अभिजात भाषा म्हणजे काय ? हा दर्जा कसा मिळतो ?
कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने २००५ साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. या दर्जासाठीचे चार निकष आहेत. मराठी भाषा हे सर्व निकष पूर्ण करते हे रंगनाथ पठारे समितीच्या ४३६ पृष्ठांच्या अहवालात सिद्ध केलेले आहे.
काय आहेत निकष…..
भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे १५००-२००० वर्ष जुना हवा.
प्राचीन साहित्य हवे, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटते.
दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
‘अभिजात’ भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

कोणकोणत्या भाषांना अभिजात दर्जा………
भारतात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे.
तामिळ (२००४), संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगू (२००८), मल्याळम् (२०१३), ओडिया (२०१४)
मराठी भाषा ‘अभिजात‘
मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी २०१२ साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वात समिती नेमली गेली. २०१३ साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. महारट्ठी-महरट्ठी- महाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला, असे या अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्रीय भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे जुने असल्याचे पुरावे असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
१२८ पानी अहवालाच्या समारोपात समितीने काय म्हटले?
– अकरा कोटी लोकांची मराठी जगातील १० व्या ते १५ व्या क्रमांकाची भाषा आहे.
– देशातील ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे.
– तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचे अभिजातपण स्वयंसिद्ध आहे.
अभिजात दर्जा मिळाल्यास काय फायदा होणार?
– मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे.
– मराठी बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे.
– भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे. प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.
– महाराष्ट्रातील सर्व १२,००० ग्रंथालयांना सशक्त करणे.