टोरांटो: सध्याच्या काळात अनेक लोक नैराश्याच्या गर्तेत अडकत चालले आहेत. त्यामध्ये बाह्य कारणे जशी असतात तशीच काही शरीरांतर्गत कारणेही असू शकतात. पोटातील जीवाणू ही नैराश्याचे कारण असू शकते, असे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. पोटातील जीवाणूंचा संबंध नैराश्य आणि मानसिक अस्वस्थतेशी आहे, असे कॅनडामधील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या विज्ञानविषयक नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालेले आहे. (Stomach bacteria can also cause depression)

प्रेमिसल बर्सिक यांच्या नेतृत्वाखाली कॅनडातील मॅकमास्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला. आपल्या पोटातील जीवाणूंमुळे आपल्या वर्तनात बदल होतो हे यापूर्वी सिद्ध झाले आहे, पण त्याचा मानसिक विकारांशी प्रत्यक्ष संबंध आजवर स्पष्टपणे सिद्ध झाला नव्हता, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आपल्या बालपणी मनावर पडलेल्या ताणाचा आपल्या पुढील आयुष्यातील मनोभूमिकेवर परिणाम होतो, असेही हे शास्त्रज्ञ म्हणतात. कॅनडातील या शास्त्रज्ञांनी काही नवजात उंदरांवर प्रयोग केले. त्यांना काही वेळ आपल्या मातेपासून लांब ठेवले, तसेच त्यांच्या आतड्यातील जीवाणूंचाही अभ्यास करण्यात आला. आपल्या मातेपासून लांब ठेवल्याने या उंदरांच्या पिल्लांच्या मनावर ताण आल्याचे दिसले. अॅसिटिलकोलाइन नावाचे न्युरोट्रान्समीटर रसायन या उंदरांच्या पोटात असल्याने आतड्याचे कार्यही चांगले होत नव्हते. या उंदरांमध्ये कॉर्टिकोस्टेरॉन हे तणावाशी संबंधित रसायन अधिक प्रमाणात आढळले. त्यावरून या संशोधकांनी निष्कर्ष काढला की पोटातील जीवाणूंचा संबंध नैराश्य आणि अस्वस्थतेशी आहे. (Stomach bacteria can also cause depression)
