एखाद्या बाबीवर मनातल्या मनात सखोल व सांगोपांग विचार करणे म्हणजे चिंतन. वाचन चिंतनशीलता शिकविते, विवेकी बनविते. जे चिंतनाकडे पाठ फिरवतात त्यांची वाट लागते. ‘रिकामे मन सैतानाचे ठिकाण असते‘ हा सैतान आपल्या जीवनात सतत ताणच निर्माण करतो. त्यामुळे आपला रिकामा वेळ वाचनात घालवणे हा वेळेचा सर्वात मोठा सदुपयोग आहे.

आपल्या आजच्या दगदगीच्या व धकाधकीच्या दैनंदिन जीवनात मनाला काहीतरी विरंगुळा मिळावा, एक प्रकारचा उत्साह वाटावा आणि मनोरंजनातून आपल्या ज्ञानातही काही भर पडावी यासाठी चांगले अवांतर वाचन करण्याची सवय अंगी बाणवायला पाहिजे. अशा वाचनाने कंटाळा निघून जातो. सांसारिक माणसाची संसारातील दुःखे क्षणिक का होईना विसरल्या जातात व मनाला एक प्रकारचा उत्साह मिळतो, काम करण्यास स्फूर्ती लाभते. वाचनात वृद्ध व्यक्तींचा वेळही मजेशीर जातो. जीवनात गोडी निर्माण होते. वाचनाने मनाला स्वतंत्र विचार करावयाची सवय लागते. निर्भय, निश्चल व शक्तिशाली मनासाठी दररोज नित्यनेमाने बोधप्रद, संस्कारक्षम, प्रेरणादायी, असे वैचारिक वाचन करणे अत्यंत हितावह असते.
वाचनाने मनाला आनंद मिळतो, संस्कार होतात, आपल्या ज्ञानात व माहितीत तर भर पडतेच पण विचारात परिपक्वता आल्याने समाजात कसे वागावे हेही आपणास कळते, व्यवहार कुशलता येते. बुद्धीला पैलू पडतात. व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. आत्मविश्वास वाढून विपरीत परिस्थितीत कसे खंबीर राहावे, अडचणींचा सामना कसा करावा हेही समजते. जीवनाला योग्य दिशा मिळते व त्यातूनच जीवन घडते. बुद्धीला वाचनाची मशागत झाली तर ती आणखी सुपीक बनते व तिच्यातून सुवैचारिक कृतिशीलतेचे पीक चांगले उगवते.
प्रेरणादायी संकल्पना, स्फूर्तीदायक सुविचार, बोधप्रद वाक्य वारंवार वाचण्यात आले की मनातील स्पंदने सुयोग्य दिशेने नियंत्रित होऊन आपोआप उचितपणे क्रियाशील होतात. त्यामुळे आपली सृजनशीलता वाढते. वाचनाने बरेवाईट पारखण्याची दृष्टी लाभते. निखळ मनोरंजनाने आपल्या डोक्यावरील चिंता काळज्यांचे ओझे आपोआप कमी होते. सुबोध वाचनाच्या चिंतनाचा वारा मनाला लागल्यास चिंतांना मनात थाराच राहत नाही.
वाचन हे जीवनाला एक विशिष्ट गती देते. त्या गतीतून आपणास आपली प्रगती साधण्यासाठी, वेळेचा सदुपयोग करण्यासाठी, बुद्धीला उत्कृष्ट खुराक मिळण्यासाठी, विचारांना चालना मिळण्यासाठी, जिज्ञासांची उत्तरे मिळण्यासाठी, उचित मार्गदर्शनासाठी, समस्यांवरील उपाय मिळण्यासाठी, स्पर्धात्मक जगात जगण्यासाठी, व्यवहारज्ञान मिळण्यासाठी, व्यवसायाला उपयुक्त माहिती मिळण्यासाठी, आपले अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी सर्वांनी अवांतर वाचन करावयासच हवे. बोधप्रद वाचनाने निर्मळ आनंद मिळतो, सुसंस्कार होतात, मन विचारी होते, वृत्ती संतुलित होते, वाणी चांगली होते, जीवनाला सुयोग्य दिशा मिळते, उचित पैलू पडतात, जीवन घडते, जीवन समृद्ध होते, जीवनाचे सोने होते.
वाचनाने आपली बुद्धी घासूनपुसून स्वच्छ उजळून निघते व ती सतेज झाल्याने तिची विवेकशीलता वाढते नि मन निकोप, विशाल, विवेकी विचारी व समृद्ध होते. चांगल्या वाचनातून जेवढ्या नवनवीन गोष्टींचा परिचय बुद्धीस होईल तेवढी बुद्धीची आकलनता, मेंदूची ग्रहणक्षमता वाढत जाते नि ग्रहणशीलता वाढत गेल्याने स्मरणशक्ती खूप वाढते. वाचनाने ज्ञानप्राप्ती होते, विचार व शब्द यांची सुयोग्य सांगड जुळविता आल्याने भाषाकौशल्य वाढते, भाषेवर प्रभुत्व मिळविता येते. विचारांना स्पष्टता येते, योग्य वळण मिळते, समजदारपणा वाढतो, विविध शास्त्रांचे ज्ञान मिळते, बहुश्रुतता येते नि आपण आपले विचार न अडखळता वेगाने स्पष्टपणे मांडू शकतो. म्हणून आपण नेहमी स्वयंप्रेरित राहण्यासाठी दररोज रिकाम्या वेळेत बोधप्रद, वैचारिक व प्रेरणादायक पुस्तकांचे वाचन करायला हवे. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातही सकारात्मक बदल होतो व आपला आत्मविश्वासही वृद्धिंगत होतो.
एखाद्या बाबीवर मनातल्या मनात सखोल व सांगोपांग विचार करणे म्हणजे चिंतन. वाचन चिंतनशीलता शिकविते, विवेकी बनविते. जे चिंतनाकडे पाठ फिरवतात त्यांची वाट लागते. ‘रिकामे मन सैतानाचे ठिकाण असते’ हा सैतान आपल्या जीवनात सतत ताणच निर्माण करतो. त्यामुळे आपला रिकामा वेळ वाचनात घालवणे हा वेळेचा सर्वात मोठा सदुपयोग आहे.
वाचलेले कधीच वाया जात नाही. त्याचा जीवनात कोठे ना कोठे, केव्हा ना केव्हातरी हमखास उपयोग होतोच. वाचनाने मनाला स्वतंत्र विचार करावयाची सवय लागते. वाचनाने विचारांना गती मिळते व त्यातूनच आपली प्रगती होते. वाचनाने जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते, आशावादी होते, सकारात्मक बनते, व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, वैचारिक पातळी उंचावते, विधायकता अंगी येते व सामाजिक प्रतिष्ठासुद्धा लाभते. ही शिदोरी आयुष्यभर आपल्याला साथ देते, अडचणीत हात देते, संकटात धीर देते, मानसिक बळ देते. त्याकरिता जे काय वाचायचे ते चांगल्या दृष्टिकोनातून व चांगलेच वाचले पाहिजे. आपल्या वाचनात येणा-या सुविचारांचे, छान छान वेच्यांचे, चांगल्या उता-यांचे, जीवनोपयोगी मजकुराचे एखाद्या वहीत दररोज लिखाण करीत जावे. ज्यावेळी आपणास वाचायला काहीच नसेल अशा वेळी हेच सुविचार, वेचे, उतारे पुन्हा पुन्हा वाचीत जावे. त्यावर चिंतन व मनन करीत जावे. ते वेळोवेळी आपणास पुन्हा पुन्हा सुयोग्य, तेजस्वी व प्रबळ वैचारिक शक्ती पुरवित जातील नि उचित मार्गदर्शन करीत योग्य दिशा देत जातील. ‘करत करत वाचन, जडबुद्धीही होते सुजाण’ असे वाचन हे यशस्वी जीवनाचे गमक आहे.
प्रा. देवबा शिवाजी पाटील
खामगाव, जि.बुलडाणा