टाटा इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांचे संशोधन FSSIच्या परवानगीची प्रतीक्षा
कर्करोगाच्या जीवघेण्या त्रासातून मुक्त करणारी रेस्वेराट्रॉल व आर प्लस सीयू नावाची गोळी मुंबईतील कर्करोग संशोधन केंद्र असलेल्या टाटा इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी तयार केली आहे. केवळ शंभर रुपये किंमत असलेल्या या गोळीमुळे रुग्णाला पुन्हा कर्करोग होण्याचा धोका संपुष्टात येणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसआय) मंजुरीनंतर या गोळीचा वापर रुग्णांसाठी केला जाणार आहे. (The risk of cancer can be stopped by this pill)
डॉक्टरांनी विकसित केलेली गोळी अन्ननलिका, फुफ्फुस व मुख कर्करोगाच्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. या गोळीला विकसित करण्यासाठी संशोधकांना दहा वर्षांचा कालावधी लागला. संशोधक डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाला दुसऱ्यांदा कर्करोग होण्याचा धोका या गोळीमुळे थांबविता येणार आहे. केमोथेरपीमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम ५० टक्के कमी करता येईल.
उंदरांसह मानवावर यशस्वी प्रयोग : टाटा मेमोरियल रुग्णालयाचे वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बडवे यांनी सागितले की, या गोळीचा प्रयोग उंदरांसह मानवावर यशस्वी झाला आहे. संशोधनावेळी उंदरांमध्ये कर्करोगाच्या पेशी विकसित करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यात गाठ तयार झाली. त्यानंतर उंदरांवर किमोथेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. उपचारावेळी कॅन्सर पेशी क्रोमेटिन कणात परिवर्तित झाल्याचे लक्षात आले. हे कण रक्तातून शरीराच्या इतर भागात पोहोचले. यावेळी उंदरांना रेस्वेराट्रॉल व आर प्लस सीयू नावाची गोळी गोळी देण्यात आली. ज्यामुळे क्रोमेटिन कणांना नष्ट करण्यात यश आले.
केमोथेरपीचे दुष्परिणाम रोखणार : ही गोळी ऑक्सिजन रेडिकल्स सोडते.. त्यामुळे रक्तवाहाचा वेग वाढतो. ही गोळी केमोथेरपीमुळे शरीरावर झालेल्या दुष्पपरिणामांवर प्रभाव करते. कॅन्सर उपचारावेळी रुग्णांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम ५० टक्क्यापर्यंत कमी करता येईल तसेच रुग्णाला पुन्हा कर्करोग होण्याचा धोका राहणार नाही. ही गोळी जून, जुलैपर्यंत उपलब्ध होऊ शकते. एका गोळीची किंमत शंभर रुपये राहणार असल्याचे डॉ. बडवे यांनी सांगितले. गोळीच्या दुष्परिणामाचे परीक्षण उंदीर आणि मानवावर करण्यात आले. संशोधनावेळी अनेक आव्हाने आली होती. अनेकदा निराशाही आली मात्र संशोधन यशस्वी झाल्याचा आनंद असल्याचे डॉ. बडवे म्हणाले. (वृत्तसंस्था)