“जागरूक विद्यार्थी हे सुरक्षित भविष्याचा पाया” – ईश्वर मते
अकोला | प्रतिनिधी
जिल्हा परिषद अकोला अंतर्गत येणाऱ्या जि. प. वि. प्रा. केंद्र शाळा, कानडी येथे भारत सरकारच्या २००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा एन.डी.आर.एफ. चे इन्स्पेक्टर ईश्वर मते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कानडीचे सरपंच उदयसिंग जाधव हे उपस्थित होते. शा.व्य.स. अध्यक्ष सुनील राठोड यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली.

भारत सरकारने २००५ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा संमत करून राष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची सक्षम यंत्रणा उभारली आहे. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तींचा धोका कमी करणे, पूर्वतयारी करणे, आपत्तीसमयी तात्काळ प्रतिसाद देणे व आपत्तीनंतर पुनर्वसन करणे होय.
नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स ही भारत सरकारअंतर्गत कार्यरत संस्था असून पूर, भूकंप, चक्रीवादळ, रासायनिक अपघात आदी आपत्तीमध्ये जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्याचे कार्य करते.
इन्स्पेक्टर ईश्वर मते यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. उपलब्ध साधनांचा योग्य वापर, आपत्कालीन किट्सची माहिती तसेच मॉक ड्रिल्सचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
विद्यार्थी आपत्ती व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेऊन जनजागृती, पूर्वतयारी व बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक व गझलकार संदीप वाकोडे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल गोंडचवर यांनी तर आभार प्रदर्शन मेघना वाडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रतिक्रिया
लता सोळंके (केंद्रप्रमुख):
“शाळा ही उद्याचे नागरिक घडवणारी महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. सुरक्षित वातावरणाशिवाय प्रभावी शिक्षण शक्य नाही.”
उदयसिंग जाधव (सरपंच, कानडी):
“शाळेतच आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणे ही अभिमानाची बाब असून अशी कार्यशाळा राज्यातील प्रत्येक शाळेत व्हावी.”
