कोणतेही काम करताना तुमचे मानसिक आरोग्य उत्तम असेल, तर तुम्ही ते काम योग्यरीत्या करू शकाल. कारण उत्तम मानसिक आरोग्यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढतोच, पण कार्यक्षमताही सुधारते, पण अनेकांना ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतो. जाणून घेऊयात यावरील काही टिप्स.
ऑफिसमध्ये मानसिक आरोग्य इतके महत्त्वाचे का आहे?
आपल्या मानसिक आरोग्याचा आपल्या कामावर परिणाम होत असतो. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना तुमचे मानसिक आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे.
ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहण्यासाठी काही टिप्स –
■ भावना शेअर करणे : कामाच्या ठिकाणी मनमोकळणेपणे बोलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल, तर अवश्य बोलावे कारण ती तुम्ही मनात दडवून ठेवल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यवर परिणाम होऊ शकतो.
■ नियमित व्यायाम करा : दररोज व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परिणामी तुमचा आत्मविश्वास वाढतो. अशाने तुम्ही पूर्ण एकाग्रतेने काम करू शकाल. लक्षात ठेवा दररोज व्यायाम करणे म्हणजे असे नाही की कोणताही स्पोर्ट्स खेळणे किंवा जिमला जाणे. तज्ज्ञांच्या मते आठवड्यातून किमान ५ दिवस सुमारे ३० मिनिटे व्यायाम करायला हवा. वेळ नसेल तर वर्किंग वुमनने जेवणानंतर फिरण्याचा प्रयत्न करावा. अशाने शरीराबरोबरच मनही शांत होईल.
■ सकस आहार घ्या : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खाण्या-पिण्याचा आपल्या भावनांवर लगेचच किंवा दीर्घकाळ परिणाम होतो. जो आहार आपल्या शरीरासाठी चांगला असतो, तो मानसिक आरोग्यासाठीही चांगला असतो. यासाठी सकस आहार घेणे आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. यासाठी जेवणाची ठराविक वेळ असणे गरजेचे असते. जास्तकरून घरच्या जेवणाला प्राधान्य द्या. तसेच जर बाहेरून ऑर्डर करणार असाल, तर हेल्दी पर्याय निवडा.
■ फ्रेण्ड्स आणि फॅमिलीसोबत वेळ घालवा : नातेसंबंध आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहण्यासाठी काम आणि तुमचे आयुष्य यात समतोल राखणे गरजेचे आहे. ऑफिसचे काम घरी आणू नका. घरी परतल्यानंतर कुटुंबीयांसोबत अवश्य वेळ घालवा. सुट्ट्यांमध्ये मित्र आणि नातेवाईकांना भेट द्या. याने तुमचा एकाकीपणा दूर होईल. कारण एकटेपणा आपल्या आरोग्यासाठी धूम्रपान किंवा लठ्ठपणाइतकाच वाईट असू शकतो. एक लक्षात घ्या जेव्हा तुमचे मानसिक आरोग्य चांगले असते, तेव्हाच तुम्ही ऑफिसमध्ये व्यवस्थित एकाग्रतेने काम करू शकाल.
■ कामातून ब्रेक घ्या : तुमच्या मनात सतत निगेटिव्ह विचारांचा घुमजाव सुरू असेल, तर याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत तुम्ही कामातून ब्रेक घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही एखादी ट्रिप प्लॅन करू शकता. पुस्तके वाचू शकता. काही मिनिटे मन शांत ठेवून तुम्ही स्वतःला रिलॅक्स करू शकता.
■ पुरेशी झोप घ्या : बिझी लाईफस्टाईलमुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही, पण अशाने तुमच्या शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यासाठी पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.