वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
वर्ध्यात होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची परिपूर्ण कार्यक्रम पत्रिका अखिल भारतीय साहित्य महामंडळाने जाहीर केली नसली, तरी परिसंवादाचे विषय जाहीर केले आहेत. यंदा संमेलनात साहित्यातील कृषी, अर्थ, प्रबोधन परंपरा.अनुवाद यासह सर्व साहित्य प्रकारातील लेखकांना व्यक्त होण्यासाठी आम्हाला काही बोलायचं आहे… असे विविधांगी परिसंवाद होणार असल्याचे महामंडळाने जाहीर केले आहे.
२०२३ च्या प्रारंभी ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान वर्ध्यातील स्वावंलबी विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मंगळवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक झाली. गेल्या महिन्यात गोव्यात आयोजित बैठकीच्या वेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे निधन झाल्याने ती बैठक रद्द करावी लागली होती. त्यामुळे ही बैठक वात घेण्याचे ठरले. या बैठकीत संमेलनात होणारे परिसंवादांचे विषय जाहीर करण्यात आले.
हे संमेलन वर्ध्याच्या भूमीत होणार असल्याने महात्मा गांधी ते विनोबा भावे वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून या विषयावर परिसंवाद होणार आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम देशातील कृषी क्षेत्रावर होत असल्याने कृषी जीवनातील अस्थिरता,प्रक्षोभ आणि मराठी लेखक या महत्वाच्या विषयावर परिसंवाद ठेवण्यात आला आहे. विदर्भाची भूमीत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचे मोठे योगदान आहे, त्यावर कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा यावर परिसंवाद होणार आहे. गेल्या काही वर्षात सातत्याने लेखकांना आपल्या भूमिका व्यक्त कराव्याशा वाटत आहेत, त्यावर आधारित होणाऱ्या परिसंवादात आम्हां लेखकांना काही बोलायचे आहे, या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादत कथाकार,कांदबरीकार, कवी, ललित लेखक आणि समीक्षकांना व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील ग्रंथालय चळवळीवर दृष्टीक्षेप टाकणाऱ्या ग्रंथालय चळवळीचे यशापयश यावरही परिसंवाद होणार आहे.
वंचित समाजातील साहित्यातील लोकशाहीचे चित्रण या विषयावर परिसंवाद होईल.साहित्यातील अनुवादाच्या काहीशा दुर्लक्षित असलेल्या अनुवाद प्रकारावरही भारतीय व जागतिक साहित्य विश्वात मराठीचा झेंडा फडकवणारे अनुवादकांवरही परिसंवाद प्रकाश टाकण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील उद्यम व अर्थ विषयक लेखन यावरही एका परिसंवादात चर्चा होणार आहे.
संमेलनात एका जुन्या पुस्तकावर चर्चा होते, ती यंदा ताराबाई शिंदे यांच्या स्त्री -पुरूष तुलना या पुस्तकावर होणार आहे. परिसंवादाचे विषय ठरले असन वक्त्यांची नावे संबंधित साहित्य संस्थांकडूनमागवली आहेत. त्यानंतर परिसंवादाचे वक्ते ठरवले जातील, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी दिली.