प्रतिकारशक्ती वाढवून रेडिओथेरपीचे दुष्परिणाम होणार कमी
रेडिओथेरपीनंतर या रुग्णांना होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ॲक्टोसाइट नावाचे औषध विकसित केले गेले आहे. हे औषध अणुऊर्जा विभाग (डीएई), भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयडीआरएस लॅबने विकसित केले आहे. तथापि, या औषधाची फेज-२ क्लिनिकल चाचणी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सुरू झाली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेली ही टॅबलेट प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अन्नपूरक म्हणून काम करेल आणि रेडिओथेरपीनंतर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी या टॅबलेटचा वापर केला जाईल.
टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या कॅन्सरवर सातत्याने संशोधन तसेच वैद्यकीय उपचारामध्ये गुणवत्तापूर्वक बदल आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. या संशोधनामुळे निश्चितपणे त्यासाठी महत्त्वाचे योगदान मिळेल, असा विश्वास टाटा कॅन्सर रुग्णालयातील तज्ज्ञांनी व्यक्त केला. बीएआरसीचे संचालक विवेक भसीन, टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, डॉ. पंकज चतुर्वेदी आणि अणुऊर्जा विभागातील शास्त्रज्ञांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी या गोळीच्या कॅन्सरसंदर्भातील उपयुक्ततेसंदर्भात माहिती दिली.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा (एफएसएसएआय) कडून ॲक्टोसाइटला मंजुरी मिळाली आहे. अणुऊर्जा विभागाच्या अनेक दशकांच्या संशोधनाने या औषधाच्या विकासाला पाठबळ दिले आहे. या गोळ्यांमुळे भारतात परवडणाऱ्या किमतीत कॅन्सर सेवा मिळणार आहे. हे महत्त्वपूर्ण योगदान असून या गोळ्या आता बाजारात उपलब्ध होतील. या गोळ्यांची परिणामकारकता उल्लेखनीय आहे. प्रामुख्याने पेल्व्हिक भागातील कॅन्सरग्रस्तांना रेडिओथेरपीच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी या गोळ्या उपयोगी पडतात. रेडिओथेरपीमुळे शरीरात निर्माण झालेल्या टॉक्सिसिटी म्हणजेच विषारी घटकांच्या दुष्परिणामापासून रुग्णांचे रक्षण करण्याची ताकद या गोळ्यांमध्ये असून त्यामुळे रुग्णाला दिलासा मिळतो. कॅन्सर रेडिओथेरपी, रिजनरेटिव्ह न्यूट्रास्युटिकल, इम्युनोमोड्युलेटर आणि अँटिऑक्सिडंटसाठी सहाय्यक रचना असलेल्या या गोळ्या कर्करुग्णांच्या सेवेत झालेल्या लक्षणीय प्रगतीचे द्योतक आहे.
ही गोळी सध्या फूड सप्लिमेंट म्हणून वापरली जाते. कॅन्सर रुग्णांमध्ये या गोळीचा वापर अधिक प्रभावशाली ठरेल. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून रुग्णांचे जीवनमानही निश्चितपणे सुधारण्यासाठी मदत होईल, असा विश्वास टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी व्यक्त केला. या गोळीच्या क्लिनिकल चाचणीमध्ये सहभागी असलेल्या डॉक्टरांनी अणुऊर्जा विभागाच्या शास्त्रज्ञांनी क्लोरोफिलिन या रसायनावर यामध्ये प्रामुख्याने संशोधन करण्यात आले आहे. त्याचा सकारात्मक परिणामही दिसून आला आहे. फेज दोन क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. निरोगी व्यक्तींसह रेडिओथेरपीनंतर झालेल्या दुष्परिणामांमुळे ग्रस्त असलेल्या कॅन्सर रुग्णांवरही या चाचणीचे परिणाम सकारात्मक दिसत आहेत. कॅन्सर झालेल्या काही रुग्णांचे मूत्राशय काढून टाकावे लागते. डोके, मानेचा, गुदद्वाराच्या कॅन्सरमध्ये रेडिओथेरपीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ही गोळी किती प्रभावी आहे याचाही अभ्यास सुरू आहे. त्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे, असेही डॉ. गुप्ता म्हणाले.