तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी
मुर्तिजापूर | प्रतिनिधी
मुर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर, पूर्णा नदीच्या तीरावर वसलेले पश्चिम विदर्भातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्री लक्षेश्वर संस्थान, लाखपुरी येथे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने जय्यत तयारी करण्यात आली आहे. लाखपुरी (ता. मुर्तिजापूर, जि. अकोला) येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो.
रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री पर्वाच्या निमित्ताने भाविकांसाठी दर्शनबारीची विशेष व्यवस्था करण्यात आली असून उपवास फराळ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. या दिवशी सार्वजनिक अभिषेक, काकडा आरती, भावगीत कार्यक्रम, गावातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी, नवनियुक्त व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांचा सत्कार, हरिपाठ तसेच रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी काल्याचे कीर्तन, दुपारी महाप्रसाद व रात्री श्रींची पालखी मिरवणूक संपन्न होणार आहे.
मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पूर्णा नदी तीरावर दहीहंडी फोडून महाशिवरात्री महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.

महाशिवरात्री महोत्सवानिमित्त मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आयोजित सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री लक्षेश्वर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
