वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
पुरेशी आणि उत्तम झोप ही मानवी आरोग्यासाठी जशी आवश्यक आहे, तशीच ती मुलांच्या एकूण विकास वाढीसाठीही आवश्यक आहे. लहान मुलांना, वयात आलेल्या मुलांना आणि तरुणांना तर उत्तम झोपेची नितांत आवश्यकता असते. दिवसभर कराव्या लागणाऱ्या अनेक कामात आपला मेंदू सतत व्यस्त असतो. शरीरातील विविध अवयव कार्यप्रणालीही कायम त्यांच्या नेमस्त कामात गर्क असतात. झोप घेण्यातून मेंदू आणि इतर अवयवांना जरासा आराम, अवकाश मिळतो आणि शरीर मनाचा हा थकवा दूर होतो.
जशी व्यायाम करून स्नायूंची ताकद वाढते, तशीच झोपेने मेंदूची! विविध अभ्यासातून शास्त्रज्ञांनी झोपेचे महत्त्व आपल्याला पटवून दिले आहे. झोप एकाच वेळी शरीराला रिलॅक्स करीत मनाला सजग करते. आवश्यक तेवढी झोप मिळाल्याने अवधान, आकलनशक्ती, स्मृती, ग्रहणशक्ती या साऱ्यांचे संगोपन आणि संवर्धन तर होतेच पण रोगप्रतिकारकशक्तीही वाढते! ।
शाळेचा अभ्यास, शिकवण्या, परीक्षा आणि आता ई-शिक्षणाच्या ताण-चक्रात अडकलेल्या आपल्या मुलांना तनामनाने निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. अन्न, पाण्याएवढीच गरजेची असलेली मुलांची झोप व्यवस्थित होतेय ना, याकडे आपले दुर्लक्ष होते. आरोग्यदायी होण्यासाठी वेगवेगळ्या वयात किती आणि कशी झोप मिळावी, याचे एक गणित असते.
नुकत्याच जन्माला आलेल्या बाळास २०-२२ तास झोप गरजेची असते. तीन महिन्यांत ती उत्तरोत्तर कमी होत जाते आणि साधारण वर्षांचे मूल एकूण १२-१४ तास शांत, सलग झोपायला हवे. याशिवाय त्याला अधुनमधून तास, दीड तासांची झपकी आवश्यक असते. ती मिळाली नाही तर मूल चिडचिड, रडरड करते. त्याचे खाणेपिणे, खेळणे आणि कृतिशील राहण्यावर कमी झोपेचे परिणाम दिसतात. त्याचा एकूण मनोसामाजिक, बौद्धिक विकास खुंटण्याचा दूरगामी परिणामही याने होऊ शकतो.
मुलांच्या जैविक घडाळ्याच्या (दिन-रात्रीच्या) वेळापत्रकानुसार झोप घेणे, हे सुरूवातीला कठीण असले तरी झोपेचा दिनक्रम काहीच दिवसांत ठरविता येतो. काही मुले स्वत:हून झोपतात तर काहींना झोपाळा, थोपटणे, अंगाई लागते. लहान बाळांना अंग आक्रसून टाकणाऱ्या झोळीत झोपविणे वा पालथे झोपवणे तसे धोकादायकच! यात मूल गुदमरून जाण्याची भीती असते. त्यापेक्षा मोकळा पाळणा/ झुला आणि उताणे झोपविणे जास्त योग्य.. ___ बालकमंदिर, नर्सरी शाळेमध्ये जाणाऱ्या अनेक मुलांना सकाळी बऱ्याच लवकर उठवून दूरच्या शाळेत टाकण्याच्या पालकांच्या अट्टाहासापायी कित्येक लहान मुलांची झोप अपुरी होते. व्यवस्थित नाश्ता होत नाही आणि ती वारंवार आजारी पडतात. या मुलांना साधारण १२ तास झोप आवश्यक असते. ती न मिळाल्याने लहान वयात जागरणाने तणावग्रस्त होतात, चंचल होतात आणि त्यांना झोपी घालणे कठीण होते. शाळांनी आणि पालकांनी हे दुष्टचक्र कसे बदलता येईल याविषयी जरूर विचार करावा. ६ ते १२ वर्षांच्या मुलांना यथोचित मुक्त खेळ दिला गेला तर त्यांच्या मनोशारीरिक वाढीसोबत त्यांच्या झोपेचे गणितही छान जमून येते. त्यांना आवश्यक असणाऱ्या साधारण १०-१२ तासांच्या झोपेसाठी त्यांनाही वेळापत्रक बसविणे खूप गरजेचे आहे.