तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठ्ठली ।।
संपूर्ण विश्वावर दया, क्षमा, शांतीचा वर्षाव करीत सर्वांचा उद्धार करण्याकरिता अवतीर्ण झालेले सर्व संत आषाढ महिना आला की, मोठ्या लगबगीने पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान करतात. श्री क्षेत्र पंढरपूर वारीची परंपरा अनादी कालापासून आहे. आपलं आराध्य दैवत भगवान श्री पंढरीनाथ यांच्या दर्शनाकरिता असंख्य वारकऱ्यांना घेत महाराष्ट्रासह इतर प्रांतांमधील जनसामान्यांना घेऊन पंढरीची वारी करण्याकरिता सर्व साधुसंत मोठ्या प्रेमाने येत असतात. माऊली श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या वारी परंपरेचा जागर अनेकानेक संतांनी विदर्भामध्ये सुद्धा प्रयत्नपूर्वक केला. यामध्ये वारकरी रत्न म्हणून सुप्रसिद्ध असणारे सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांचे कार्य फार अलौकिक आहे. त्यांनी प्रत्यक्ष आचरण करून श्री क्षेत्र पंढरपूर वारीचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांचे कुलगुरू सद्गुरु श्री संत गजानन महाराज, पितामह सद्गुरू श्री संत भास्कर महाराज यांची वारी परंपरा शिरसावंद्य मानून
माझ्या वडिलांची मिराशी गा देवा ।
तुझी चरणसेवा पांडुरंगा ||
यानुसार श्री गुरु संत वासुदेव महाराजांनी वारीची परंपरा अखेरपर्यंत चालविली. दि.२४/०२/१९१७ फाल्गुन शुद्ध तृतीया या दिवशी मातोश्री चंद्रभागादेवी पुंडलिकराव पाटील जायले आकोली जहागीर यांच्या उदरी अवतीर्ण होऊन श्री संत वासुदेव महाराज यांनी
बालपणीच सर्वज्ञता । वरी तयाते ।।
या ओवी नुसार अल्पावधीतच वेदशास्त्र पुराणे यांचे अथांग ज्ञान आत्मसात केले. वयाच्या पाचव्या वर्षी काळगव्हाण येथे सर्वात प्रथम कीर्तन करून आपल्या अतुलनीय प्रज्ञेची प्रचिती सर्वांना दिली. काही वर्षांपूर्वीच काळगव्हाण येथे त्यांच्या प्रथम कीर्तनाच्या शताब्दीचा फार मोठा ऐतिहासिक उत्सव पार पडला. ही कीर्तन सेवा वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत अर्थात अखेरपर्यंत सुरू राहिली.
पुढे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी चार वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात पूर्ण केला. तद्नंतर काशी बनारसला उच्च वैदिक शिक्षण पूर्ण केले. सद्गुरु श्री गौरीशंकर महाराज यांच्या आज्ञेने आपले पितामह सद्गुरु श्री संत भास्कर महाराज यांच्या श्री क्षेत्र अडगाव येथील समाधी मंदिराचे जीर्णोद्धार कार्य पूर्ण केले. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र आकोली जहागीर येथील शेत सर्वे नंबर ५२ मधील सद्गुरु श्री संत गजानन महाराज यांनी सजल केलेल्या विहीरीचा जीर्णोद्धार करून या ठिकाणी सुंदर मंदिराची उभारणी केली. माऊली श्री ज्ञानोबारायांची जन्मभूमी श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील सिद्धबेट हे तीर्थक्षेत्र मुक्त करून या परिसराच्या विकासाकरता महाराष्ट्र शासनामार्फत २५ कोटी रुपये निधी मंजूर करून वारकऱ्यांसाठी सिध्दबेट सदैव खुले मोकळे केले. हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, संस्कृत, इत्यादी भाषेमध्ये विविध देव, संतांची चरित्रे लिहून विनामूल्य वितरित केली आणि संतांचा खरा इतिहास जिवंत ठेवला. त्यांची ग्रंथसंपदा परदेशामध्ये सुद्धा गौरवान्वित झाली आहे. सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, कृषी आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, इत्यादी क्षेत्रांमधील लोकोपयोगी व लोकहितैषी सेवाकार्य संपूर्ण आमजनतेकरिता आजही महदोपकारी ठरत आहेत. खुद्द श्री क्षेत्र पंढरपूर मध्येच त्यांच्या कार्याचा आलेख फार मोठा आहे. यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात राहण्याकरिता श्री महाराजांनी अथक प्रयत्न करून नाडकर्णी कमिशन कडे ६५ पानी अहवाल पाठवून भगवान श्री पंढरीनाथांचे मंदिराचा उज्वल इतिहास सादर केला. त्याची फलश्रुती आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सर्व भाविकांकरता खुले मोकळे झाले आहे. उद्धव घाट व दत्त घाट खचले होते. पुराच्या पाण्यामुळे अनेक पायऱ्या वाहून गेल्या घाटांच्या दुरुस्तीचे कार्य श्री महाराजांनी हाती घेऊन शासनाकडे पाठपुरावा करीत या घाटांची दुरुस्ती केली. आज हे घाट सौंदर्याने आणि भरभक्कमपणे उभे आहेत. पौर्णिमेला गोपाळपूर पुलावर हत्तीमुळे वारकऱ्यांची चेंगराचेंगरी झाल्याची अफवा काही लोकांनी पसरविली होती. परंतु, श्री महाराजांनी वारकऱ्यांच्या चेंगराचेंगरीचे खरे कारण गोपाळपूर येथील पुलाची नादुरुस्ती व अरुंदता असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आणून दिले आणि गोपाळपूर पुलाचे रुंदीकरण कार्य पार पडले. तेव्हापासून सर्व वारकरी काला करण्याकरिता गोपाळपूरला सुरक्षित ये-जा करीत आहेत. चंद्रभागा नदीला दरवर्षी अनेक धरणांचे पाणी नेमके आषाढी वारीच्या वेळी सोडल्या जायचे. यामुळे श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये महापुराचे थैमान असायचे. गुरुवर्य श्री महाराजांनी आंदोलन करून हा पुर नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्यामुळे हा यावर ताबडतोब शासनाने पाऊले उचलावी, अन्यथा जनआंदोलनाचे पडसाद उमटतील, असा शासन दरबारी इशारा दिला. त्यानंतरच्या वारीपासून शासनाने ही बाब जाणीवपूर्वक घेत धरणांचे पाणी सोडणे थांबविले आणि या महापुराच्या पाण्याचे नियोजन करून वारकऱ्यांना सुरक्षितता मिळाली. याबाबत अनेक वर्ष शासनातर्फे गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराजा यांच्या साक्षीने व स्वाक्षरीने “शासनाने कोणत्याही प्रकारचे पाणी सोडले नसल्याची खातरजमा ‘ दरवर्षी शासनाचे प्रतिनिधी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येऊन श्रीगुरु महाराजांचे समक्ष करत असत. अशा प्रकारे चंद्रभागा मातेला येणाऱ्या महापुरांचे निवारण झाले. श्रीक्षेत्र पंढरपूर मधील असंख्य विद्यार्थ्यांना वैदिक ज्ञानदानाचे कार्य श्री महाराजांनी केले. त्याचप्रमाणे वारकरी भाविकांकरिता आवश्यक त्या सोयीसुविधांबाबत शासनाकडे भगीरथ प्रयत्न सातत्याने केले. श्री क्षेत्र देहू – आळंदी – पंढरपूर विकास आराखड्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याकरिता शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अशी अनेक सेवाकार्ये पंढरपूरमध्ये सुद्धा केलेली आहेतच. सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांनी भगवान श्री पंढरीनाथांचे दर्शनासाठी असंख्य भक्तांसह आजीवन श्री क्षेत्र पंढरपूरची वारी केली.
येथ वडील जे जे करिती । तया नाम धर्म ठेविती ।
तेचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ।।
सन १९१७ ते १९३८ पर्यंत आपल्या मातापित्यांसमवेत तर सन १९३९ पासून १९६८ पर्यंत माऊली श्री ज्ञानोबारायांसोबत आणि सन १९६९ पासून २००९ पर्यंत असंख्य भक्तांना घेऊन आकोट वरून श्री क्षेत्र पंढरपूरची वारी केली. आपल्या अखेरच्या वारीत अर्थात दि. २ जुलै २००९, गुरुवार, आषाढ शुद्ध दशमीला माऊली श्री ज्ञानोबारायांची पालखी आल्यानंतर श्री माऊलींची आज्ञा घेऊन श्री क्षेत्र पंढरपूरमध्येच श्री संत गजानन महाराज यांच्या मठामध्ये श्री पंढरीनाथांचे चरणी आपला देह ठेवला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सर्व साधू, संत, वारकरी भाविकांनी अखेरची बोळवन केली. वारकरी संतमालेत ही घटना अलौकिक मानल्या जाते. सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांची ही वारी अखंड रहावी, या भावार्थाने श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोट द्वारा प्रतिवर्षी श्री क्षेत्र श्रद्धासागर, आकोट ते श्री क्षेत्र पंढरपूर असा ६५० कि. मी. पायदळ प्रवास करीत “श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळा” मोठ्या राजवैभवी थाटात निघत आहे. सन २०१० पासून निघत असलेल्या श्री महाराजांचा हा पालखी सोहळा अद्याप पर्यंत त्यांच्याच कृपा आशीर्वादाने अखंड सुरू आहे. कोरोना काळामध्ये या पालखी सोहळ्यावर फार मोठे संकट आले होते. परंतु, श्री कृपेने महाराष्ट्र शासनाने ठरविलेल्या मानाच्या १० पालख्यांमधील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील आईसाहेब श्री रुक्मिणीदेवी यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांच्या चरणपादुकांना बहुमानाने सोबत घेऊन सलग २ वर्षे ही वारी पूर्ण झाली. अर्थात वारी परंपरेची अखंडता त्यांच्या कृपेनेच पार पडल्याच्या भावना सर्व भक्तांमध्ये व्यक्त होत आहे. यावर्षी तर शासन निर्देशानुसार विदर्भातील महत्त्वाच्या तीन पालखी सोहळ्यांमध्ये नोंद होऊन आईसाहेब श्री रुक्मिणी देवी, श्री क्षेत्र कौंडण्यपूर, श्री संत गजानन महाराज, शेगाव, श्री संत वासुदेव महाराज, आकोट या ३ पालखी सोहळ्यांमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा महाराष्ट्र शासनाने पुरविल्या आहेत.

सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. उलट श्री संस्थेद्वारा सर्व वारकऱ्यांना विमा कवच दिल्या जाते. याशिवाय वारकरी भाविकांना वस्त्रदान समारंभ सुद्धा दरवर्षी संपन्न होत आहे. तसेच गात जा गा गात जा गा । प्रेम मागा विठ्ठला ॥ याप्रमाणे सर्व वारकरी सतत भजन करीत पंढरी वारीचा आनंद लुटत असतात. पालखी मार्गाने दररोज पहाटे काकडा आरती, श्रींचा अभिषेक, ज्ञानेश्वरी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन आणि सतत भजन असा दिनक्रम नियमितपणे पार पडतो. वारकऱ्यांच्या पावल्या, फुगड्या, गायन, वादन यांमुळे असंख्य भाविक भक्त पालखी सोहळ्याशी समरस होऊन विविध प्रकारची सेवा सुविधा पुरवीत आहेत. क्षिरापती घालिता वैष्णवामुखी । तेने देव होत असे सुखी ॥ या सद्भावनेतून अनेक गावची अन्नदाते मंडळी पालखी मुक्कामांच्या ठिकाणी भरभरून निष्ठान्नाचे भोजन वारकऱ्यांना देत आहेत. वारकऱ्यांप्रती त्यांचा सद्भाव अभिनंदननीय आहे. पालखी सोहळ्यासोबत संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्त तथा श्री गुरु महाराजांचे विद्यार्थी, बुवा, महाराज मंडळी, सेवाधारी पायी पदयात्रा करीत आहेत. यावर्षी नावीन्याने वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दाखल झालेले बालवैष्णव आणि त्यांचा वारीतील आनंदाचा सोहळा बघून खऱ्या अर्थाने नवचैतन्याचे वातावरण आहे. असा हा पालखी सोहळा भगवान श्री पंढरीनाथांच्या महाक्षेत्रामध्ये ६५० कि. मी. पायी पदयात्रा करून
हीच व्हावी माझी आस । जन्मोजन्मी तुझा दास ||
पंढरीचा वारकरी | वारी चुको न दे हरि ॥
संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ||
चंद्रभागे स्नान । तुका मागे हेचि दान ||
असं मागणं मागत विठुरायाच्या दर्शनाकरिता पोहोचला आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर मध्ये चंद्रभागेच्या
तीरावर मोठ्या डौलाने उभ्या असलेल्या श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळेमध्ये श्रींचा हा पालखी सोहळा मुक्कामी आहे. या ठिकाणी सात दिवस श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचन, कीर्तन, काकडा, हरिपाठ, तथा सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या भक्ती भावाने संपन्न होत आहे. आषाढ शुद्ध दशमी या श्री महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी श्रींच्या धर्मशाळेमध्ये सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणि चंद्रभागा मातेच्या तीरावरील श्रींच्या अग्निसंस्कार भूमीमध्ये असंख्य भाविकांना अन्नदान होणार आहे. वारकरी संप्रदायातील अलौकिक विभूतीमत्व असलेल्या सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज आणि त्यांच्या पालखी सोहळ्याला कोटी कोटी नमन.
किशोर उर्फ अविनाश गावंडे सहसचिव, – श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोट, #Shri Sant Vasudev Maharaj Dnyanpith Institute, Akot