टाळता येणारे अंधत्व रोखणाऱ्या मिशनची सूत्रे डॉ. तात्याराव लहानेंकडे
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
मुंबई : टाळता येणाऱ्या अंधत्वापासून महाराष्ट्र मुक्त करण्याचे मिशन राज्य सरकारने हाती घेतले असून या मिशनची सूत्रे ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हाती दिली आहेत. दिवाळी होताच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे मिशन सुरू होईल आणि लाखो रुग्णांच्या आयुष्यात येऊ घातलेले अंधत्व रोखले जाईल.
मोतिबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा आणि मधुमेह यामुळे अंधत्वाचा धोका अटळ असतो. मात्र, वेळीच उपचार केले तर हा धोका म्हणजेच हे अंधत्व टाळताही येते. हे उपचार अशा रुग्णांपर्यंत तातडीने पोहोचवणे हाच या मिशनचा मुख्य गाभा असेल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टाळता येणाऱ्या अंधत्वपासून महाराष्ट्र मुक्त मिशन जाहीर करताना या मिशनचे सर्वाधिकार डॉ. तात्याराव लहाने यांच्या हाती सोपवले. देशात मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात महाराष्ट्र आघाडीवर असून २०१७ साली मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशन हाती घेण्यात आले होते. डॉ.लहाने यांचे हे मिशन देशपातळीवर स्वीकारले गेले. डॉ. लहाने हे नेत्रशस्त्रक्रियांच्या विक्रमासाठीच ओळखले जातात, याची नोंद फडणवीस यांनी केली आहे. मोतिबिंदमुक्त मिशनमध्येही आरोग्य खात्यासह विविध विभागांना एकत्र आणण्यात आले होते. त्यानुसारच अंधत्वमुक्त महाराष्ट्र मिशनसाठी सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य खात्याच्या सर्व सुविधा या मिशनमध्ये एकत्र आणण्याचे अधिकार या मिशनला देण्यात आले आहेत. या मिशनसाठी आवश्यक असलेले सर्व अतिरिक्त सहाय्य सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास मंत्रालयाकडूनही दिले जाईल, असेही फडणवीस यांनी नमूद केले आहे.
दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे टाळता येणारे अंधत्व रोखणारे मिशन सुरू केले जाईल. तत्पूर्वी या मिशनची माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल, अशी प्रसिद्धी देखील अपेक्षित असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.
•डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या आकडेवारीवरून अंधत्व रोखणारे
हे मिशन किती जणांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणार आहे याचा अंदाज येतो. भारतात आजघडीला १.३ कोटी मोतिबिंदूचे रुग्ण आहेत. यापैकी १७ लाख रूग्ण महाराष्ट्रात असू शकतात. त्यांचे निदान होऊन उपचार झाले तर मोतिबिंदमुळे येऊ घातलेले अंधत्व रोखले जाईल. काचबिंदूचीही तीच स्थिती आहे. महाराष्ट्रभरात काचबिंदूचे किमान ८० हजार रुग्ण असू शकतात. त्यांचे निदान होऊन उपचार होणे आवश्यक आहे. अन्यथा, अंधत्वाचा धोका संभवतो. हा धोका टाळण्याचे काम हे मिशन करेल.
महाराष्ट्रात २५ लाख लोकसंख्य २ मधुमेहाने ग्रस्त आहे. मुंबई तर देशाची मधुमेही राजधानी मानली जाते. मधुमेह झालेल्या रुग्णांना साधारण १० वर्षांनी अंधत्व येऊ शकते. डोळ्यांमागील पडदा म्हणजे रेटिना कमजोर होऊन रक्तस्राव होतो आणि अंधत्व येते. मधुमेहाचा हा दुष्परिणाम वेळीच लेसर उपचार केले तर निष्प्रभ ठरवता येते. म्हणजेच अटळ अंधत्वही रोखता येते. तिरळेपणामुळे एक डोळा अंध होणे ही साहजिक प्रक्रिया आहे. सारे काम एकाच डोळ्याने होत असल्याने अजिबात काम न करणारा हा तिरळा डोळा, त्याला आळशी डोळाही म्हणतात, शेवटी अंध होतो. महाराष्ट्रात अशा रुग्णांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. तेदेखील या मिशनमध्ये केले जाईल.