सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळी ही संजीवनी असून, राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम वर्षांतून दोन वेळा राबविण्यात येते. यंदा ही मोहीम राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना वयोगटानुसार निश्चित केल्या प्रमाणे जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. ज्या शाळा सुरू आहेत त्या शाळांमध्ये हजर असणाऱ्या मुला-मुलींना शिक्षकांद्वारे तसेच अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींना अंगणवाडी शिक्षकांद्वारे गोळी देण्यात येईल.

१ ते १९ वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे. बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे आहे. जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक गोळी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियामित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे ही खबरदारी घेणे ही आवश्यक आहे. ही मोहीम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे. एक ते दोन वर्षे वयोगटातील बालकास जंतनाशकाची (Tab.Albendazole) अर्धी गोळी (२०० मिलिग्रॅम) पाण्यात विरघळवून देण्यात येईल. २ ते ३ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी एक पूर्ण गोळी (४०० मिलिग्रॅम) पाण्यात विरघळवून देण्यात येईल. ३ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी एक पूर्ण गोळी (४०० मिलिग्रॅम) चावून खाण्यासाठी स्वच्छ पाण्याबरोबर देण्यात येणार आहे. गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. तथापि बालकाच्या शरीरामध्ये जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होवू शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये. सदर मोहिमेकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचे १६७७९९ उद्दिष्ट असून, याकरिता सर्व नियोजन केले असून या अनुषंगाने आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व एकात्मिक बाल विकास विभाग यांच्या एकत्रित सभा घेऊन संबंधित सर्वांचे (ANM, आशा, अंगणवाडी शिक्षिका, शाळेचे समन्वयक इ.), सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून, अभियानाची जनजागृती करण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत.