आई-वडिलांचे आनुवंशिक रोग घेऊनच बाळ अनेकदा जन्माला येते. मधुमेह, अॅनिमिया, सिकलसेल, थॅलेसेमिया यासारखे आनुवंशिक आजार आईकडून बाळाला होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे काही आनुवंशिक आजार गर्भातील बाळालाही असतील, तर त्याचे निदान बाळाच्या जन्माआधीच नॉन इन्व्हेसिव्ह प्रीनेटल टेस्टिंग (एनआयटी) या चाचणीद्वारे करणे शक्य झाले आहे. ‘एनआयपीटी’ चाचणी गर्भधारणेपासून पहिल्या तीन महिन्यांत करणे महत्त्वाचे ठरत असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ही तपासणी करावी, असे वैद्यकीय तज्ञांकडून सांगण्यात आले.
गरोदरपणात प्रत्येक महिलेची सोनोग्राफी केली जाते. या चाचणीत गर्भातील बाळाला व्यंग असल्याची चिन्हे दिसल्यास अशा महिलांना ‘एनआयपीटी’ चाचणीचा सल्ला दिला जातो. या चाचणीत गर्भात व्यंग आढळल्यास अनेकदा गर्भपाताचा निर्णय घेतला जातो; परंतु आता याला काही प्रमाणात प्रतिबंध करणे शक्य झाले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गर्भातील बाळाला काही आजार आहेत का, याची पूर्वतपासणी शक्य आहे.
याआधी डबल, ट्रिपल वा क्वाडूपल मार्करची तपासणी केली जाते. यामधून बाळाचे जनुकीय रोग आणि शारीरिक व्यंगदोषांबाबत समजते. बाळ सुपोषित असेल का? आईचा बीपी पुढील काळात वाढणार का? अशा काही भविष्यातील धोक्यांचे इशारे मिळतात. बाळाचा मणका उघडा असणे, डाऊन सिंड्रोम (एकप्रकारचे मतिमंदत्व) आदींच्या ९० ते ९५ टक्के केसेस यामधून आधीच ओळखता येतात. अल्फाफिटोप्रोटिन, इस्ट्रीओल, एचसीजी आणि इनहीबिन ए अशा भारदस्त नावाचे पदार्थ यात तपासले जातात.
‘एनआयपीटी’ चाचणी कोण करू शकते?
● ज्या गर्भवतीचे वय ३५ किंवा त्याहून अधिक असेल
● बीएमआय ३० किंवा त्याहून अधिक असेल
● आधी गुणसूत्र विकृती असलेल्या बाळाला जन्म दिला असेल
• गुणसूत्र स्थितीचा कौटुंबिक इतिहास असेल
• अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भाच्या विसंगतीचे निदान झालेले असेल.