दहावी-बारावी पास आहात… नोकरीची सर्वात मोठी संधी चालून आलीय!
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क (वृत्तसंस्था)-
पोस्ट विभागात नोकरीची सर्वात मोठी संधी चालून आली आहे. पोस्टात तब्बल ९८ हजार पदांची बंपर भरती होणार आहे. पोस्ट विभागाच्या वेबसाइटवर या भरतीची सूचना जारी करण्यात आली असून पोस्टमन, मेल गार्ड आणि अन्य पदांसाठी ही भरती होणार आहे. मुख्य म्हणजे दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी या भरतीमुळे नोकरीची कवाडे खुली झाली आहेत.
पोस्टातील भरतीसाठी अर्ज करायचा आहे, अशा इच्छुकांनी indiapost.gov.in या पोस्टाच्या वेबसाइटवर पोस्ट ऑफिस व्हेकन्सी २०२२’ या सेक्शनला जाऊन नोंदणी करावी, असे नमूद करण्यात आले आहे. दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार या पदासांठी पात्र असेल. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख डिसेंबर महिन्यात असणार आहे. ही तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही पोस्ट विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पोस्टमनची सर्वाधिक पदे एकूण ९८ हजार ८३ पदे भरली जाणार आहेत. यात पोस्टमनची ५९ हजार ९९ पदे, मेल गार्डची १ हजार ४४५ पदे तर मल्टीटास्किंग स्टाफ म्हणून ३७ हजार ५३९ पदे भरण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा १८ ते ३२ वर्षे पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ अशा पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदांसाठी १८ ते ३२ वर्षे अशी वयोमर्यादा आहे. एसटी/ एससी – ३८ वर्षांपर्यंत तर ओबीसी – उमेदवाराचे वय ३५ वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे.
शैक्षणिक पात्रता
पोस्टमन पदासाठी मान्यताप्राप्त शिक्षण बोर्डातन दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक.। मेल गार्ड पदासाठी मान्यताप्राप्त शिक्षण बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक. संगणकाचे बेसिक ज्ञान हवे. । मल्टीटास्किंग स्टाफसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण तसेच संगणकाचे बेसिक ज्ञान आवश्यक.
अर्ज दाखल कसा कराल?
। इंडिया पोस्ट वेब पोर्टलवर इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट २०२२ या लिंकवर क्लिक करा.
। इंडिया पोस्ट रिक्रूटमेंटवर गेल्यावर रजिस्टर नाऊवर क्लिक करा.
। स्क्रीनवर दिसणाऱ्या आवश्यक तपशिलांसह संपूर्ण अर्ज भरा.
। आवश्यक कागदपत्रे नोंदणी फॉर्मसह अपलोड करावी.
। यात उमेदवाराचे नाव, फोन नंबर, लिंग, श्रेणी आणि जन्मतारीख व इतर आवश्यक माहिती द्यावी.
। तुमच्या फोन नंबरवर पडताळणीसाठी ओटीपी येईल.
। कोणत्याही मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये अर्जाची फी ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरू शकता.
। फी भरल्यानंतर तुमचा नोंदणी फॉर्म यशस्वीरीत्या सबमिट होईल.
।३३ हजार ७१८ ते ३५ हजार ३७० रुपये प्रतिमहिना वेतन मिळणार आहे.
। १०० रुपये परीक्षा फी असणार आहे. सर्व महिला, सर्व जातीय श्रेणी आणि टान्स वुमन अर्जदार यांना या फीमधून सूट.
महाराष्ट्रात किती जागा?
पोस्टमन ९,८८४ मेल गार्ड १४७
एमटीएस पदे ५,४७८