गाव म्हनलं कि तथी कौलारु घरं आले, मोठ-मोठाले वाडे आले, गल्या आल्या, आल्लग अल्लग समाजाचे येटाय आले, पारं, देवळं, वटे, गोठान हे बी गावातचं. घरा-घरात मातीच्या चुली, जाते, जात्यावरल्या ओव्या म्हननाऱ्या बायका, भुलाबाईचे गाने, देवळातला हरिपाठ, हे सारं गावतच पायाले भेटते. गावाचं सबन अर्थकारन चालते ते शेतीच्या भरोशावर. वावरात काम करनं. पिक काहाळनं. अन् त्या पिकाच्यामाथं आपलं घर चालोनं. हे जिनगानी ज्यानं अनुभवली. तो साहित्यीक मातीच्या येदना आपल्या लेखनीत प्रसवल्या शिवाय रायत नाई.

बहिरखेडसारख्या लाहान गावात कास्काराच्या खटल्यात जलम घेतलेले हळव्या मनाचे कवी उध्दव गावंडे याईनं आपल्या लेखनीत वावर मांडलं. असं म्हनतात कि ज्याची नाळ गावासंग जुळेल हाये. त्याच्या लेखनीत वावर पायाले भेटते. उध्दव दादाच्या लेखनीतही हिरवंगार वावर कसं फुललं. ते त्याईच्या कविता सांगतात. ईशेस म्हनजे गावाकडच्या बोलीभाषेत म्हनजेच वऱ्हाडी बोलीत त्याईच्या कविता असल्यानं शेती, गाव, अन् गावची संस्कृती. हे सबन चित्र जीत्तं-जागतं आपल्या डोयापुळे ऊभ रायते. उध्दव दादाचा “फर्दळ” हा काव्यसंग्रह म्हनजे बहार ओसरल्यावर नव्यानं अंकुरलेलं पीक अर्थातच “फर्दळ”. दादानं आंदी “फुल्लोर” काव्यसंग्रह लेयला. मंधात कामाच्या तितंब्यानं लेखनी मांग पळली खरी. पन कवीमनात कवितेचा उमाया दाटुन आल्याबीगर राह्यत नाई. डबल येकदम कसदार ईचाराच्या मातीतून कवितेची फर्दळ फुटली.
कवी म्हतात…!
आला बर्सत मिरुगं
वासं मातीचा सुटला
पानी पिऊन मिर्गाचं
पान्हा गाईले फुटला
वरच्या कडव्यातले शब्द साधे हायेत. मांडनी सरकी सोपी हाये. पन कवी गावंडे यायईनं प्रतिके, अन् उपमा यायचा वापर करुन रचनेत गहनता आनली. मिर्गाचं पानी बरसल्यावर साऱ्याईले हरीक होते. मातीचे ढेकलं वले झाल्यावर त्यातून येनारा कस्तुरीसारखा वास. मनाले मोहुन टाकते. मन हर्कीजुन जसा काई गाईले पान्हाचं फुटावं असच वाटते. पयला पाऊस आल्यावरच्या परीस्थीतीचं सुरेख वर्नंन करासाठी कवीनं गाय अन् तिचा दाटून आलेला पान्हा. हे प्रतिक वापरलं. या उदाहरनावरुनच कवीच्या ईचाराची उच्ची किती मोठी हाये. याची परचिती येते.
उभी आंगनात मायं
हाती डाबलं कुकाचं
टाके खुरावर पानी
डोयातल्या आसवाचं
लेकिचे हात पिव्वे करनं हे मायबापाचं कर्तव्य हाये. ते कर्तव्य पार पाळतांनी आंगाखांद्यावर खेयत लहानाची मोठी झालेली लेक जव्हा सासरी निंगते. तव्हाचा टाईम म्हनजे मायसाठी जनू आभाय फाकल्याचं दुकं. ते दुकं लपवून माय लेकिले सासरी वाटी लावते. परिस्थीतीचे चटके सईन करत. तयहातावरल्या फोळासारखा जपलेला, हाळा मासाचा गोया. वाटी लावतानी डोयातुन आसवाच्या धारा बसू लागतात. जुन्या काळी नवरी दमनीत बसून जायाची. तव्हा दमनीले जुतलेल्या बैलाची पुजा करासाठी माय हातात कुकाचं डाबलं घीवून खुरावर पानी टाकून बैलाची पुजा करे. असा सांस्कृतिक रिवाज जुन्या काळी होता. हे या कवितेच्या माध्यामातुन कविनं अधोरेखीत केलं. पन अलीकळे या रिवाजात बदल झाला. बैलबंडी अन् दमनीची जागा एसस्टीनं घेतली. म्हनुन बाया बैलाचं खुर समजुन रस्त्यावरल्या येखांद्या गोट्यावर पानी टाकून त्यावर हयद कुकु टाकतात. आधुनीक काळात हा रिवाज खतम झाल्यासारखा हाये.
ठुलं बांधुनं गाठोळं / तुह्या येचल्या बोंडाचं
सांगं कुठीसा ठेवलं / बोंड माया हुर्दयात
वावरात पऱ्हाटीचं पिक बहरलं. त्या बहरल्या पिकात कापसाचे पांढरे टप्पोरे बोंड येचतानी घरदनीन कशी हर्पवून जाते. याचं गोंडस वर्नन कवीनं “हरनी” या कवितेत केलं. कवी गावंडे व लोककवी विठ्ठल वाघ यायच्या कवितेचा आशय जवळपास सारखा वाटते. ‘हरनी’ या कवीतेत गावंडे आपल्या प्रेयसीच्या सुंदर रुपाचं वर्नन करतानी म्हनतात कि…
बोंडा बोंडाच्या मंधात/गोलं मुखळा खुलला
आजुबाजूनं चांदन्या / मंदी चंद्र उजीळला
त् दुसरीकळे कवी विठ्ठल वाघ म्हनतात…
कापसाच्या बोंडाले/ चंद्र लवू लवू पाह्ये
माय माऊची मांडी/ तरी उघळीचं राह्ये
दोघाच्याई कवितेत आशय जरी सारखा असला. तरी ईशय अलग अलग हाये. येकाच्या कवितेत प्रेयसी, प्रेम अन् सुंदरता हाये. त् दुसऱ्याच्या कवितेत वावरात काम करनारी माय अन् तिचं अठाविश्व दारीऱ्या पाह्याले भेटते.
वऱ्हाडी बोलीचं साहित्यीक दालन समृध्द करनारे साहित्यीक डाँ विठ्ठल वाघ, डाँ. प्रतिमा इंगोले, उध्दव शेळके, बाजीराव पाटील, देविदास सोटे इ.. यायीनं जगनतानी घेतलेल्या अनुभवातून निर्मान झालेलं साहित्य समाजापुळे ठुयलं. त्याईच्यासारखंच कवी गावंडे यायनं बी अनुभवातून कवीता प्रसवली.
असं कितीकं भरलं / बाई पानी ढगाईत
गेलं पान्याखाली सारं / हिर्वगारं अगाईतं
झळीच्या दिवसात सबनीकळे चिखोल चिखोल होते. घरदार गयते, दायदान सरते, तरी मयनाभरापासून लागलेली झळी थांबाचं नाव घेत नाई. अशातच वावरातलं हिर्वगार अगाईत पान्याखाली गेल्यावर कास्तकाराच्या डोयातली झप निंगुन जाते. हे कास्तकरीचं दुकंन मांडनारी कवीता वाचकाले भावून जानारी हाये.
आपल्या लेखनीत श्रुंगार मांडन्यात कवी भलतेच तरबेज हायेत. ते येका कवीतेत म्हनतात…
ठस्सं भरली आंगान/जसं भरलं कनूस
तुले पाऊन जागीचं/ थांबे चालता मानुस
प्रेयसीच्या सुंदर रुपाच वर्नन करतांनी तिच्या रुपाले ठसं भरलेल्या कनुसाची उपमा कवीनं देली.. म्हनजेच कवी शेतीमाती संग किती येकरुप होयेल हाये हे आपल्याले दिसते. रुसवा, कनूस, पान्याले गेलती, रानी, बया ह्या कवितेत श्रृंगाराचा साज पायले भेटते. त् शेतमातीतलं जीवनगानं मिरुग, लानंपनं, खुळन, ते, दुकाय, दिवसभर, हरबरा, झळी, तन, पान्याचा ठोक, मातीचे अभंग, गाटा, पीकपानी, बेळ्ळी, मई, वावर, सुगी या कविताईत हिरवं रान दाटून भरलं हाये.
हंगामात उफनला/ सारा कुटारं न भुसा
कायं सांगवं आताचं/ फर्दळचा भरंवसा
कास्तकारले सदानकदा नशिबासंगच भांडा लागते. त्याले कई दुस्काळी मारते, कई अतिवृष्ठीनं पीक जाते, कई गारपीठ थंड करते त् उरलीसुरली मालाच्या भावात गपकनी बसते. मेयनत करतचं राहा. अन् येक येक पीक हातचं निंगुन जाते. तसचं कपाशीचं बी होते. पयला मालाचा बहार असतांनी पऱ्हाटीवर लाल्या येते, बोंडअई येते अन् मुख्या पीक चाल्ल जाते. तरी कास्तकार जीद् सोळत नाई. पऱ्हाटीले डबलून पानी देते. तव्हा डबलून फर्दळ फुटते. पन हे फर्दळचं बी पीक घरी येईलोक निसर्गाचा काई भरवसा नसते.
कवीनं सामाजितेचं भान जपत लानंपनं, माळी पुनेव, गोठान, भुक्क्याईचा मार, हुंडाबळी, या कवीतेतून मानवी मनाचे सतरंगी पैलु उलघळून दाखवले.
फर्दळ या काव्यसंग्रहाची ईशेसता म्हनजे कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीचा बाझ जपनारे पिव्वर वऱ्हाडी शब्द. जसे की सिदादही, घळ्ळी, कुकाचं डाबलं, रुमनं, बेळ्ळी, दाठ्ठा, हरीक, गुळं, चतकोर, शिसी, काताऊनं, खयवाळी, फर्दळ या शब्दाईच्यानं फर्दळ हिरवली. म्हनुनच ‘बापू दसरी’ याईनं कवीची पाठराखन करताखेपी म्हटलं कि “गावंडे यायच्या कवितेत “प्रतिमा अन् प्रतिमान यातली विविधता मनोवेधक हाये”.
कवी उध्दव गावंडे यायच्या फर्दळ या काव्यसंग्रहात येकुन ५६ कविताचा समावेश हाये. या काव्यसंग्रहाचे संपादक मुक्ता पब्लिकेशनचे सागर लोडम यायीनं प्रकाशनाची जबाबदारी लिलया पेलली. मुखपुष्ठ पायल्याबरोबर नजीत भरनारं “फर्दळ” हे संग्रहाचं नाव वाचताखेपीचं डोयापुळे गाव अन् शेतीमाती तरळाले लागते. हे जादु या शिर्षकी नावात हाये. जनू “फर्दळ” हे नाव या काव्यसंग्रहरुपी देवळाचा कयस हाये. ग्राम्या जीवनाचं मनोहरी द्रुष्य डोयापुळे उभं करनारं मनोहरी मुखपुष्ठ सौ. गंधाली घोंगडे यायीनं उत्तम साकारलं. माई अर्थातच देवका देशमुख, व बापू दासरी याईच्या मार्गदर्शनात साकरल्या गेलेल्या या “फर्दळ”चं पीक शेतकरी मनाच्या कवी उध्दव गावंडे याईले साहीत्यीक जगतात मानाचं पान देनारं हाये. हा वाचकाची काव्य जिज्ञासा भागावाले हातभार लावनारा कसदार अन् रसदार संग्रह हाये. वऱ्हाडी बोलीचं वैभव जेच्यात ठासुन भरलं हाये असा ग्रामीन संस्कृतीचा भारदस्त डोलारा म्हनजे “फर्दळ”.
समीक्षक – प्रा महादेव लुले (देवबाबू)
तिवसा/बार्शिटाकळी, मो 9923085311