वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
आर्थिक संकटांतून सुटका करण्यासाठी पाकिस्तानला नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे. कारण चक्क चीनने पाकिस्तानातून गाढवे आणि कुत्री यांची आयात करण्यात रस दाखविला आहे.
आर्थिक संकटांतून मुक्तता व्हावी, यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. गाढवांची सर्वाधिक संख्या असलेले पाकिस्तान हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे राष्ट्र आहे. सुमारे ५० लाख ७० हजार गाढवे पाकिस्तानात आहेत. त्यामुळे त्यांची निर्यात केल्यास मोठा फायदा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुसरीकडे चीनने गाढवांची आयात करण्यास तयार आहे. नुकतीच आयात आणि निर्यात धोरणाबाबत वाणिज्य आणि संसदेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची एक बैठक झाली. या बैठकीनंतर चीन गाढवांची तसेच कुत्र्यांची आयात करण्यास तयार आहे, अशी माहिती समितीने दिली आहे. खासदार अब्दुल कादीर यांनी सांगितले की, चीनचे राजदुतांनी पाकिस्तानातून मांस निर्यात करावी, असा आग्रह धरला आहे. अफगाणिस्तानपेक्षा पाकिस्तानातील गाढवांची किंमत कमी आहे. त्यामुळे चीनला मांसाची निर्यात करणे सहज शक्य आहे. लंपी आजारामुळे अफगाणिस्तानातून गाढवांची आणि अन्य प्राण्यांची आयात तूर्त थांबविली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी पंजाब प्रांतातील ओकारा जिल्ह्यात सुमारे ३ हजार एकरवर गाढवांची पैदास करण्याचा उपक्रम राबविला होता. सरकारतर्फे हा प्रकल्प राबविला जात आहे. तेथे गाढवांची पैदास केली जाते. तसेच अमेरिका, चीन आणि अन्य देशांना गाढवांची निर्यात करण्याची योजना आहे. त्यामाध्यमातून परदेशी चलनाचा साठा वाढविण्याची योजना आखली आहे. कारण पाकिस्तानच्या परकीय गंगाजळी कमी होत चालली असून तो आर्थिक संकटात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गाढवांची आयात कशासाठी ?
चीन हा गाढवांची आयात हा प्रामुख्याने पारंपरिक औषधे बनविण्यासाठी करतो. गाढवामध्ये एजिओ किंवा एक प्रकारचा चिकट द्रवपदार्थ असतो. तो मानवी रक्तासाठी पोषक आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा असतो. चीन यापूर्वी पश्चिम आफ्रिकेतील निगार आणि बुर्कीना फासो या देशांतून गाढवांची आयात करत होता; परंतु या देशांनी आता निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे चीनची नजर पाकिस्तानच्या गाढवांवर पडली आहे.