वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
कोल्हापूर : दोन वर्षांच्या खंडानंतर निबंधमुक्त नवरात्रौत्सवात २५ लाख भाविक दर्शनाला येण्याची शक्यता असून ३० मिनिटांत अंबाबाईचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
त्यासाठी मुख्य दर्शन रांग शिवाजी चौकपासून जुना राजवाडामार्गे पूर्व दरवाजातून मंदिरात येईल. तसेच पेड पासची रांग पूर्व दरवाजातून सटवाई मंदिरमार्गे गाभाऱ्यात जाईल. दर्शन रांगेसाठी मंडप उभारणी तसेच मॅट घालण्यात येणार आहे.
अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. दिव्यांग, वयोवृद्ध, बाहेरगावाहन येणाऱ्या भाविकांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी २०० रुपये भरून पेड पासचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. ऊन-पावसापासून रक्षण कोरोनानंतर गतवर्षी दर्शनासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला होता. मात्र, यंदा गाभाऱ्यामध्ये दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेतन जावे लागणार आहे. शिवाजी चौकापासून दर्शन रांगेसाठी ऊन-पावसापासून रक्षणासाठी मंडप उभारला जाणार आहे. मुखदर्शनासाठी सर्व दरवाजे खुले मुखदर्शनासाठी भाविकांना महाद्वारसह सर्व दरवाजांतून प्रवेश दिला जाईल. त्यासाठी गरुड मंडपाशेजारी रांग लावण्यात येणार आहेत.
दर्शनानंतर सर्व दरवाजांतून बाहेर पडता येईल. पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट भाविकांसाठी दर्शन रांगेसह ठिकठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल. तसेच देवस्थानचे कर्मचारी दर्शन रांगेत पिण्याचे पाणी देणार आहेत. शिवाजी चौक, जुना राजवाडा, बिनखांबी गणेश मंदिर, जोतिबा रोड, ताराबाई रोड,महाद्वार रोड या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले. पेड पासद्वारे ताशी एक हजार भाविकांना दर्शन ‘पेड’ (सशुल्क) दर्शन पासद्वारे प्रत्येक तासाला एक हजार भाविक दर्शनासाठी सोडण्यात येतील. मुख्य दर्शन रांगेला अडथळा न आणता ही व्यवस्था करण्यात येणार आहे. दर्शन रांग पढे सरकविण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.