एकाकीपणा कुणासाठीही चांगला नसतो; परंतु मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो. मधुमेहाने पीडित असलेल्या लोकांमध्ये हृदयविकारासाठी खराब आहार, धूम्रपान, व्यायामचा अभाव किंवा नैराश्याच्या तुलनेत एकाकीपणा मोठा धोका ठरू शकतो असे टुलेनच्या संशोधकांना आढळून आले आहे. युरोपियन हार्ट नियतकालिकात प्रकाशित त्यांच्या अहवालाकरिता ३७-७३ या वयोगटातील मधुमेहाने ग्रस्त १८, ५०० जणांवर अध्ययन करण्यात आले होते. यातील कुणाचा हृदयविकार नव्हता, १० वर्षामध्ये यातील सुमारे ३२०० जणांमध्ये हृदयविकार निर्माण झाला होता. ज्या रुग्णांमध्ये एकाकीपणा अधिक होता, त्यांच्यात हृदयविकार निर्माण होण्याचा धोका २६ टक्क्यांनी अधिक होता असे संशोधकांना आढळून आले आहे. मधुमेहाने ग्रस्त लोकांमध्ये पूर्वीपासून हृदयविकार निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. एकाकीपणामुळे टाइप २ मधुमेहाची समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढत असल्याचे डायबेटिज मेडिकल जर्नल डायबेटोलोजियामध्ये प्रकाशित अध्ययनात नमूद होते. सामाजिक दुरावादेखील मानवी आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पाडत असतो. एका दिवसात १५ सिगारेट ओढण्याइतकाच हा परिणाम असतो असे अमेरिकेचे सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी एका अहवालात म्हटले होते. मधुमेहाने ग्रस्त लोकांचे हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी सामाजिक हालचालींऐवजी गुणवत्तापूर्ण संबंधांना प्राथमिकता दिली जावी. त्यांच्या एकाकीपणाचे मूल्यांकन सातत्याने केले जावे, जेणेकरून गरज भासल्यास त्यांना मानसिक आरोग्य सेवा पुरविता येऊ शकेल, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे.