प्रबोधनकार ठाकरे म्हणजे एक बहुरंगी व्यक्तिमत्त्व होय. टंकलेखक, छायाचित्रकार, तैलचित्रकार, पत्रपंडित, शिक्षक, संपादक, चळवळीकार, समाजसुधारक, वक्ते, नेते, पटकथा-संवाद लेखक, चरित्रकार आणि इतिहासकार अशी त्यांची विविधांगी ओळख होती. ते ग्रंथप्रेमी आणि ग्रंथकारही होते. प्रबोधनकार ठाकरे यांची उद्या (१७ सप्टेंबर) जयंती. त्यानिमित्त…
प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या जीवनात लहानमोठे सुमारे २५ ग्रंथ लिहिले. त्यातील कोदंडाचा टणत्कार’, ‘खरा ब्राह्मण’, ‘ग्रामण्यांचा इतिहास’, ‘रंगो बापूजी’, ‘वक्तृत्व शात्र’, ‘भिक्षुकिचे बंड’, ‘दगलबाज शिवाजी’, ‘उठ महाठ्या उठ’ आदी पुस्तके लिहून हिंदू धर्म, रुढी-परंपरांच्या दांभिकतेवर आसूड ओढले. प्रबोधनकारांनी प्रबोधन पाक्षिक हे १९२१ साली सुरू केले. त्या वेळच्या सामाजिक-राजकीय घटनांवर टिप्पणी करून भाष्य केले. नुसते भाष्य करून थांबले नाहीत, बहुजन समाजाला भिक्षुकीशाहीच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी प्रबोधन केले.
१६ ऑक्टोबर १९२१ रोजी प्रबोधनकारांनी ‘प्रबोधन’ हे वृत्तपत्र काढले. हिंदू धर्मातील अनिष्ठ प्रथा, हुंडाविरोधी चळवळ, भटशाही, बालविवाह अशा अनेक विषयांवर स्पष्ट मत मांडून प्रहार केले. पुण्यातील प्रबोधनचे कार्यालय हे ब्राह्मणेतर पुढाऱ्यांच्या बैठकीचे आणि भेटीगाठीचे केंद्र बनले होते. ते पुण्यात असेपर्यंत म्हणजे ऑगस्ट १९२७ पर्यंत प्रबोधन प्रकाशित व्हायचे.
- शिवसेनेच्या जन्मानंतर सप्टेंबर १९७३ साली प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘उठ महाठ्या उठ’ पुस्तक लिहिले. मराठी माणसाला त्याच्या लढाऊ परंपरेची आठवण करून देणारे हे पुस्तक आहे. विचाराची उपयुक्तता आणि टिकाऊपणा लेखाच्या प्रत्येक वाक्यात आहे. ‘उठ महाठ्या उठ’ या पुस्तकातील लिखाणाला, विचारांना आणि मार्गदर्शनाला आजही मोल आहे. या पुस्तकातले लेख शिवसैनिकांनीच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाने आत्मसात करावे. वर्तमान परिस्थितीत प्रबोधनकारांनी ४० वर्षांपूर्वी मारलेली ‘उठ महाठ्या उठ’ ही डरकाळी प्रभावी ठरणार आहे.
१९०६-०७ दरम्यान खान्देशी मुक्कामात असताना आधी ‘सारथी’ मासिकात तर नंतर ‘बातमीदार’मधून लेखन केले. शाळेत असताना प्रबोधनकारांचे दोन लेखही छापून आले होते. १९१९मध्ये दादर इंग्लिश स्कूलच्या हॉलमध्ये संत श्री राममारुती महाराजांची पुण्यतिथी साजरी झाली. त्यावेळी प्रबोधनकारांचे हिंदू धर्माचे दिव्य’ या विषयावर जाहीर व्याख्यान झाले. ऐतिहासिक पुराव्याने खच्चून भरलेले प्रबोधनकारांचे हे व्याख्यान ऐकल्यानंतर ते पुस्तक रूपात प्रसिद्ध व्हावे असा आग्रह आद्यमिशनरीकार गजाननराव वैद्य यांनी धरला. त्याप्रमाणे दिवाळीच्या मुहूर्तावर २० ऑक्टोबर १९१९ रोजी ‘हिंदू धर्माचे दिव्य’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाची पहिली ३००० प्रतींची आवृत्ती अवघ्या चार महिन्यांत संपली.
अनेक विषयांवरील संस्कृत, मराठी आणि इंग्रजी ग्रंथांचा अभ्यास/ वाचन चालले असताना प्रबोधनकारांचे लक्ष वक्तृत्व विषयाकडे गेले. त्यांनी १९१४ ते १९१८च्या दरम्यान ‘वक्तृत्व शास्त्र’ या ग्रंथाचे लेखन पूर्ण केले. हे पुस्तक वाचल्यानंतर लोकमान्य टिळकांनी ‘आपल्याकडील केशव सीताराम ठाकरे यांचे वक्तृत्व शात्र पुस्तक अभ्यासक्रमात ठेवावे असा सल्ला त्यांच्या अभिप्रायात दिला होता. प्रबोधनकारांनी नोव्हेंबर १९१८ मध्ये ‘कोदंडाचा टणत्कार’ हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. या पुस्तकाच्या सहा हजार प्रती पंधरा दिवसांत खपल्या. प्रबोधनकारांची ‘भिक्षुकशाहीचे बंड’ या पुस्तकाच्या पाच हजार प्रती छापल्या. शाहू महाराज हे प्रबोधनकारांच्या लिखाणाच्या प्रेमात पडले होते. प्रबोधनकारांना संदर्भ ग्रंथ खरेदी करण्यासाठी ते कधी कधी मदत करीत. प्रबोधनकारांचे ग्रंथही खरेदी करीत. “भिक्षुकशाहीचे बंड’ या ग्रंथाच्या दोन हजार जादा प्रतीची ऑर्डर त्यांनी नोंदवली होती. त्यावेळी ब्राह्मणेतर चळवळीचे प्रबोधनकार हे मूळ लेखक होते. शाहू महाराजांना प्रबोधनकारांविषयी आदर होता. ‘परिणामकारक वक्तृत्व असावे कसे आणि ते कमवण्यासाठी उमेदवारांनी स्वाध्यायाची, आवाजाच्या कमावणीची, हावभाव नि मुद्राभिनयाची कस कशी तयारी केली पाहिजे याचे योग्य मार्गदर्शन प्रबोधनकारांच्या वक्तृत्व कला आणि साधना’ या पुस्तकाद्वारे मिळते. या पुस्तकाची पहिली आवृत्ती मे २०१८ रोजी निघाली. १९७० साली या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली. या पुस्तकामुळे वक्तृत्वाची शैली कमावतानाच, शीलसंवर्धनाच्या आणि भाषाशैलीच्या केलेल्या अनेक सूचना उदयोन्मुख तरुण पिढीला मार्गदर्शक ठरतील असा विश्वास प्रबोधनकारांनी मनोगतात व्यक्त केला आहे.
प्रबोधनकारांनी वयाच्या ८८ व्या वर्षी ‘माझी जीवनगाथा’वर हे जीवनात घडलेल्या सुख-दुःखाच्या आठवणीने गुंफलेले पुस्तक लिहून पूर्ण केले. ‘माझी जीवनगाथा’ ३ सप्टेंबर १९७३ मध्ये प्रकाशित झाले. प्रबोधनकारांच्या संघर्षमय जीवनाची ती गाथा आहे. प्रबोधनकार म्हणतात, ‘माझ्या हयातीला चिकटलेले व्यसन म्हणजे बुकबाजी ऊर्फ ग्रंथसंग्रह.’ पगार झाला की त्यांचे पाय लॅमिंग्टन रोड, गिरगावला ग्रंथ खरेदीसाठी वळायचे. बाजारात मराठी, इंग्रजी नवीन ग्रंथ आले की प्रबोधनकार ते विकत घ्यायचे आणि अधाशासारखे वाचून फडशा पाडायचे. त्यांचे खासगी ग्रंथालय म्हणजे विविध विषयांवरील पुस्तकाचे ग्रंथ मंदिरच होते. उडॉल्फ रॉथ या जर्मन चिकित्सकाच्या ऋग्वेदावरील इंग्रजी काँमेटरीचा संदर्भ त्यांना सापडला. तेव्हा अधिक तपशील मिळवण्यासाठी त्या पुस्तकाच्या शोधात अख्खी मुंबई पालथी घातली. पण ते त्यांना मिळाले नाही. प्रकाशकाकडूनही त्यांच्या पुस्तक विक्रेत्या मित्रांनी ते पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ते मिळाले नाही. कारण त्या पुस्तकाच्या अवघ्या ५५० प्रती छापल्या होत्या. प्रकाशकाच्या जवळ एकही प्रत शिल्लक नव्हती. हे पुस्तक मिळत नाही म्हणजे काय? प्रबोधनकार जिद्दीला पेटले. दरम्यान त्यांना कळले की, बडोद्याला सयाजीराव गायकवाडांच्या ग्रंथालयात ते पुस्तक आहे. प्रबोधनकारांनी तत्काळ बडोदे गाठले. तिथे काही दिवस मुक्काम करून रॉथच्या ग्रंथातून काही तपशील लिहून घेतला. हवी असलेली गोष्ट मिळेपर्यंत शांत न बसणे, त्याचा निकाल लागला पाहिजे असे त्यांचे मत होते.
प्रबोधनकारांच्या ‘माझी जीवनगाथा’सह इतर पुस्तके, पुस्तिका आजच्या मराठी तरुण पिढीने आवश्यक वाचावी. फक्त वाचूच नये तर त्याची पारायणे करावी. तरच मराठी अस्मिता, महाराष्ट्राभिमान आणि जाज्वल्य हिंदुत्व खऱ्या अर्थाने कळू शकेल.
योगेंद्र ठाकूर