वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसवर अनेकांकडून अनधिकृत स्टिकर्स लावून जाहिरातबाजी करण्यात येते. त्यामुळे बसचे विद्रुपीकरणही होते. अशा जाहिरातबाजांवर एसटीच्यावतीने कठोर कारवाई करुन दंड वसूल करण्यात येणार असून आता पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने आता अनधिकृत जाहिरातदारांविरोधात कंबर कसली आहे.
राज्यातील प्रत्येक गावापर्यंत एसटीचे जाळे आहे. त्यामुळे लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एसटी प्रभावी माध्यम ठरते. यासाठी काहीजणांकडून एसटीवर बसमधील आसन व्यवस्था, खिडकीवरील भाग, एसटी बसच्या बाहेरील बाजू आदी ठिकाणी स्टीकर्स आणि पॅम्पलेट चिटकवण्यात येतात. त्यामुळे एसटी बसचे विद्रूपीकरण होते. यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय एसटी महामडंळाने घेतला आहे.
तोट्यात असलेल्या एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी महामंडळाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना व सवलती दिल्या जातात. मात्र एसटीच्या नेटवर्कचा फायदा घेत अनेकांकडून मोफतची जाहिरातबाजी करण्यात येते. या जाहिराती स्टिकर्स आणि पॅम्पलेट कर्मचारी काढून टाकत असतात. मात्र कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने अशा फुटक्यांचे फावते. मात्र आता एसटीचे उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळातर्फे जाहीरातीसाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत एसटी बसमध्ये अनधिकृत जाहिराती किंवा पॅम्पलेट, स्टिकर्स चिपकवलेले असल्यास कर्मचारी ते काढून टाकत होते. मात्र आता या संदर्भात अनधिकृत जाहिरातदाराची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात येणार आहे. यासोबतच दंडही वसूल करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या नागपूर विभाग प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. एकीकडे नागपूर शहराची स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल होते आहे. तर दुसरीकडे चौकाचौकात अनधिकृत पोस्टर्स, स्टीकर्स लावणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. फक्त भिंतीच नव्हे तर स्मार्टसिटीचे जंक्शन बॉक्स आदींवर या जाहीरातींचे पॅम्पलेट लावण्यात येतात. यावर अनेकवेळा हायकोर्टाने ताशेरे ओढल्यावरही आतापर्यंत ठोस कारवाई मनपाच्यावतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकदा स्टिकर्स काढले की परत स्टीकर्स लावण्यात येतात. तरी यावर मनपानेही शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.