डॉ. रघुवीर देशपांडे यांचे महापौरांना निवेदन
(वऱ्हाडवृत्त) अकोला : अकोला येथील एखाद्या प्रमुख चौक किंवा उद्यानास १९६२ सालच्या भारत–चीन युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे अकोल्याचे अमर शहीद लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान व गौरव करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. रघुवीर देशपांडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सन्माननीय महापौरांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमर शहीद लेफ्टनंट विष्णू आठल्ये हे १९६२ च्या भारत–चीन युद्धात देशासाठी बलिदान देणारे विदर्भातील पहिले सैनिक अधिकारी होते. त्यांच्या नावाची नोंद देशातील सर्व वॉर मेमोरियलवर सुवर्णाक्षरांनी कोरलेली आहे. त्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळे अरुणाचल प्रदेश आज भारताचा अविभाज्य भाग आहे.
डॉ. देशपांडे यांनी सांगितले की, तब्बल ६३ वर्षांनंतर अकोला सैनिक कार्यालयात अमर शहीद लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांच्या नावाची अधिकृत नोंद करण्यात यश आले आहे. त्यांच्या शौर्य, पराक्रम, साहस व बलिदानाचा गौरव म्हणून त्यांना मरणोपरांत शौर्य पुरस्कार देण्यात यावा, यासाठी सन्माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना विशेष निवेदन पाठविण्यात आले आहे. तसेच खासदार अनूप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर व आमदार वसंत खंडेलवाल यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
देशात सैनिकांच्या सन्मानासाठी विविध पातळ्यांवर ठोस पावले उचलली जात असून अंदमान-निकोबारमधील बेटांना शहीद सैनिकांची नावे देणे, सांगली येथे सैनिक अधिकाऱ्याच्या नावाचा चौक, राष्ट्रपती भवनात परमवीर चक्र विजेत्यांचे छायाचित्र प्रदर्शन तसेच नागपूर येथे ‘परमवीर उद्यान’ सुरू करणे ही त्याची उदाहरणे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नवीन भारतात अकोला जिल्ह्यातील नागरिकांना व विशेषतः नव्या पिढीला सैनिकांचे शौर्य, पराक्रम व बलिदानाची प्रेरणा मिळावी, यासाठी अमर शहीद लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांच्या नावाने चौक किंवा उद्यान नामकरण करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. रघुवीर देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.
जय हिंद, असे म्हणत त्यांनी या मागणीसाठी शहरवासीयांनी पाठिंबा द्यावा, अशी कळकळीची विनंती केली आहे.
