वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो जग जिंकायला निघाला. आपल्या पित्याचे अपुरे स्वप्न पूर्ण करणे म्हणजे पर्शियन साम्राज्यावर आपला झेंडा फडकवणे, या उद्देशाने तो निघाला. पण पाहता पाहता त्याच्या महत्त्वाकांक्षेने जग जिंकून घेण्यासाठी पंख पसरवायला सुरुवात केली. ज्याला आपण भारतीय उपखंडात सिकंदर म्हणून ओळखतो, तो मॅसेडोनियाचा अलेक्झांडर द ग्रेट, हा जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी राजांपैकी एक होता, यात संशय नाही. पण जग जिंकण्याचे स्वप्न अर्धवट टाकून अवघ्या बत्तीसाव्या वर्षी तो मरण पावला, तेव्हा त्याबद्दल बरेच संशय निर्माण झाले. तो दीर्घायु झाला असता तर जगज्जेता झाला असता का, हा प्रश्न जसा तत्कालीन इतिहासकारांना पडला, त्याचप्रमाणे तो नेमका का मृत्युमुखी पडला, हा प्रश्नही सर्वांना पडला. त्याच्या मृत्यूला जवळजवळ अडीच हजार वर्षे होत आली, तरी हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
अलेक्झांडरचा मृत्यू नैसर्गिक होता असे मानणारा एक मोठा वर्ग आहे. पण, या नैसर्गिक मृत्यूचे कारण काय असावे, याबद्दल त्यांच्यात एकमत नाही. युद्धाच्या दगदगीमुळे, खाण्यापिण्याची आबाळ झाल्यामुळे त्याला ज्वर चढला आणि त्यात त्याचा मृत्यू ओढवला असे काही जण मानतात; तर देशविदेशातील निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे अन्नपाणी ग्रहण करताना त्याला आतड्याचे जीवाणू संक्रमण झाले असावे, असे काही लोक मानतात.
अलीकडच्या काळात काही संशोधकांनी अलेक्झांडरच्या मृत्यूपूर्वी दिसलेली लक्षणे अभ्यासली आणि त्या काळात आजूबाजूला असलेल्या विविध रोगांशी त्याची सांगड घातली, तेव्हा त्यांचा वेगळाच निष्कर्ष निघाला. ‘पश्चिम नाईल विषाणू’ या नावाने ओळखला जाणारा आणि नाईल नदीच्या पश्चिम भागातल्या प्रवाहात आढळणारा विषाणू हाच अलेक्झांडरच्या मृत्यूला कारणीभूत ठरला असे या संशोधकांनी प्रतिपादन केले. तथापि, अलेक्झांडरचा बळी विषमज्वराने घेतला असावा, असे काही तज्ज्ञ मानतात. पश्चिम व मध्य आशियातील त्याच्या मोहिमेतून परतत असताना त्याचा मृत्यू झाला याकडे लक्ष दिले, तर आणखी एक शक्यता लक्षात येते. या भूपट्ट्यात डासांमुळे हिवतापाचे थैमान माजलेले असायचे. या हिवतापाचीच बाधा त्याला झाली होती का?
काही तज्ज्ञ मात्र अलेक्झांडरच्या वाईट सवयींनाच त्याच्या मृत्यूसाठी दोषी मानतात. दारूच्या व्यसनामुळे त्याची तब्येत खालावली आणि युद्धाची सततची धामधूम सहन न होऊन तो मरण पावला, असे त्यांचे म्हणणे आहे. आजारी असताना त्याने निरनिराळ्या वैद्यांकडून निरनिराळ्या काढ्यांचे चाटणांचे सेवन केले, त्याचा भलताच परिणाम होऊन तो दगावला, असेही काही लोक मानतात.
पण अलेक्झांडरचा मृत्यू नैसर्गिक नसेलच अशी शक्यता आहे का ? निश्चितच आहे. साम्राज्यविस्ताराच्या हव्यासापोटी त्याने जे अगणित शत्रू बनवून ठेवले होते, त्यांचा हात त्याच्या मृत्यूमागे असू शकेल का? हे शत्रू परकीयच वा परकियांचे हस्तकच असतील, हे आवश्यक नाही. स्वकीयांकडूनही दगाफटका झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलेक्झांडर मोहिमेवर निघाला तेव्हा तो अगदी कोवळा तरुण होता. त्याच्या सैन्यातील बहुतेक अधिकारी वयस्क व अधिक अनुभवी होते. त्यांना अलेक्झांडरकडून आदेश घेणे कमीपणाचे वाटत होते. त्यांच्यापैकी कुणी डाव साधला असावा का? या मोहिमेला त्याच्या अनेक सैन्याधिकाऱ्यांचा छुपा विरोध होता. भारताच्या वायव्य सीमेवर लढाया लांबू लागल्या, तेव्हा कित्येकांनी ग्रीसला परत चलण्यासाठी लकडा लावला होता. तथापि, त्यांचा विरोध डावलून अलेक्झांडरने लढाया दीर्घकाळ सुरू ठेवल्या होत्या. त्यामुळे चिडून कुणीतरी त्याला संपवले होते का? अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर अखेर एकदाचे हे युद्ध संपेल अशी त्यांची अपेक्षा हे असली, तर ती खरीही ठरली होती. एकंदर कुणी तरी धोरणीपणाने अलेक्झांडरचा काटा काढला आणि शांततेचा मार्ग मोकळा केला, असे म्हणण्यास मोठाच वाव आहे. अशा कुणी तरी त्याला दारूतून विष पाजले आणि त्याला ठार केले, असे काही इतिहासकार मानतात. पण, हे विष दारूतून कित्येक दिवस हळूहळू पाजले जात असावे, असे त्याच्या मृत्यूपूर्व लक्षणांवरून आढळते. जहाल विषाने तडकाफडकी होणारा त्याचा हा मृत्यू नव्हता.
मात्र अलेक्झांडरचा मृत्यू हा नैसर्गिक किंवा सैन्यातील विरोधामुळे नव्हता, तर त्याचा मृत्यू राजकीय होता, असे काही आधुनिक इतिहासकार मानतात. अलेक्झांडर जग जिंकायला मॅसेडोनियातून बाहेर पडला, तेव्हा मॅसेडोनियाच्या व्यवस्थेसाठी त्याने अँटीपेटर या त्याच्या खास अधिकाऱ्याला तेथे ठेवले होते. पण, युद्धाच्या काळात दोघांमध्ये बेबनाव झाला आणि खटके उडू लागले. अर्थात अलेक्झांडर देशापासून फार दूर असल्याने त्याला फार काही करता येण्यासारखे नव्हते. पण युद्ध थांबवून तो परत येतोय हे समजल्यावर अँटीपेटर घाबरला होता का ? त्याने परत येऊन आपल्याशी कठोर वर्तन करण्याअगोदरच त्याचा काटा काढावा, असे अँटीपेटरने ठरवले होते का ?
टॉलेमी हा अलेक्झांडरचा खास माणूस. त्याच्यावरही काही इतिहासकारांच्या संशयाची सुई रोखलेली दिसते. टॉलेमीला सत्ता हवी होती. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर थोड्याच अवधीत त्याने इजिप्तवर कब्जा केला हे सर्वज्ञात आहे. पण जोपर्यंत अलेक्झांडर होता, तोपर्यंत त्याला नाकापेक्षा मोती जड बनता आले नसते. म्हणूनच, स्वतःच्या स्वार्थासाठी जिवलग मित्र असूनही टॉलेमीनेच अलेक्झांडरला संपवले, असे हे इतिहासकार म्हणतात. अलेक्झांडरच्या मृत्यूविषयी अनेक प्रवाद असले, तरी एक गोष्ट मात्र शंभर टक्के खरी आहे त्याच्या आकस्मिक मृत्यूने इतिहासातील एक महत्त्वाचा अध्य अगदी संक्षिप्तपणे संपला !
रविंद्र भयवाल