संभाजी ब्रिगेड : शंतनू हिंगणे यांची माहिती
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
अकोला, दि. १५। स्मृतिशेष केशव सीताराम ठाकरे उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ रोजी झाला होता. त्यांचा १७ सप्टेंबर हा पावन जन्मदिन संभाजी ब्रिगेड लोकप्रबोधन दिन म्हणून यावर्षीपासून साजरा करणार, अशी घोषणा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी केली. अकोला जिल्ह्यातही प्रबोधनकार ठाकरे यांचा जयंती उत्सव १७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जुना आरटीओ रोड, संभाजी राजे मार्ग, संभाजी ब्रिगेड ऑफिस येथे साजरा करण्यात येणार आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी १६ ऑक्टोबर १९२१ रोजी प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन सुरू केले. त्यातून त्यांनी आपल्या प्रखर सत्यवादी लेखणीतून महाराष्ट्राची वैचारिक मशागत केली. त्यांना प्रबोधनकार म्हणून ओळख प्राप्त झाली. विषमतेच्या विरोधात सत्यशोधक बाण्याने निर्भीडपणे लोकांच्या बाजूने उभे राहणारे केशव सीताराम ठाकरे हे खरे प्रबोधनकार ठरलेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्यावतीने तथागत गौतम बुद्ध ते जिजाऊ-शिवरायफुले-शाहू-आंबेडकर, संविधान या क्रांतिविचांराचा जागर व्हावा म्हणून प्रबोधनकारांचा जन्मदिवस राज्यभर लोकप्रबोधन दिन म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.

प्रबोधनकारांनी धार्मिक अंधश्रद्धा. अनिष्ट रूढीपरंपरा पुरोहितशाही, भांडवलशाही याविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण, प्रबोधन, शेतकरी, कामगार इत्यादी प्रश्नांसाठी आंदोलने केली. त्यांचे हे कार्य अतुलनीय आहे. महाराष्ट्राचे हित व लोकहित यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी अत्यंत हिरिरीने भाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची अस्मिता ही त्यांची प्रेरणा होती. सतत भ्रमंती, प्रबोधन, लेखन, भाषण, आंदोलने, कृतिशील विचार व आचरण यातून त्यांचे वेगळपण लक्षात येते. प्रबोधनकारांनी सत्यशोधक परंपरा चालवत मांडलेला विचार व संघर्ष अजून संपलेला नाही. शेतकरी, बेरोजगार, युवक-युवती, कामगार आदिवासी व शोषित यांचे प्रश्न कायम आहेत. वर्तमानात लोकशाहीच्या नावावर हुकूमशाही लादल्या जात आहे. भारताचे संविधान व लोकशाही अबाधित राहण्यासाठी लोकप्रबोधनाची अत्यंत गरज आहे. १७ सप्टेंबर हा प्रबोधनकारांचा जन्म दिवस हा लोकप्रबोधन दिन म्हणून सर्वत्र उत्साहाने आयोजित केला जाणार आहे. प्रबोधनकारांच्या विचारांचा हा जागर अविरत राहिला पाहिजे, यासाठीच हा उत्सव सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी, प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, विभागीय अध्यक्ष गजानन भोयर आदींच्या मार्गदर्शनात व प्रभारी जिल्हाध्यक्ष अभियंता शंतनू हिंगणे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अकोला लोकसभा अध्यक्ष प्रशांत भारसाकळे, प्रभारी जिल्हाध्यक्ष अभियंता शंतनू हिंगणे, अकोला तालुका अध्यक्ष, शैलेश तायडे, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष, उज्ज्वल ठाकरे, मूर्तिजापूर शहर अध्यक्ष, पवन तळोकार, बाळापूर तालुका अध्यक्ष देवानंद साबळे, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष गणेश अंदुले आदींनी केले.