वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
नांदेड – श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता. उमरी यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सतराव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रकाश भिलवंडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे.
नवोदित व प्रथितयश साहित्यिकांचे संमेलन या संस्थेतर्फे दरवर्षी भरविण्यात येते. यातूनच उद्याचे कवी, लेखक, कथाकार तयार होऊ लागले आहेत. लोकसंवाद नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून नावारूपास आले आहे. आजपावेतो कविवर्य विठ्ठल वाघ, फ.मुं. शिंदे, रा.रं. बोराडे, प्रा. भु.द. वाडीकर, प्राचार्य सू.ग. चव्हाण, इंद्रजीत भालेराव, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, श्रीकांत देशमुख, बाबू बिरादार, डॉ. ना ग ना थ कोत्तापल्ले, प्रा. शेषराव मोरे, डॉ. वृ षा ली किन्हाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, ललिता गा द गे, सुधीरभाऊ मुनगंटीवार, डॉ. केशव सखाराम देशमुख, डॉ. गोविंद नांदेडे, देविदास फुलारी, प्रा. रविचंद्र हडसनकर, प्रा. नारायण शिंदे, प्रा.डॉ. भगवान अंजनीकर, प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर, पुरुषोत्तम सदाफुले, कवी नारायण सुमंत, प्रभाकर साळेगावकर राजेंद्र गहाळ, आदी नामवंत कवी लेखकांनी उपस्थिती दर्शवून या संमेलनाची उंची वाढविली आहे. एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी व शोभायात्रा उद्घाटन, ग्रंथ प्रकाशन, प्रकट मुलाखत, कथाकथन, कविसंमेलन असे स्वरूप राहणार आहे. नरसी तालुका नायगाव येथे साहित्यिक कै. भगवानराव पाटील भिलवंडे यांच्या स्मरणार्थ हे संमेलन होणार आहे. विविध समित्यांचे गठण करण्यात आले असून सल्लागार समितीचे सर्व पदाधिकारी व रसिक कामाला लागले आहेत. संमेलन यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रकाश भिलवंडे, राजेश भिलवंडे, भास्कर भिलवंडे व संयोजक दिगंबर कदम यांनी केले आहे.