबाचा ओला पाला मिश्रीत या गोवरीला जाळल्यानंतर निघणान्या धुरामुळे होणारे हवेचे प्रदूषण नियंत्रित असल्याचे सिद्ध केले आहे. सलग चार वर्षांपासून कापूर, राळ, नारळाचे बाहेरील कवच यांसारखे घटक मिसळून हे संशोधन पुढे सुरू असून यासाठी त्यांना पहिल्या भारतीय महासंगणकाचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर या जगविख्यात शास्त्रज्ञाचे मार्गदर्शन तथा प्रदूषण चाचणीसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाभूळगाव, अकोला येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयातील महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड यांचे सहकार्य लाभत आहे. याच महाविद्यालयात गजानन भारसाकळे प्राध्यापक असून त्यांना फ्लॉयोंश काँक्रिट संशोधनासाठी विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांद्वारे पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या गोरक्षण स्थळावर शेणापासून विविध प्रकारच्या शेतीपूरक खतनिर्मितीचे कार्य सुद्धा ते सतत करीत आहेत. प्रदूषणमुक्त गोवरीसाठी धार्मिक स्थळावरून मागणी झाल्यास धार्मिक कार्यासाठी हा गोवरी पुरवठा विनामूल्य करणार असल्याचे प्रा. भारसाकळे यांनी जाहीर केले.