भारतामध्ये सर्वप्रथम १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिनकोड प्रणाली सुरू झाली. शहराची आणि गावाची अचूक ओळख व्हावी व पत्र किंवा पार्सलचे अचूक वितरण व्हावे, हा यामागील प्रमुख उद्देश होता. त्यावेळी दुसरी कोणतीच संसाधने उपलब्ध नसल्याने सहा अंकी पिनकोड अतिशय महत्त्वाचा समजला जायचा. वितरण प्रणालीमध्ये पिनकोड हा एकमेव पर्याय आणि आधार होता. पिनकोडची निर्मिती हा भारतीय टपाल विभागाच्या प्रवासामधील त्यावेळचा एक मैलाचा दगड आहे. परंतु, मागील काही वर्षामध्ये विज्ञानाने एवढी प्रगती केली की, संपूर्ण जग एका क्लिकने तळहातावर आले. पूर्वी भारतामधील शहरे लहान होती. लोकसं याही आटोक्यामध्ये होती. परंतु, आधुनिक युगामध्ये झपाट्याने होणारी शहराची वाढ आणि अफाट लोकसं या बघता वितरण प्रणालीमध्ये अचूकता आणण्यासाठी टपाल विभागाने हायटेक होत अक्षर आणि अंकाचा नवीन डिजिपिन प्रणाली सुरू केली आहे. डिजिपिन ही आता देशामधील नवी पत्ता प्रणाली ठरणार आहे.
पारंपरिक सहा अंकी पिनकोडमध्ये संपूर्ण शहराच्या क्षेत्राचा समावेश व्हायचा. त्यामुळे त्याची व्याप्ती फार मोठी होती. नेमका पत्ता शोधायला वेळ जायचा. नवीन १० अंकी डिजिपिन घराचे किंवा व्यवसायचे अचूक स्थान दर्शविते. भारतीय टपाल विभागाने वितरणामध्ये अचूकता आणण्यासाठी व नेमके स्थान समजण्यासाठी डिजिपिन प्रणाली सादर केली आहे. अनेकदा बरोबर पत्ता सांगून किंवा लिहून ऑनलाईन वितरण करणाऱ्यांना कधी कधी घराचा अथवा व्यावसायिक ठिकाणाचा पत्ता मिळत नाही.
ऑनलाईन वितरणाची सेवा अचूक आणि वेगाने व्हावी यासाठी टपाल विभागाचा नवीन डिजिपिन अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या डिजिपिनमुळे एखाद्या परिसराची किंवा ठिकाणाची अचूक ओळख होण्यास मोलाची मदत होणार आहे. भारतीय टपाल विभाग गाव, जंगल किंवा समुद्र किनाऱ्यापर्यंतही या डिजिपिनमुळे सहज पोहचू शकते, एवढा हा डिजिपिन अचूक आणि सक्षम आहे. या नवीन प्रणालीमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अन्य आपत्कालीन सेवांना फायदा होणार आहे. तसेच लॉजिस्टिक्स, कुरिअर सेवा, वितरण व कॅब बुकसाठीही या डिजिपिनचा वापर करता येणार आहे. त्यामुळे दुर्गम भागामधील वितरण सेवा अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. डिजिपिनमुळे चुका अतिशय कमी होऊन कार्यक्षमता आणि वितरण सेवेचा वेग वाढण्यास मोलाची मदत होणार आहे.
सहा अंकी पारंपरिक पिनकोड एका मोठ्या शहरासाठी वापरला जात असे. परंतु. काळ बदलत गेला आणि पिनकोडची क्षमता कमी पडू लागली. त्यामुळे भारतीय टपाल विभागाने आयआयटी हैदराबाद आणि इसोसोबत मिळून ही नवीन डिजिपिन प्रणाली विकसित केली आहे. ती अतिशय अचूक आहे. या डिजिपिन प्रणाली अंतर्गत संपुर्ण देशाला ४ मीटर बाय ४ मीटर आकाराच्या लहान लहान भागामध्ये विभाजित केले आहे. प्रत्येक भागाला एक युनिक आयडी देण्यात आला आहे. हा आयडी १० अक्षरांचा एक कोड असून, हा कोड लॅटीट्युड आणि लॉगीट्युडवर आधारित राहणार आहे. या प्रणालीमुळे एखाद्या गल्लीबोळातील ठिकाण अचूकपणे शोधता येऊ शकते, एवढी ही प्रणाली कार्यक्षम आहे. आपला डिजिपिन तयार करण्यासाठी शासनाने एक अधिकृत वेबसाईट सुरू केली असून, या वेबसाईटवर प्रत्येक जण आपल्या लोकेशननुसार हा नवीन डिजिपिन तयार करू शकतो. हा डिजिपिन कोणासही ऑफलाईनही वापरता येणार आहे. आपल्या घराचा पत्ता अचूक शोधण्याची ही नवीन प्रणाली भविष्यामध्ये अतियश उपयुक्त ठरणार आहे. जगामध्ये अद्याप कोणत्याच देशाने ही डिजिपिन प्रणाली सुरू केली नाही. भारतीय संशोधकांनी जगात आघाडी घेत ही प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे भारताची जगाला ही एक अमूल्य देण असणार आहे. जगातील विकसित देशांनी भविष्यामध्ये या डिजिपिनची कॉपी केल्यास नवल वाटू नये, एवढी ही डिजिपिन प्रणाली अचूक आहे. #Digipin_system
