Markandeshwar Temple वेरूळ, अजिंठा व खजुराहोप्रमाणे कलाकृतीने ओतप्रोत भरलेले वास्तुशिल्प, उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले भैरवशाली मार्कंडेय मंदिर इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे असले, तरी आता हे मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दहाव्या शतकात साकारलेल्या उत्कृष्ट शिल्पकलेच्या या मंदिराला ‘विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाते.
ज्या तीर्थस्थळाला विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाते ते मार्कंडेश्वर मंदिर गडचिरोलीपासून ४५ किमी अंतरावर आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यातील लाखो भाविकांसाठी हे मंदिर श्रद्धास्थान आहे. या मंदिरात एकूण २४ देवळं आहेत. यापैकी मार्कंडेय ऋषीचे मंदिर, यमधर्म, मार्कंडेश्वराचा पिता भृशुंड ऋषी व शंकराचे देवालय अशी चार वेगळी मंदिरे या देवालय परिसरात आहेत. महादेवाच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे. या ठिकाणी वैनगंगा नदी उत्तरवाहिनी वाहत असल्यामुळे या तीर्थस्थळावर पुराणकाळापासून भाविकांची अगाध श्रद्धा आहे. हेमांडपंथी मंदिर म्हणून नावलौकिकास आलेल्या या मंदिराजवळ गणपती, हनुमान, भुवनेवर यासारखी छोटी-छोटी मंदिरेही आहेत. ‘विदर्भाचे खजुराहो’ असेही या मार्कडेश्वर मंदिराला म्हटले जाते.
सर्वप्रथम ब्रिटिश इतिहासकार सर कनिंगहॅम यांनी मार्कंडा मंदिर समूहाला भेट दिल्याचे सेंट्रल प्रॉव्हिन्सेसच्या १८७३ च्या रिपोर्टवरून दिसून येथे या भेटीत त्या ठिकाणी २४ देवळे असल्याचे नमूद असून या मंदिराचे बांधकाम दहाव्या शतकात झाल्याचे म्हटले आहे. सद्य:स्थितीत केवळ चारच देवळे सुरक्षित आहेत. इतर २० देवळे पडक्या अवस्थेत असून त्यातील काही लुप्त झाली आहेत. १९७३ व्या चंद्रपूर गॅझिटिअरमध्ये मार्कडा मंदिर समूहाचे बांधकाम राष्ट्रकुटांनी केल्याचे नोंदविले आहे. प्रसिद्ध इतिहास संशोधक स्व. डॉ. गिराशी यांच्या मते, आठव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेलेला राष्ट्रकुट सम्राट तिसरा गोविंदा यांच्या काळात मंदिराचे बांधकाम झाले असावे, असे म्हटले आहे. विदर्भात अनेक ठिकाणी त्याचे ताम्रपट सापडले असून त्यातील उल्लेखावरून त्या राजाची राजधानी म्यूरखंडी येथे होती. मार्कडा किंवा मार्कडी हे काळाच्या ओघात झालेले मपुरखंडीचे अपभ्रंश रूप असावे. अशा या अप्रतिम कलाकृतीने नटलेल्या वास्तुशिल्पाची दुरवस्था झाली आहे. पुरातत्व विभागाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी या मार्कडेश्वर मंदिराकडे दुर्लक्ष केल्यास विदर्भाच्या काशीची नोंद केवळ इतिहासाच्या कागदावरच दिसेल…
नंदकिशोर काथवटे