‘कम्युनिटी’ तयार करण्यासह तीन नवीन फिचर्स वापरकर्त्यांसाठी उपलब्ध
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क (वृत्तसंस्था)
व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आता ५१२ सदस्यांऐवजी १,०२४ सदस्य सहभागी करून घेता येणार आहेत; तर व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलिंगमध्ये आता सहाऐवजी तब्बल ३२ जणांना एकाचवेळी सहभागी करून घेता येणार आहे. कंपनीने शुक्रवारपासून जगभरात तीन नवीन फिचर्स उपलब्ध करून दिले असून, त्यात यांचा समावेश आहे. याशिवाय एकाच विषयावरील अनेक ग्रुप्स एकत्र विलीन करून कम्युनिटी तयार करण्याचीही सुविधा देण्यात आली आहे.
‘फेसबुक’ अर्थात ‘मेटा’ने व्हॉट्सॲप ताब्यात घेतल्यानंतर संवाद क्षेत्रात मोठे बदल करणारी तीन नवीन फिचर्स आज उपलब्ध करून दिली. जगभरातील विविध देशांत टप्प्याटप्प्याने ती वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहेत.या नव्या बदलांची गेल्या वर्षभरापासून चर्चा होती व त्यातील काही सेवा प्रायोगिक तत्त्वावर बिटा व्हर्जन म्हणून मोजक्या वापरकत्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करून व आवश्यक ते बदल करून आज या नवीन फिचर्सचा वापर सुरू झाला आहे.
ग्रुप मोठे होणार
व्हॉट्सॲप ग्रुप हे जगभरात एकाचवेळी अनेकांशी संवाद साधण्याचे मोठे साधन बनले आहेत. आधी ग्रुपची सदस्य संख्या १०० वरून अडीचशे करण्यात आली, त्यानंतर त्यात पुन्हा वाढ करून ५१२ सदस्य ग्रुपमध्ये जोडण्याची सोय उपलब्ध झाली. आता त्यात जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. नवीन फिचरनुसार १,०२४ जण आता एका ग्रुपमध्ये असू शकतील. ग्रुप व्हिडीओ कॉलचे सदस्यही वाढले. आतापर्यंत व्हॉट्सअॅपच्या ग्रुप व्हिडीओ कॉलिंगमध्ये सहाच सदस्य सहभागी करून घेता यायचे. त्यात आता वाढ करून तब्बल ३२ सदस्यांना सहभागी करून घेता येईल. आगामी काळात ही सेवा आणखी वाढवली जाणार असून, ‘झूम’ आणि ‘गुगल मिट’ या सेवांना टक्कर देण्याचा व्हॉट्सअॅपचा विचार आहे. सदस्य वाढल्याने कौटुंबिक व्हिडीओ कॉलमध्ये आता देश-विदेशातील ३२ सदस्य एकाचवेळी एकत्र येतील.
ग्रुपचा पुढचा टप्पा ‘कम्युनिटी’
• व्हॉट्सॲपवर आता कम्युनिटी हे नवीन फिचर मिळणार असून, त्यामुळे एकाच विषयावरचे वेगवेगळे ग्रुप विलीन करून एक ‘कम्युनिटी’ तयार करता येणार आहे. एकाचवेळी अनेक ग्रुप चालवणाऱ्या ॲडमिनसाठी हे सोयीचे ठरणार आहे. विविध विषयांवरील वेगवेगळे ग्रुप त्यामुळे एकत्रितपणे संवाद साधू शकतील.