रेल्वे बोर्डाचे सर्व स्थानकांना आदेश; इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या पाठपुराव्याला मोठे यश
मुंबई : रेल्वेस्थानकांवरील सर्व स्टॉल्स व रेल्वे गाड्यांमध्ये वर्तमानपत्रे आणि नियतकालिके विक्रीसाठी ठेवण्याची परवानगी द्या, असे महत्त्वपूर्ण आदेश रेल्वे बोर्डाने भारतीय रेल्वेच्या सर्व स्थानक प्रमुखांना दिले आहेत.
या संदर्भात इंडियन न्यूज पेपर एजन्सीने केलेल्या पाठपुराव्याला हे मोठे यश आले असून, आता रेल्वे प्लॅटफॉर्मवरील स्टॉल्ससह गाड्यांमध्ये पुन्हा एकदा वर्तमानपत्रांसह नियतकालिके वाचकांसाठी उपलब्ध होतील. कोरोना काळात विविध कारणांमुळे रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स आणि गाड्यांमध्ये वृत्तपत्रांसह नियतकालिके विक्रीस बंदी घालण्यात आली होती. कोरोना जावून दोन वर्षे उलटली तरी ही बंदी मात्र कायम राहिली. रेल्वे स्थानकांवरील बहुद्देशीय स्टॉल्सवर वृत्तपत्रे आणि नियतकालिके हटवली गेली व त्यांची जागा अन्य पदार्थांनी घेतली. त्याचा मोठा फटका वृत्तपत्रांच्या वाचकांनाही बसत आहे. याची दखल घेत रेल्वे गाड्यांमध्ये वर्तमानपत्रे व नियतकालिके विक्रीस पूर्ववत परवानगी देण्याची मागणी इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) या लघु, मध्यम व मोठ्या वर्तमानपत्र समूहांच्या सर्वोच्च मंडळाने सातत्याने भारतीय रेल्वे प्रशासनाकडे लावून धरली होती. अखेर ‘आयएनएस च्या ७ मार्च २०२३ च्या पत्राची दखल घेत रेल्वे बोर्डाचे संचालक सुमीत सिंग यांनी सर्व रेल्वेस्थानक प्रमुखांना पत्र पाठवून रेल्वेस्थानकांवरील बहुद्देशीय स्टॉल्स व गाड्यांमध्ये वर्तमानपत्रे व नियतकालिके विक्रीस ठेवू देण्याचे आदेश जारी केले.
रेल्वे बोर्डाचे आदेश काय म्हणतात?
• बहुद्देशीय स्टॉल्स (एमपीएस) धोरण, २०१७ च्या कलम व २ नुसार प्रवासादरम्यान प्रवाशांच्या वाचनाची गरज असलेली वर्तमानपत्रे रेल्वे स्थानकांवरील बहुद्देशीय स्टॉल्समध्ये रूपांतरीत झालेल्या सर्व स्टॉल्सवर उपलब्ध होतील, हे पहावे.
• कोरोना पूर्व काळात सर्व रेल्वेस्थानकांवरील स्टॉल्स व गाड्यांमध्ये वर्तमानपत्रे व नियतकालिके उपलब्ध असायची. तशी विक्री पूर्ववत होईल, याची झोनल रेल्वे प्रशासनाने काळजी घ्यावी. • रेल्वेस्थानकांवरील स्टॉल्स व गाड्यांमध्ये वर्तमानपत्रे व नियतकालिकांच्या विक्री व पुरवठ्यावर बंदी नाही. त्यामुळे या संदर्भात कोरोना काळाआधी असलेली परिस्थिती पूर्ववत होईल, याची काळजी घ्यावी.
• रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एच. व्हिलर बुक स्टॉलचे रूपांतर बहुउद्देशीय स्टॉलमध्ये गेल्याने वर्तमानपत्रे, मासिके व पुस्तके यांची जागा पाकीटबंद खाद्यपदार्थ, थंड पेये यांनी घेतली. रेल्वेवरील मुंबई विभागातील ए.एच. व्हीलर कंपनीचे बुक स्टॉलचे रूपांतर बहुउद्देशीय दुकानांत केले गेले. प्रवाशांना वर्तमानपत्रे, रेल्वेचे वेळापत्रक, विविध भाषांतील पुस्तके, नोकरीसंदर्भातील माहिती या स्टॉलवरून मिळत नव्हती. ए. एच व्हिलरच्या स्टॉलची हटके व वेगळ्या नक्षीमुळे वेगळी ओळख होती; मात्र कोरोना काळानंतर बुक स्टॉलचे बहुउद्देशीय स्टॉलमध्ये रूपांतर झाले. आता सर्व पूर्वपदावर येवूनही ए. एच. व्हीलर कंपनी जाणीवपूर्वक वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके ठेवणे बंद केले होते. मात्र, वाचकांची वाढती मागणी पाहून अखेर रेल्वे प्रशासनाने जी. आर. काढून वर्तमानपत्रे / मासिक व पुस्तके पुन्हा ठेवण्याची अनुमती व आठवण ए. एच व्हिलर कंपनीला करुन दिली आहे.